आज दिवसभरातील राजकीय घडामोडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीआधी शेतकरी वीज बिल माफीचा निर्णय घेतलाच कसा? असा प्रश्न शिंदेसेनेकडून उपस्थित करण्यात आला… सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील उपोषणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर तीव्र संताप व्यक्त केला… राज्यात मुख्यमंत्रिपदाची कोणतीही रिक्त जागा नसून देवेंद्र फडणवीस हेच पुढील निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री राहतील, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले… शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले… पक्षातील काही नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

फडणवीसांच्या घोषणेनंतर शिंदेसेनेत नाराजी?

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी बळीराजासाठी वीज बिल माफीची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर महायुतीतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात नाराजी पसरल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी शेतकरी वीज बिल माफीचा निर्णय जाहीर केलाच कसा? असा प्रश्न शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी उपस्थित केला. समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या व्हिडिओत अरुण सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका सभेतून शेतकरी वीज बिल माफीची घोषणा केली. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कारण, हा मुद्दाच तितका महत्वाचा होता. खरे तर कोणताही शासकीय निर्णय जाहीर करताना त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होते आणि मग तो निर्णय जनतेला सांगितला जातो; पण मुख्यमंत्र्यांनी यावेळेस नवीन पायंडा घातलेला दिसतो आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून आमच्या पक्षातील नेते नाराज असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सावंत यांच्या टीकेला आता भाजपा काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपाला वेगळाच माज आला आहे : ठाकरे

देशातील नीट पेपरफुटी प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या एका पोस्टमधून वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच, त्यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवरही टीका करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. “हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार? भाजपाच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे,” यांसह विविध मुद्दे राज यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

राज्यात मुख्यमंत्रिपदाची रिक्त जागा नाही : शिंदे

राज्यात मुख्यमंत्रिपदाची कोणतीही रिक्त जागा नसून देवेंद्र फडणवीस हेच पुढील निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री राहतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिल्याने त्यावरून अनेक कयास बांधले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल आणि शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या चर्चांचे खंडन केले होते. दुसरीकडे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही जाहीर विधान केले नव्हते. तरीदेखील त्यांच्या पक्षातील काही नेते अधून मधून मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य करीत होते. अखेर बुधवारी ठाण्यात माध्यमांशी बोलताना राज्यात मुख्यमंत्रिपदाची कोणतीही रिक्त जागा नसून देवेंद्र फडणवीस हे पुढील निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री राहतील, असे त्यांनी स्पष्ट करत या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांना ठाकरे गटाकडून निमंत्रण

अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी चोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दादर परिसरात रामरक्षा आंदोलन केले होते. आता या आंदोलनाचा दुसरा टप्पा नागपुरातून १८ जुलैपासून सुरू होणार आहे. नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा असतानाच पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे. “आपण एक प्रखर रामभक्त आणि कडवट हिंदुत्ववादी आहात. अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचे आपण नेहमी सांगता. आपल्यासारख्या लाखो राम भक्तांच्या संघर्षातून राम जन्मभूमी मुक्त झाली व अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले. याच राम मंदिरात चोरी, लुटमार, फसवणूक असे गुन्हे घडत आहेत व शेकडो कोटींचा अपहार झाला आहे. शिवसेनेने (उबाठा) या लुटीबाबत लोकांत जागृती आणण्यासाठी रामरक्षा उपक्रम सुरू केला, रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्यावे आणि आंदोलनात सामील व्हावे,” असे आवाहन राऊत यांनी फडणवीसांना केले आहे.

सुनेत्रा पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतही काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे वरिष्ठ नेते असलेल्या सच्चिदानंद सिंह यांनी थेट सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या भेटीबाबत सुनेत्रा पवार यांना काहीच माहिती नसल्याची बाब आता समोर आली आहे. त्यावरुन, माजी आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीत काहीही आलबेल नसल्याचे मान्य केले आहे. पक्षातील काही नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्र्यांना कोण अडचणीत आणतंय, अशी चर्चा सुरू झाली आहे.