Maharashtra Todays Top 5 Political News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाला नकोसे झाले आहेत, असे विधान ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केले… मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कडक शब्दांत इशारा दिला… ठाकरे गटाचे ५ खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याच्या चर्चेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.. भाजपाने दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याऐवजी स्वत:ची मुले मोठी करावीत, असा सणसणीत टोला शर्मिला ठाकरे यांनी लगावला… भाजपाला आता आलेल्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला… राज्यात आज दिवसभरात घडलेल्या या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
“शिंदे भाजपाला नकोसे,” बड्या नेत्याचे विधान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाला नकोसे झाले असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिंदेसेनेत सुप्त संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडाभरापूर्वी नवी मुंबईतील विमानतळावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. मात्र, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या घटनेला काही दिवसांचा कालावधी लोटला असतानाच नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव वगळण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच नाराज झालेल्या शिवसैनिकांनी थेट भाजपाचे मंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इतकेच नाही तर त्यांची गाडीही अडवण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्याला हाताशी धरून एकनाथ शिंदे हे भाजपाला नकोसे झाले असल्याचा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. दुसरीकडे- भाजपा आणि शिंदेसेनेत चढाओढ सुरू असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली.
मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कडक शब्दांत इशारा दिला. मराठा समाजांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून फडणवीसांनी विनाकारण माझ्या नादी लागू नये, अन्यथा तुमचा कधी न होणारा देव्हारा होईल, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या आणि साताऱ्या गॅझेटबाबत भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार लाड यांनी मराठा समाजासाठी जी कामे सुरू केली आहे, ती यापुढेही करत राहावी. याआधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. आमचे मुख्यमंत्र्यांशी काही वैर नाही आणि त्यामुळे त्यांनीही मराठा समाजाशी वैर ठेवू नये. फडणवीसांनी उगाच दुसऱ्याचे ऐकून मराठ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून माझ्या नादी लागू नये, अन्यथा तुमचा कधी न होणारा देव्हारा होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
ठाकरे गटाचे ५ खासदार फुटणार?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ५ खासदार हे आपला स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. त्यानंतर ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडणार, अशी चर्चा संपूर्ण राज्यभरात रंगली. इतकेच नाही तर, खासदारांचा हा गट लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यासाठी दिल्लीला गेला असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर प्रतिक्रियाता देताना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. “लोकसभेत शिवसेनेचा एकच गट आहे, जो अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आमच्या पक्षाचे खासदार फुटणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहे. रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीत सर्व खासदारांची उपस्थिती होती. आज सकाळपासून काही खासदारांशी आमचे बोलणे झाले. सकाळी संजय देशमुख आणि उद्धव ठाकरे यांचीही काही कामानिमित्त चर्चा झाली. आता त्यानंतरही तुम्हाला वाटत असेल की- कुणी पत्र द्यायला गेले असतील तर त्या पत्राचा मसुदा आल्यावर त्यावर उत्तर देऊ,” असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
शर्मिला ठाकरे यांचा भाजपाला टोला
भाजपाने दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याऐवजी स्वत:ची मुले मोठी करावीत, असा सणसणीत टोला शर्मिला ठाकरे यांनी लगावला. तुमचे कार्यकर्ते फक्त दुसऱ्यांच्या सतरंजा उचलायला ठेवलेत का, इतरांचे पक्ष कशाला फोडता, अशी टीकाही त्यांनी भाजपावर केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूरमध्ये महिलांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतले. पत्रकारांनी ‘ऑपरेशन टायगर’विषयी विचारले असता शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, त्यांना (सत्ताधाऱ्यांना) फक्त पक्ष फोडण्याचीच कामे करायची आहेत. दुसऱ्यांची मुले (कार्यकर्ते) चोरण्यापेक्षा भाजपामध्ये आणि आरएसएसमध्ये अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणारी चांगली मुले आहेत, त्यांना संधी का दिली जात नाही? त्यांनी फक्त आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का? भाजपाने तिकडे ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, इथे उद्धव ठाकरेंचा फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला. आम्ही कधीही कोणाचा पक्ष फोडला नाही; उलट आम्ही आमची नवीन नेतृत्वे, नवीन मुले निर्माण केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शंभुराज देसाईंचा भाजपाला इशारा
भाजपाला आता आलेल्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. सातारा नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी भाजपाने आम्हाला प्रतिसाद दिला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सातारा-सांगली विधानपरिषदेत भाजपाने धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी अद्यापही दूर झाली नसल्याचे दिसून येत आहे. महायुतीच्या समन्वय बैठकीलाही मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित नव्हते, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पालकमंत्री म्हणून मी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूकीवेळी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. पण, भाजपाच्या दोन्ही मंत्र्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर आम्हालाही विचार करावा लागणार ना? असे म्हणत शंभुराज देसाईंनी आपली खदखद व्यक्त केली आहे. तसेच, आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे, येथील विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपा आणि शिंदेसेनेत आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा उघड झाले आहे.
