आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील दोन आमदारांनी भाजपाला उद्देशून केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वर संकट ओढवून घेऊ नये, अशा सूचक इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला… भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला… एकसंध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आले, ते संविधानाच्या चौकटीत बसणारे नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली… मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे फडणवीसांचे दावे हास्यास्पद असून ते बोलतात, त्याच्या नेमके उलटे करतात, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेसेनेला भाजपाची धास्ती?

राज्यात सध्या भाजपा-शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) सरकार असले तरी तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. दोन दिवसांपासून शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाला उद्देशून एक विधान केले होते. मी जर भोळा राहिलो असतो, तर भाजपावाल्यांनी मला खाऊन टाकले असते, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना सतर्क केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेले विधान शिवसैनिकांना लागू होते. त्यामुळे कुणीच भोळे राहू नये. राजकारणात आजचा मित्र कधीही उद्याचा शत्रू होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे शिंदेसेनेच्या नेत्यांनी भाजपाची धास्ती घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या विधानावर भाजपाकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ठाकरे गटाचा फडणवीसांना इशारा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सूचक इशारा दिला. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल जनतेच्या न्यायालयात लागलेला आहे. असाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल असे सांगता ही काय धमकी आहे का? तुम्ही काय न्यायामूर्तींना भेटून आला का? या धमक्या देऊ नका, तुम्ही त्यात पडू नका आणि तुटेपर्यंत ताणू नका, असे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर फडणवीस यांनी भाष्य केले होते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल लागला आहे. त्यामुळे हाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी उगाच स्वत:वर संकट ओढवून घेऊ नये. इतर गद्दारांच्या टोळ्यांचे काय करायचे ते आम्ही पाहू… तुम्ही त्यात पडू नका आणि तुटेपर्यंत ताणू नका, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. माध्यमांशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले की, भाजपा नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती. मला मंत्रीपद न द्या अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असे ते आम्हाला म्हणाले होते. मात्र, तत्त्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातल्या खासदाराला आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मुंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

फोडाफोडीवरून सुप्रिया सुळे यांचा संताप

एकसंध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आले, ते संविधानाच्या चौकटीत बसणारे नाही, अशी टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. निवडणूक आयोगासह यंत्रणांचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला, तो लोकशाहीसाठी घातक आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मुंबईत माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, शिवसेना ही काल, आज आणि उद्याही उद्धव ठाकरे यांचीच राहील. राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने स्वतंत्र पक्ष स्थापन केला, त्याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर पक्ष उभा करणे हा कौतुकाचा विषय ठरला असता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य शरद पवार असून, पक्षाच्या संविधानात आमदार-खासदारांच्या मतदानाची तरतूद नाही. पक्ष ज्याचा आहे, त्याच्याकडे तो राहील, अशी तरतूद आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले आहेत. निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे दावे हास्यास्पद असून ते बोलतात, त्याच्या नेमके उलटे करतात, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. स्वतःची पाठ ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून थोपटून घेणारे फडणवीस हे महाराष्ट्रासाठी प्रत्यक्षात ‘डिझास्टर मॅन’ ठरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, राज्यातून एकामागे एक उद्योग बाहेर जात असून ३० हजारांपेक्षा जास्त मध्यम व लघु उद्योग बंद पडले आहेत. हे भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारचे पाप आहे. मराठा आंदोलक तीनदा मुंबईत गेले असता, राज्य सरकारने त्यांना संविधानिक आश्वासने दिली की केवळ खोटे बोलून वेळ मारून नेली? ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढविणे आणि संसदेत एकमताने ठराव मंजूर झालेली ‘जातीनिहाय जनगणना’ करणे हाच मराठा, धनगर आणि इतर सर्व समाजांच्या आरक्षणावरील खरा तोडगा आहे. मात्र भाजपा जाणीवपूर्वक जनगणना टाळत आहे. राज्य सरकारकडे कोणतीही राजकीय इच्छाशक्ती नाही, असा आरोपही सपकाळ यांनी केला, त्यावर भाजपाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.