छत्रपती संभाजीनगर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात २२ जागांवर लढणाऱ्या शिवसेनेची महायुतीमध्ये जागावाटपातच वजाबाकी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मराठवाड्यातून नऊ आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर गेले. शिवसेनेतील फुटीनंतर २०१९ मध्ये निवडून आलेल्या १२ पैकी फक्त तीन आमदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले. त्यामुळे मुंबईनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यात दौरे वाढवले असले, तरी पूर्वीच्या काही मतदारसंघांतून त्यांना माघार घ्यावी लागेल, असे चित्र निर्माण होत आहे.

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यांत शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकत आहे. औरंगाबाद (पश्चिम), औरंगाबाद (मध्य) या शहरी दोन मतदारसंघांत संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल हे दोन आमदार, तर रमेश बोरनारे, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार या पाच आमदारांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुमरे यांच्या पाठीशी ताकत उभी केली, ते निवडून आले. जिल्ह्यातील अन्य चार आमदारांच्या मतदारसंघांत वारंवार भेट देऊन आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे ते दाखवून देत आहेत. परांडा मतदारसंघात तानाजी सावंत यांना पाठबळ देण्यासाठी ते दौरा करणार आहेत. उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, कळमनुरीचे संतोष बांगर, नांदेडचे बालाजी कल्याणकर अशा नऊ आमदारांच्या मतदारसंघात त्यांनी ताकत लावली असली, तर महायुतीमध्ये लढतीच्या जागा किती सोडवून घेता येतील, या विषयी नाना शंका व्यक्त केल्या जात आहेत. २०१९ मध्ये घनसावंगी व जालना या दोन मतदारसंघात शिवसेनेने ताकद लावली होती. जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर हे उमेदवार आहेत, तर पुन्हा हिकमत उडाण निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.

हेही वाचा >>> खतगावकरांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब    

नांदेड दक्षिण मतदारसंघात शिंदे यांचा दावा असला, तरी या मतदारसंघात भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांनी अपक्ष म्हणून लक्षणीय मते घेतली होती. देगलूर बिलोली मतदारसंघात काँग्रेसमधून जितेश अंतापूरकर यांना भाजपने प्रवेश दिला आहे. परभणीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटास निवडणुकीत पाय रोवता येईल, अशी स्थिती नाही.

बीडमध्ये शिवसेनेची केवळ एका जागेवर लढत

जयदत्त क्षीरसागर गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते. मात्र ते आता अपक्ष लढण्याची तयारी करत आहेत. राजकीय ताकत असणाऱ्या उमेदवारांचा शिंदे गटास शोधच सुरू आहे. मराठवाड्यात परभणी, लातूर, बीड या जिल्ह्यांमधील १६ मतदारसंघांत मुख्यमंत्र्यांना जागावाटपात बोलणी करण्यास फारसा वाव नाही. नांदेडमध्येही हेमंत पाटीलवगळता सक्षम उमेदवाराचा शोध सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील लढतीसाठी जागावाटपात मुख्यमंत्री शिंदे यांची बोलणी उणे चिन्हात असेल, असे दिसून येत आहे.