महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्याही किमतीत मुख्यमंत्रिपद हवंय, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला… मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला… मुंबईत ठाकरे गटाच्या आमदारांच्या बैठकीत भाजपाला कोंडीत पकडण्याची रणनीती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली… डॉक्टरांना मारहाण करण्याऱ्या शिंदेसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द करून त्यांची धिंड काढा, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरेंनी केली… तुळजाभवानी मातेची हजारो एकर इनाम जमीन खासगी व्यक्तींनी लाटल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी विधानसभेत केला…
“शिंदेंना कोणत्याही किंमतीत मुख्यमंत्रिपद हवंय”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्याही किमतीत मुख्यमंत्रिपद हवे आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केला. महाराष्ट्रातील काही भाग लुटून गोळा करण्यात आलेली संपत्ती राजकारणात आणली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना कोणतीही किंमत मोजून मुख्यमंत्री व्हायचे आहे. आज ते देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत आहेत. त्यांची भूक वाढली असून भविष्यात ते नरेंद्र मोदी, अमित शाह यांनाही आव्हान देतील. पूर्वी असे म्हणायचे की, पैशांचा विषय हा खोक्यांमध्ये व्हायचा, आता शिंदेंकडे कंटेनर आणि गोडाऊनमध्ये होतो. या आर्थिक ताकदीची फडणवीस आणि भविष्यात अमित शहा पुरे पडणार नाहीत. हा भस्मासूर फडणवीस-शहांच्या मानेवरही बसल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांकडून विरोधकांचा समाचार
मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली होती. त्यामुळे हा मार्ग काही तासांसाठी बंद करण्यात आला होता. त्यावर विरोधकांनी तीव्र टीका करत थेट मिसिंग लिंकच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत प्रत्युत्तर दिले. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतरही बोगद्याचे कुठेही नुकसान झालेले नाही. काही तासांतच या महामार्गावरून वाहतूक पुन्हा सुरू झाली होती; पण विरोधकांकडून ७ हजार कोटी वाया गेल्यासारखा आव आणला गेला. एखाद कोटी लोक मेल्यावर अफवा पसवणारे लोक जन्माला आले असतील, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. दहा वर्षांनंतर शिव्या देणारे राहणार नाही.;पण मिसिंग लिंक राहील, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
ठाकरे गटाच्या बैठकीत मोठी रणनीती?
गेल्या महिन्यात ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची कास धरली. त्यानंतर ठाकरे गटातील काही आमदारही शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील आमदारांची तातडीने बैठक बोलावली. मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला विधानसभेचे १९ आणि विधानपरिषदेतील पाच असे एकूण २४ आमदार हजर होते. या बैठकीत राम मंदिर चोरी प्रकरणावरून भाजपाला कोंडीत पकडण्याची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील ज्या नागरिकांची प्रभू श्रीराम यांच्यावर श्रद्धा आहे, जे हिंदुत्वाचा मान ठेवतात, अशा नागरिकांना आपल्याबरोबर घेऊन आंदोलन करावे तसेच मंदिरातील चोरीचा मुद्दा जनतेसमोर मांडावा, अशा सूचना ठाकरे यांनी आमदारांना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपासमोर ठाकरे गट खरंच मोठे आव्हान निर्माण करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आदित्य ठाकरे यांचा शिंदेसेनेवर संताप
डॉक्टरांना मारहाण करण्याऱ्या शिंदेसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द करून त्यांची धिंड काढा, अशी मागणी आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या उपचारावरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. या घटनेनंतर शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह काही जणांनी डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप झाला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्या नगरसेवकाचे पद काढून घ्या आणि त्याची कल्याण डोंबिवलीत धिंड काढा अशी मागणी मी करतो आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांच्या आरोपांमुळे खळबळ
तुळजाभवानी मातेची हजारो एकर इनाम जमीन खासगी व्यक्तींनी लाटल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्य सरकार एकीकडे हिंदुत्वाची भाषा करीत आहे. पण, राज्यातील देवस्थानच्या जमिनी सुरक्षित नाहीत. देवस्थानाच्या इनाम जमिनी खासगी व्यक्तींकडून लाटल्या जात आहेत. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला निजामाने ४,१२१ एकर जमिनी इनाम दिली आहेत. त्यापैकी हजारो एकर जमिनी खासगी व्यक्तींच्या ताब्यात आहे. काही जमीन विकली गेली आहे, तर मुख्य न्यासाला माहीत न होताच काही जमिनीवर परस्पर दुसऱ्यांची नावे लावली आहेत. तुळजाभवानी मातेला निजामाने ४,१२१ एकर जमीन दिली आहे. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी – विक्री होऊ शकत नाही, कुळ कायदा लागू होत नाही. तरीही इनाम जमिनीपैकी हजारो एकर जमीन चार मठांच्या नावाखाली खासगी व्यक्तींच्या ताब्यात आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
