महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना शिंदेसेनेच्या आमदाराने सूचक विधान केले… मोदी सरकारला पुढील सहा महिन्यात गाशा गुंडाळावा लागणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला… सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला… इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला… दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

“शिंदे नाराज झाले तर सरकार बदलते”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित असल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक विधान केले. “एकनाथ शिंदे नाराज होत नाहीत. मला माहिती आहे की ते सदाबहार नेते आहेत. शिंदे नाराज झाल्यास सरकार बदलून जाते आणि राजकीय भूकंप होतो. त्यामुळे कोणी त्यांना नाराज करू नये,” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शब्दकोशात ‘नाराजी’ हा शब्दच नाही. शिंदे जे काही करतात ते खुल्या दिलाने आणि खुल्या मनाने करतात, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी नाराजीची कुठलीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही नेत्यांच्या विधानांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

“मोदी सरकार ६ महिन्यात गाशा गुंडाळणार”

मोदी सरकारला पुढील सहा महिन्यात गाशा गुंडाळावा लागणार, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. लोकशाहीत आंदोलनावर कोणालाही बंदी घालता येत नाही. जर या सरकारने तसा प्रयत्न केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल, असा इशाराही राऊत यांनी दिला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले. त्यावरूनही राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलकांवर गुन्हे दाखल करून सरकारला कौतुक वाटते का? मुंबईत आंदोलन केल्याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्ह्याची भिती कुणाला दाखवता? तुमच्या जाण्याची वेळ आली आहे. आपल्याला पुढच्या सहा महिन्यात दिल्लीतून गाशा गुंडाळावा लागेल, असा दावाही राऊत यांनी केला. त्यांच्या या विधानाची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.

गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज बाद

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला. या निवडणुकीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा निवडणूक अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरवला. या संदर्भात काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी याचिका दाखल केली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी १ नोव्हेंबरला मतदान, तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधीच पडळकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयानंतर आता गोपीचंद पडळकर यांची आगामी रणनीती व पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांची राहुल गांधींवर टीका

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता, त्यांनी या मोर्चाचा निषेध केला. तसेच विरोधकांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. लोकशाहीत प्रत्येकाला न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागण्याचा अधिकार आहे. मात्र, याचिका दाखल करण्यासाठी मोर्चा काढण्याची ही कोणती पद्धत? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आणि त्यातून घटनात्मक संस्था उभ्या राहिल्या. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढणे आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. अशी टीकाही शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला विरोधकांकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चंद्रकांत पाटील यांचा महाविद्यालयांना इशारा

दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. शासनाच्या निर्देशांचे पालन करून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनत्यांना दिलासा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.