महाराष्ट्रातील महत्वाच्या राजकीय घडामोडी : राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोमात सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला रायगडमध्ये खिंडार पडले… माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील तब्बल १२ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली… २०२९ मध्ये देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आणि महाराष्ट्रातले हे भ्रष्ट सरकार आम्ही उखडून फेकणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला… शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ असून त्यांची ठाकरेंच्या शिवसेनेसारखी अवस्था होऊ शकते, असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले… रस्त्यांवर खड्डे पडत असताना इथेनॉलची प्रवचने कसली देता, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यावर केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
रायगडमध्ये शिंदे गटाला मोठं खिंडार
राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोमात सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला रायगडमध्ये मोठे खिंडार पडले. शिंदे गटाचे जिल्ह्यातील प्रभावशाली नेते मनोजकुमार शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर केला. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मनोजकुमार शिंदे हे आजवर तटकरे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात होते. त्यांनी अचानक शिंदेसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मनोजकुमार शिंदे यांना अचानक शिवसेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची कुजबूज सुरू होती. अखेर आज खासदार तटकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत त्यांनी राष्ट्रवादीची घड्याळ हाती घेतले आहे.
ठाकरेंचे १२ शिलेदार बंडाच्या तयारीत?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नाशिकमधील १२ नगरसेवक शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे १५ नगरसेवक असून त्यापैकी १० पेक्षा अधिक नगरसेवकांशी शिंदे गटाकडून संपर्क साधण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ठाकरे गटातील काही नगरसेवकांची शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक झाल्याचेही सांगण्यात येते. विशेष म्हणजे, शिंदे गटात प्रवेशासाठी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना प्रभागनिहाय ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, राज्यातील अनेक नेते शिंदेसेनेत प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा दावा शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गटनेते केशव पोरजे यांच्या कार्यालयात पत्रकार घेतली. आम्ही सर्वजण एकत्र असून आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही.. केवळ संशयाचे वातावरण तयार केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“२०२९ मध्ये भ्रष्ट सरकार उखडून फेकू”
२०२९ मध्ये देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आणि महाराष्ट्रातले हे भ्रष्ट सरकार आम्ही उखडून फेकणार, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. शिवसेनेतील (उबाठा) अनेक नेते अस्वस्थ वगैरे असणे मी मानत नाही. शिवसेनेचे सहा खासदार फोडण्यात आले आणि ते मशाल चिन्हावर निवडून आले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला होता. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीला झालेले मतदान हे मोदी शहा आणि फडणवीस यांच्या विरोधात झाले होते. मग अस्वस्थ का होताय? कुणाला घाबरताय? अस्वस्थ कुणी नसते? मोदी शहा व इतर काही घटक दबावाचे राजकारण करतात व असे मासे गळाला लावतात, असे राऊत म्हणाले. जनतेत राहायचे आणि पुढच्या निवडणुकीसाठी संघर्ष करायचा आणि सत्तेत येऊ हा विश्वास ठेवायचा. २०२९ मध्ये देशात इंडिया आघाडी सत्तेत येणार आणि महाराष्ट्रात आम्ही हे भ्रष्ट सरकार उखडून फेकू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
शरद पवार गटाचे खासदार अस्वस्थ?
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पाच ते सहा खासदार अस्वस्थ असून त्यांची ठाकरेंच्या शिवसेनेसारखी अवस्था होऊ शकते, असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीची चर्चा रंगली आहे. माध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, त्यांचे (शरद पवारांची राष्ट्रवादी) ५ ते ६ खासदार अस्वस्थ आहेत. आता ते काय करतील माहिती नाही; पण त्यासाठी त्यांच्यामागे मोदी-शाह सरकार हात धुवून मागे लागलेले आहे. विरोधी पक्ष अस्तित्वातच नसावा अशी त्यांची (मोदी-शाह यांची) इच्छा आहे. जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे केले तेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही होऊ शकते. शरद पवारांच्या ५ ते ६ खासदारांना भारतीय जनता पक्षात घेण्याचा प्रयत्न आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत? असा प्रश्न पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला असता मला ते माहीत नाही, पण खासदार नक्कीच अस्वस्थ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान चव्हाण यांचा हा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फेटाळून लावण्यात आला आहे.
राज ठाकरे यांची गडकरींवर टीका
रस्त्यांवर खड्डे पडत असताना इथेनॉलची प्रवचने कसली देता, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यावर केली. ते महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते. उपस्थितांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळावे हा गडकरी यांचा विषय आहे का, पेट्रोलियम मंत्री इथेनॉलबाबत तोंडातून ब्र काढत नाही, मग गडकरी आपले काम सोडून कशाला प्रवचने देत फिरताहेत. सरकारने महाराष्ट्रातील शहरांचा विचका करून ठेवला आहे. रस्ते, उड्डाणपूल म्हणजे विकास नाही. हे आमदार खासदार परदेशात जाऊन नक्की काय बघतात हे कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मिसिंग लिंक प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरलेल्या विरोधकांचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर राजकारण करून महाराष्ट्राचा अपमान करू नका, असे सांगत टीकाकारांना बघून घेण्याचा इशारा दिला होता. त्यावरूनही राज ठाकरे यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. तुम्ही विरोधात असताना जी आंदोलने केली, टीका केली, ते राजकारण नव्हते का तसेच लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला, अशी विचारणा ठाकरे यांनी केली.
