मागील काही निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळवले आहे. ५७ आमदार असलेल्या शिवसेनेचे भाजपाबरोबर युतीत काही महानगरपालिकांवर वर्चस्व आहे. दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेची एक बाजू कमजोर असून त्यावर काम करणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केले आहे.
एकनाथ शिंदेंची शिवसेना ही मुख्यत: आमदार व शहरी भागातील नगरसेवकांवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात शिवसेनेचे तुरळक भागांमध्ये वर्चस्व आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची असलेली पोकळी भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. ग्रामीण भागात कमजोर असलेल्या शिवसेनेला मजबूत करण्यासाठी शिंदे यांनी कंबर कसली आहे. ७ फेब्रुवारी रोजी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी मागील पाच दिवसांत २२ सभा घेतल्या आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या सभेत शिंदे यांनी विकास व पक्ष संघटनावर जोर देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे प्राबल्य नसलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील प्रचारावर जोर दिला होता.
“आपल्या पक्षात कुणीच मालक नाही”
“महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले. आता आम्ही ग्रामीण भागात संघटन मजबूत करण्यावर जोर देत आहोत. हे फक्त जिल्हा परिषद निवडणुकांपुरते मर्यादित नसून २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांची ही तयारी आहे”, अशी माहिती शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने दिली. दरम्यान, ग्रामीण भागातील निवडणुका जिंकल्यास शिवसेनेला ग्रामीण भागात पाय रोवता येतील. याचा फायदा आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत महायुतीतील महत्व वाढवण्यासाठी शिवसेनेला करून घेता येईल.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला फक्त मुंबई किंवा एमएमआर रिजनपुरते मर्यादीत ठेवायचे नसल्याचे अनेकदा म्हटले आहे. कोल्हापूर व सांगलीत प्रचारात एकनाथ शिंदे म्हणाले, “आपला पक्ष हा कामगारांचा पक्ष आहे. इथे कोणीच मालक नाही. प्रत्येक गावात आपलं अस्तित्व असलं पाहिजे.” शिंदे यांनी प्रचारात “आपला पक्ष फक्त मुंबईपूरता मर्यादित राहायला नको”, असे आवाहन कार्यकर्त्यांना सतत केले.
महायुतीत ताकद (बारगेनिंग पावर) वाढवण्यासाठी ग्रामीण भागावर लक्ष
महायुतीत शिवसेनेची वाटाघाटी करण्याची ताकद (बारगेनिंग पावर) वाढवण्यासाठी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले जात असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण केल्यास शिंदे यांना आकडेवारीच्या राजकारणाव्यतिरिक्त भाजपाबरोबर बोलणी करताना आणखी फायदा मिळू शकतो. “शिवसेना ही मुंबई आणि ठाण्यापुरती मर्यादित नाही, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. आम्हाला भाजपानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनायचे आहे”, असे शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
दरम्यान, राजकारणात वेळेला महत्व असते. काँग्रेस पक्ष आता अनेक जिल्ह्यांमध्ये दुबळा झाला आहे. राष्ट्रावादी देखील अजित पवार व शरद पवार या दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत केल्याचे म्हटले जात आहे.
दोन्ही शिवसेनेचे राजकीय बलाबल
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीत दबदबा कायम राखला. परंतु, ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रात तशी कामगिरी करू शकली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या (ठाकरे) जिल्हा पातळीवरील नेत्यांचे महत्व वाढले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी जिल्हा परिषद निवडणुका दुरापास्त आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शहरी भागात प्रबळ आहे. विशेषत: मुंबई महानगरपालिकेत ६५ जागा जिंकून शिवसेनेने (ठाकरे) हे दाखवून दिले आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळवल्या होत्या. तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा वरचढ ठरली. शिंदेंच्या शिवसेनेचे ५७ आमदार, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे २० आमदार निवडून आले होते. त्यामुळे शिंदे यांनी पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे.
बाळासाहेब ठाकरेंचा ‘गाव तिथे शाखा’ नारा
अखंड शिवसेनेचे शहरी भागात वर्चस्व होते. मुंबई, ठाणे, कोकणातील काही भाग व मराठवाड्यात शिवसेनेची चांगली पकड होती. १९९० मध्ये मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गाव तिथे शाखा’ असा नारा देत शिवसेनेचा मुंबई बाहेर विस्तार सुरू केला होता. शिवसेनेला राज्य पातळीवर महत्वाचे स्थान मिळवायचे असेल तर मुंबई बाहेर शिवसेनेचे प्रस्थ असले पाहिजे, हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. गावखेड्यातल्या मतदारांवर विधानसभा व लोकसभेची गणितं ठरतात. ग्रामीण भागातील मतदार फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेपुरता मर्यादित नसतो. आता एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवल्याचे दिसत आहे. प्रचारा दरम्यान एका सभेत शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत “घर तिथे सैनिक, गाव तिथे शाखा” असा नारा दिला होता.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा शिवसेनेचा ग्रामीण भागात विस्तार करत आहेत, असे शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी म्हटले आहे.
राज्यात विधानसभेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करण्याची संधी आहे. १२ जिल्हा परिषदांमधील एकूण ७३१ जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकणे हे शिंदेंच्या शिवसेनेच लक्ष्य आहेच, परंतु, त्याचबरोबर ग्रामीण भागात शिवसेनेच संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २०२९ च्या लोकसभा व विधानसभेची ही तयारी आहे. सेना म्हणताच एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी प्रतिमा तयार केली जात आहे, अशी माहिती शिवसेनेच्या (शिंदे) वरिष्ठ नेत्यांनी दिली.

