दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष आता सहकार क्षेत्रातही सुरू झाला आहे. गोकुळ दूध संघावरील राज्य शासन नियुक्त संचालक बनलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या मुद्द्यावरून जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन गटातील संघर्षाला पुन्हा उकळी फुटली आहे. संचालक निवडीला खो बसल्याने संतप्त झालेले जाधव यांनी आपला संताप खासदार धैर्यशील माने यांच्यावर व्यक्त करीत त्यांना माजी खासदार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे. तर गोकुळ सारख्या संस्थेतील मलईदार संचालक होण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही खासदार, भाजप यांचे प्रयत्न सुरू असल्याने या शासन नियुक्तीचे नवनीत कोणाला मिळणार हे लक्षवेधी ठरले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारचे आधीचे शासन निर्णय रद्द करून राजकीय शह दिला आहे. पाठोपाठ त्यांनी सहकार क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. याचा पहिला प्रयोग त्यांनी राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध संघ) या दूध संघात केला आहे. गोकुळमध्ये संचालक म्हणून राहणे खूपच फायदेही असल्याचा अर्थ सर्वानाच समजला असल्याने जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यापासून ते तमाम नेत्यांचा आटापिटा सुरू असतो. गोकुळ दूध संघाची निवडणूक होऊन सतेज पाटील- हसन मुश्रीफ या तत्कालीन मंत्र्यांनी सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर दोन स्वीकृत व एक शासन नियुक्त संचालक निवडीसाठी नेत्यांनी मोर्चेबांधणी केली होती. शिवसेनेचे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी गनिमी कावा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत शासन नियुक्त संचालक निवडीचे पत्र मिळवले. पुत्र रोहित याची निवड होण्यासाठी प्रयत्न करणारे खासदार संजय मंडलिक यांनाही जाधव यांनी शह दिला होता.

हेही वाचा : पक्षांतराच्या चर्चेला मिलिंद नार्वेकरांचा पूर्णविराम

संचालकपद अल्पायुषी, संघर्षपूर्ण

गतवर्षी जुलै मध्ये जाधव यांची संचालकपदी निवड झाली. ती गोकुळच्या नेतृत्वाला पसंतीस उतरलेली नव्हती. गोकुळच्या संचालक मंडळाच्या काही बैठका झाल्या. पण त्यांचे पत्र जाधव यांना दिले नव्हते. महिनाभर वाट पाहून जाधव यांनी थेट गोकुळवर मोर्चा काढत संचालक बैठकीला बोलवा; अन्यथा गोकुळचा दूध पुरवठा रोखू. शासन आदेश पालन न करणारे गोकुळ पाकिस्तानात आहे का? असा खडा सवाल केला होता. त्यानंतर जाधव यांना मे महिन्यामध्ये बैठकीसाठी रीतसर निमंत्रित गेले. म्हैस दूध दरवाढ सारख्या त्यांनी केलेल्या काही सूचनाही विचारात घेतल्या गेल्या. गोकुळात मुरली रममाण होत असतानाच दुधात मिठाचा खडा पडला. राज्यातील सत्ता बदलाचा सहकारातील पहिला धक्का त्यांनाच बसला. जाधव यांची संचालक शासन नियुक्त संचालक निवड रद्द केल्याचे पत्र गोकुळला पाठवून त्यांची गच्छन्ति केली आहे.

शिवसेनेतील संघर्ष तापला

जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या प्रयत्नांवर मात करून जाधव यांनी गोकुळ वर संचालक म्हणून जाण्याचा प्रयत्न केला तरी तो अल्पायुषी ठरला. केवळ सव्वा वर्ष त्यांना संचालक मंडळात राहण्याची संधी मिळाली. जाधव यांचे संचालक पद जाण्यामागे शिवसेनेतील दोन गटातील सत्ता संघर्ष कारणीभूत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. शिंदे गटाला पाठिंबा दिलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोर्चा काढून गद्दार लोकप्रतिनिधी अशा घोषणा दिल्या होत्या. तेव्हापासून जाधव हे त्यांच्यासाठी लक्ष्य ठरले होते. जाधव यांनी आता धैर्यशील माने यांच्यावर तोंडसुख घेत या गद्दार खासदाराला माजी खासदार करणार, असा इशारा दिला असल्याने शिवसेनेतील वाद पुन्हा तापला आहे.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात नियोजन आराखड्यातील कामांत फेरबदल? ४०० कोटींचा निधी वळविण्याची शक्यता

नव्या निवडीसाठी स्पर्धा

जाधव यांची निवड रद्द झाल्याने रिक्त पदासाठी शिंदे – फडणवीस यांच्या जिल्ह्यातील समर्थकांनी हालचाली चालवल्या आहेत. धैर्यशील माने यांनी मित्र झाकीर भालदार यांची निवड होण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. खासदार मंडलिक यांनी पुन्हा एकदा पुत्र रोहित यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडून अरुण इंगवले यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. प्रमुख नेत्यांनी आपल्या समर्थकास मलईदार संचालकपद मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याने यात कोणाची सरशी होणार याकडे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde uddhav thackeray political conflict cooperative sector gokul director post cancelled print politics news tmb 01
First published on: 03-10-2022 at 12:59 IST