लोकसभा निवडणुकीस अजून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी असला तरी भाजपची एकूण खेळी लक्षात घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्क प्रमुखांची यादी जाहीर केल्याने तशीच वेळ आल्यास स्वबळावर लढण्याची आतापासून तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.

शिवसेना शिंदे गटाने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्क प्रमुखांची घोषणा करताना त्यांची यादी जाहीर केली. यात मुंबई व ठाण्याची जबाबदारी ही डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सर्व नेत्यांना मतदारसंघ वाटून दिले आहेत. विशेष म्हणजे सध्या भाजपकडे असलेल्या मतदारसंघांमध्येही शिंदे यांनी संपर्क प्रमुख नेमले आहेत. लोकसभा निवडणूक ही २०२९ मध्ये अपेक्षित आहे. अजून तीन वर्षांचा कालावधी असतानाही शिंदे यांनी आतापासूनच लोकसभेची तयारी करणे याला महत्त्व दिले जात आहे.

महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या खेळीने स्वत: शिंदे हे हैराण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्याशी शिंदे यांचे वैयक्तिक संबंध चांगले असले तरी राज्यातील भाजप नेत्यांकडून शिंदे व शिवसेनेवर सातत्याने कुरघोडी केली जाते. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिंदे गटाच्या मंत्र्याला हात लावण्यापर्यंत पोलिसांची मजल गेल्याने शिंदे फारच अस्वस्थ झाले आहेत.

विधानसभेचे कामकाज सुरू असताना पहिल्या रांगेत मुख्यमंत्री फडणवीस व शिंदे यांच्यात बोलाचाली झाल्याचे बघायला मिळाले. त्या दिवशी विधानसभा व विधान परिषदेत शिंदे गटाच्या आमदारांनी गोंधळ घातल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. सातारा प्रकरणावरून पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचा निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले असतान सभापती राम शिंदे यांनी तो निर्णय राखून ठेवला. भाजपकडून सातत्याने होणाऱ्या गळचेपीमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये संतप्त भावना आहे.

राज्यात २०२९च्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा मंत्र अमित शहा यांनी राज्य भाजप नेत्यांना यापूर्वीच दिला आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीची सारी सूत्रे ही भाजपकडेच आली आहेत. कारण राष्ट्रवादीच्या निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्री फडणवीस यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट पुढील दोन अडीच वर्षांत जास्तीत जास्त कमकुवत कसा होईल याचीच रणनीती भाजपकडून खेळली जाऊ शकते.

दुसरीकडे, शिंदे यांना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. हा धोका ओळखूनच शिंदे यांनी आतापासूनच पक्षाचा पाया मजबूत राहिल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने दूर केलेच तर स्वबळाची तयारी असली पाहिजे, अशे शिंदे यांचे धोरण असावे. यामुळेच लोकसभा निवडणुकीस तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी असतानाही निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये चाचपणी करण्याचे प्रयत्न शिंदे यांच्याकडून सुरू झाले आहेत.