Mla Santosh Bangar Home Police Raid : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकल्याचे वृत्त समोर आले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास तब्बल १०० हून अधिक पोलिसांनी बांगर यांच्या घराची झाडाझडती घेतल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे- दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या एका आमदाराने बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकल्याने शिंदेसेनेच्या आमदाराला नेमकं कोण लक्ष्य करतंय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याविषयीचा हा आढावा…
हिंगोलीत भाजपा-शिंदेसेनेतील वाद चव्हाट्यावर
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीतील या दोन्ही मित्रपक्षांनी अनेक जिल्ह्यांत एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. यादरम्यान हिंगोलीत जिल्ह्यात भाजपा आणि शिंदेसेनेत चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. कळमनुरीचे शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर १०० पोलिसांनी गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास धाड टाकल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यासंदर्भातील माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याबाबत आपण मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार संतोष बांगर यांना कोण लक्ष्य करतंय?
आमदार संतोष बांगर यांच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानंतर आमदार हेमंत पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. भाजपा आमदाराच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी संतोष बांगर यांच्या घरावर धाड टाकल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला. जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये शिवसेनेची (शिंदे गट) चांगली स्थिती आहे. कळमनुरी आणि हिंगोली शहरावर सेनेचा भगवा फडकणार आहे. त्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याची टीका पाटील यांनी केली. आमदार बांगर यांच्या ७५ वर्षांच्या आई आजारी असताना घराची झाडाझडती घेऊन त्यांना त्रास देणे ही अतिशय वाईट गोष्ट आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमक प्रचारामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता? कारण काय?
आमदार हेमंत पाटील यांचा आरोप काय?
एखाद्या आमदाराच्या घराची झाडाझडती घेताना त्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते; पण विधानसभा सभापतींकडून तसा कोणताही आदेश किंवा पत्र आले नाही. मग ही धाड कुणाच्या सांगण्यावरुन टाकण्यात आली? सत्ताधारी आमदार मुटकुळे यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे का? असा प्रश्नही आमदार हेमंत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच आम्ही दोन्ही जिल्ह्यातील आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. महायुती सरकारमध्ये आम्ही समान वाटेकरी असतानाही भाजपाचे स्थानिक आमदार पोलिसांवर दबाव टाकत आहेत. ही बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
हिंगोलीत भाजपा-शिंदेसेनेत वादाची ठिणगी
राज्यात सत्तेत असलेले भाजपा आणि शिंदेसेना हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. सुरुवातीला दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी धाडत या निवडणुकीत रंगत भरली. मात्,र अलीकडेच शिंदेसेनेने दोन उमेदवार फोडून भाजपाला मोठा धक्का दिला. हिंगोलीच्या नगराध्यक्षपदाच्या जागेवर भाजपाकडून दावा सांगितला जात असताना आमदार संतोष बांगर यांनी येथील निवडणुकीत उडी घेऊन शिंदेसेनेच्या वतीने नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे केले. त्यामुळे भाजपा आणि शिंदेसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी मतदारसंघात केलेल्या साड्यावाटपावरून भाजपाने शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते. आता बांगर यांच्या घरावरच पोलिसांनी धाड टाकल्याने हा वाद आणखीच पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : शिंदेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; भाजपा-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष? महायुतीत नेमकं चाललंय तरी काय?
भाजपा आमदाराचा नेमका आरोप काय?
दोन दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. राज्यातील सत्तांतराच्या काळात आमदार बांगर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ५० खोके घेतले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. संतोष बांगर हा हिंगोली जिल्ह्याला लागलेला कलंक असल्याची टीकाही मुटकुळे यांनी केली होती. आमदार बांगर पैशांशिवाय राहू शकत नाही आणि त्यांचे अनेक अवैध धंदे आहेत. कळमनुरीतील मटक्याचे अड्डे बंद करायचे असतील तर शिंदेसेनेला अजिबात मतदान करू नका, असे आवाहनही आमदार मुटकुळे यांनी मतदारांना केले होते. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांदरम्यान आमदार बांगर आणि आमदार मुटकुळे यांच्यात अनेकदा आरोप प्रत्यारोप झाले आहेत. महायुतीतील या दोन्ही आमदारांनी एकमेकांविरोधातच शड्डू ठोकला आहे. नगरपरिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी सध्या बांगर आणि मुटकुळे यांच्यात चढाओढ सुरू आहे. त्यातच आमदार बांगर यांच्यावर भाजपाच्या नेत्याने केलेले आरोप सत्य निघाले असल्याची चर्चा सध्या कळमनुरीत सुरू आहे.
