Eknath Shinde Speech 5 Imp Points: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून निवडून आलेल्या सहा लोकसभा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्याचे सांगितले. तसेच त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जे लोक जात आहेत त्यांना दोष देण्याऐवजी ते का जात आहेत त्याचे आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण भाषणातील ५ महत्त्वाचे मुद्दे, तसेच पत्रकार परिषदेत शेवटी काय झाले? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

१) “बाळासाहेबांच्या व हिंदुत्वाच्या विचारांचा…”

पत्रकार परिषदेत सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत सामील होणाऱ्या सहा लोकसभा खासदारांचा परिचय करून दिला. त्यानंतर ते म्हणाले, “चार वर्षांपूर्वी २२ जून २०२२ रोजी शिवसेनेत आम्ही उठाव केला होता. तेव्हा चाळीस आमदार सोबत होते. आता आम्ही षटकार मारलेला आहे. २०२२ साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण व बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला होता. हा दुसरा टप्पा आहे. आपला लढा बाळासाहेबांच्या व हिंदुत्वाच्या विचारांचा आहे. जिथे शिवसेना तिथे शिवसैनिक. त्यामुळे आज या सहा खासदारांनी बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. हे स्वत:च्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी कुणीही आलेलं नाही. मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी, विकासासाठी हे खासदार आले आहेत.”

२) “बाळासाहेबांनी सांगितलंय आला अंगावर तर…”

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही कोणालाही आडवायला नाही, तुडवायला नाही, आम्ही शिवसेना वाढवायला आलो आहोत. आम्ही कोणाच्या आडवे जात नाही, आमच्याही कुणी आडवं येऊ नये. आडवं आलं तर बाळासाहेबांनी सांगितलंय आला अंगावर तर घ्या शिंगावर. २०२२ चा उठाव आपण पाहिला आहे. तेव्हा देखील आम्ही एका विचारधारेसाठी उठाव केला. जेव्हा बाळासाहेबांचा विचार सोडून दुसरा विचार आला तेव्हा आम्ही तो उठाव केला. जो निर्णय २०२२ मध्ये आम्ही घेतला तो सर्वसामान्य लोकांनी स्वीकारला. त्यावेळी लोक म्हणत होते एकही निवडून येणार नाही. पण, मी त्यावेळी म्हणत होतो जर निवडून कोणी आलं नाही तर मी एकनाथ शिंदे राजीनामा देईल व गावाला शेती करायला निघून जाईल. ४० आमदार होते ६० आमदार निवडून आले. जनतेच्या दरबारात लोकांनी आम्हाला स्वीकारलं, पाठिंबा दिला. अगदी चांदा ते बांदापर्यंत शिवसेना मोठी झाली. कारण आमची नीती, नियत स्वच्छ होती. विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. काही लोकांनी विचारधारा सोडली, महाराष्ट्राने त्यांना नाकारलं.”

३) “विकास कामांसाठी पैसे…”

एकनाथ शिंदे म्हणाले, “जे सहा खासदार आमच्याबरोबर आले आहेत, ते लाखो लोकांच्या मतदानावर निवडून आलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघांत शिवसेना त्यांच्यामुळे आणखी बळकट होईल. या सहा खासदारांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचे काम शिवसेना करेल. मी दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे महाराष्ट्रातले लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी कार्यकर्ता म्हणून वागतो. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या सहा खासदारांना मी एवढंच सांगू इच्छितो, इथे कोणी मालक नाही. आपण सर्व कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहोत. तुमच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल. कुटुंब म्हणून यापुढची वाटचाल आपण करू. डबल इंजिन सरकारमध्ये आपली कामे होतील, अडचणी सुटतील. आपण ज्या विश्वासाने शिवसेनेत आलात त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. केंद्राशी निगडीत प्रश्नही आपल्याला सोडवता येतील. त्यामुळे कुठे काही अडचण येणार नाही. जे खासदार आमच्यासोबत आले आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी पैसे कमी पडू देणार नाही, असा विश्वास मी त्यांना देतो.”

४) उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलप्रुफ करतो. हे आपल्याला आज सांगण्याची आवश्यकता नाही. सगळं समोर आहे. यासाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण केली आहे. सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऑपरेशन टायगर सक्सेस झालं आहे. सहा खासदारांचा परिचय मी करून दिला आहे. हे सगळे खासदार धुरंधर आहेत. काही लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करतात. हे स्वार्थासाठी गेलेत म्हणतात. आता जेव्हा त्यांच्यासोबत होते, तेव्हा सगळे चांगले होते. मी जेव्हा त्यांच्यासोबत होतो तेव्हा चांगला होतो, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे न्यायला लागलो तेव्हा वाईट झालो. जे चालले आहेत त्यांना दोष देण्याऐवजी ते का जातायत याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करायला हवं. सकाळी शिव्या देतात आणि संध्याकाळी म्हणतात चांगले आहेत, चांगले आहेत. हेही करून पाहिलं त्यांनी. पण ते केमिकल लोचावाले लोक आहेत. त्यामुळे मला जास्त बोलायंच नाही.”

५) लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेवर…

नव्याने पक्षात आलेल्या खासदारांना पुढील निवडणुकांमध्ये तिकीट दिले जाईल का? यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सहाच्या सहा खासदार जे आहेत ते पुढील निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील.” खासदारांच्या प्रवेशासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे का? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, “कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत, संसदीय चौकटीत ही प्रक्रिया आम्ही केलेली आहे.” तसेच लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी (डिलिमिटेशन) हे केले जातेय का? हा डिलिमिटेशनचा भाग आहे का? असा प्रश्नही एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला आहे. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हे बघा आता कशाचा भाग आहे ते मी सांगत नाही. हे सगळे जण शिवसेनेत स्वखुशीने सामील झाले आहेत, हा सगळ्यात मोठा भाग आहे. तुम्ही समजून घ्या काय समजायचं ते.” असे स्मित हास्य करत एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाकरेंच्या ‘या’ ६ खासदारांनी केला शिंदेसेनेत जाहीर प्रवेश

धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, परभणीचे संजय ऊर्फ बंडू जाधव, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, शिर्डीचे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील लोकसभा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे लोकसभेचे फक्त तीन खासदार आहेत.