विजय पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कराड : कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात भाजप पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेने’नेही आपली मांड भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. सत्ता स्थापन झाल्यापासून शिंदे यांनी आपल्या या घरच्या जिल्ह्यात एकापाठोपाठ केलेल्या दौऱ्यांनी जिल्ह्यातील राजकीय गणिते आणि प्रभाव भाजप आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना‘ यांच्या बाजूने संपूर्णपणे वळवला आहे.

हेही वाचा >>>शिंदे समर्थक आमदार महेंद्र दळवी यांच्या अलिबाग मुरुड मतदारसंघात २५२ कोटीचा निधी

एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील. यामुळे सुरुवातीपासून या जिल्ह्याकडे त्यांचे आणि येथील जनतेचे शिंदे यांच्याकडे लक्ष लागलेले. ते मुख्यमंत्री झाल्यापासून या नात्याचीच आठवण यावी असे त्यांचे जिल्ह्यात एकापाठोपाठ दौरे होत आहेत. नुकतेच यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि प्रतापगडावरील सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचे जिल्ह्यात दौरे झाले.

शिंदे पहिल्यांदाच कराडच्या दौऱ्यावर आल्याने त्याला भावनिक वलय होते. सातारा जिल्ह्याचा सुपुत्र, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या नेतृत्वाला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्याने लोकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबाबत कुतूहल, आपलेपणा दिसत होता. तर, मुख्यमंत्री शिंदे यांनीही लोकांचा उत्साह, प्रतिसादाला ठिकठिकाणी दाद दिली. रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी गर्दी केलेल्या लोकांना ते आपल्या वाहनाचा वेग कमी करून प्रतिसाद देत होते. काही ठिकाणी त्यांनी आपला ताफा थांबवून विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच लोकांमध्ये मिसळून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना संवादही साधल्याने शिंदे यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचा बोलबाला झालेल्या या दौऱ्यातून याचे नियोजन असलेल्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांचेही बळ वाढल्याचे म्हणावे लागत आहे.

हेही वाचा >>>प्रकाश निकम: उपेक्षितांच्या सेवेसाठी तत्पर

मुख्यमंत्री म्हणून विकासकामांना चालना देण्याबरोबरच नव्या प्रकल्पांची आणि निधींची घोषणाही शिंदे यांनी या दौऱ्यांमध्ये केली. यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहताना यशवंतरावांची आवड असलेल्या शेती व शेतकऱ्यासाठी त्यांनी साताऱ्यात पाचशे एकरामध्ये भव्यदिव्य शेती उद्योग केंद्र, शेती संशोधन प्रकल्पासाठी दहा कोटींची घोषणाही केली. तर, कराड येथील संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करताना, या कार्यासाठी आठ कोटींचा निधी देत शंभूप्रेमींची मने जिंकली. संघटनात्मक वाढीचा बेतही त्यांनी साधला. कराडच्या राजकारणात सत्तेच्या पटावर दबदबा असणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव व त्यांच्या गटाला कवेत घेण्यात त्यांना यश आले. यादव गटाने आजवर कोणत्याही पक्षात जाहीर प्रवेश केला नव्हता. तर, कराडचे आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राजकारण ज्या राजेंद्र यादवांभोवती फिरत आले आहे त्यांच्यासह डझनभर माजी नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या जाहीर मेळाव्यात ‘बाळासाहेबांची शिवसेना’मध्ये दाखल झाले. या वेळी कराडच्या विकासाला पन्नास नव्हे,तर शंभर कोटीही देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याने यादवांनी मुख्यमंत्र्यांसोबत जात कराडच्या विकासाला चालना देण्याचे धोरण घेतल्याचा संदेश शहरवासियांमध्ये गेला. तर, साताऱ्याच्या सुपुत्राची कराडवर मेहरनजर राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘बाळासाहेबांची शिवसेना’लाही बळ मिळाले. हा जाहीर मेळावा पृथ्वीराज चव्हाणांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरच होत असल्याने राजकीय वर्तुळाच्या याकडे नजरा लागून होत्या. परंतु, एकनाथ शिंदेंनी चव्हाणांच्या नेतृत्वाला कुठेही डिवचले नाही हे विशेष. तर, दुसरीकडे मात्र, पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रयत्नातून झालेल्या विकासकामांच्या शुभारंभासाठी न जाण्याची खेळीही त्यांनी खेळली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराजांची विकासकामांच्या शुभारंभासाठी उपस्थित राहण्याची विनंती डावलल्याचे भाजपनेते डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक सांगत आहेत. दुसरीकडे शिंदेंनी कृष्णा विश्वस्त न्यासाच्या संकुलाला सदिच्छा भेट देऊन तेथे कौतुक सोहळा रंगल्याने सध्या भोसले गटाचा तोरा वाढल्याचे दिसते आहे. एकंदरच मुख्यमंत्र्यांचा झंझावाती दौरा बरेचकाही घडवून गेला. एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याने बाळासाहेबांची शिवसेना जोरदार चर्चेत आली आहे. सर्वसामान्यांचे राज्याचे नेतृत्व अशी छाप आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या वर्तुळाबाहेरील असलो तरी कच्चा नसून डावपेचातही माहीर असल्याचे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde visit boosted bjp shinde group politics in satara print politic news amy
First published on: 02-12-2022 at 13:25 IST