Eknath Shinde Warn BJP Leader Rajan Patil : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील वाद चव्हाट्यावर आला आहे. महायुतीतील या दोन्ही मित्रपक्षांनी अनेक जिल्ह्यांमध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवसेना नेत्याच्या हत्येचा उल्लेख करताना जुने प्रकरण पुन्हा उकरून काढले आहे. यावेळी शिंदेंनी भाजपाच्या नेत्याला अप्रत्यक्षपणे इशाराही दिला आहे. नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे? त्यांनी भरसभेत कशाची शपथ घेतली? त्याविषयीचा हा आढावा…

शिंदेंचा भाजपा नेत्याला अप्रत्यक्ष इशारा

मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी जाहीर सभा घेतली. या निवडणुकीत शिंदे गटाकडून सिद्धी वस्त्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोहोळमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा राजकीय सामना रंगला आहे. रविवारच्या सभेत शिंदेंनी २००५ मध्ये झालेल्या शिवसेना नेते पंडित देशमुख हत्या प्रकरणाचा जुना मुद्दा उकरून काढला. उपस्थितांना संबोधित करताना शिंदे म्हणाले, “तुम्हाला गुंडाराज हवा आहे की विकास? शिवसेना नेते पंडित देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना अजिबात माफी मिळता कामा नये.” शिंदेंनी आपल्या भाषणात कुणाचेही नाव घेतले नसले तरी भाजपाचे नेते राजन पाटील यांच्यासाठी हा इशारा मानला जात आहे.

आरोपींना तुरुंगात पाठवण्याची घेतली शपथ

पंडित देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी राज्य सरकारकडून हरीश साळवे यांच्यासारख्या तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासनही शिंदेंनी मोहोळकरांना दिले. आमचे नेते पंडित देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर तुरुंगात पाठवले जाणार, अशी शपथही शिंदेंनी यावेळी घेतली. मोहोळमधील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करताना, ‘इथे कोणती गुंडागिरी सुरू आहे? दहशत नेमकी कशासाठी पसरवली जात आहे? महाराष्ट्र प्रगतिशील राज्य असून, येथे गुंडागिरी सहन केली जाणार नाही’, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

आणखी वाचा : Top Political News : ठाकरे गटासाठी मनसेची माघार, भाजपाचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान, वाचा ५ घडामोडी…

शिंदेंनी मोहोळकरांना काय आश्वासन दिले?

मोहोळला गुन्हेगारीतून मुक्त करायचे असेल तर आपण शिवसेनेला (शिंदे गट) मतदान करावे. मी कोणाला पाठिंबा दिला तर त्याचे परिणाम भोगायलाही तयार असतो. मोहोळमधील जनतेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. पंडित देशमुखांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. राज्यात लाडक्या बहिणी-भाऊ आणि शेतकऱ्यांना निर्भयपणे राहता आले पाहिजे. जर तुम्हाला या गोष्टी बदलायच्या असतील तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही शिवसेनेचे पॅनेल विजय करा, मी तीन डिसेंबरला मोहोळमध्ये विजयोत्सव साजरा करायला येणार आहे,” असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

पंडित देशमुख हत्या प्रकरण नक्की काय आहे?

मोहोळमध्ये २००५ साली शिवसेना नेते पंडित देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात भाजपाचे नेते राजन पाटील यांच्यासह १३ जणांवर आरोप झाले होते, अशी माहिती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिली. “बीडमध्ये संतोष देशमुख यांची जशी हत्या झाली, अगदी त्याच पद्धतीने पंडित देशमुख यांचीही क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. तरीदेखील या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकळे फिरत आहेत,” असे उमेश पाटील यांनी सांगितले. “या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वकील हरीश साळवे यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे पंडित देशमुख यांची हत्या करणारे सर्व आरोपी तुरुंगात जातील. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची आमची मागणी आहे,” असेही उमेश पाटील म्हणाले.

नगरपरिषद निवडणुकीत राजकीय वाद

नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमुळे राज्याच्या गावागावातले राजकारण तापू लागले आहे. त्यात राज्यातील सर्व प्रमुख पक्षांनी स्थानिक पातळीवर आघाडी किंवा प्रसंगी विरोधातही लढण्याची भूमिका घेतल्यामुळे राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. या सगळ्या राजकीय गोंधळाच्या केंद्रस्थानी मोहोळ तालुक्यातले अनगर नावाचे गाव आले आहे. त्यामागचे कारण म्हणजे- इथल्या नगराध्यक्षपद निवडणुकीवरून राजकीय वाद उफाळून आला आहे. या निवडणुकीत आपल्याला नामांकन अर्ज दाखल करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या उज्ज्वला थिटे यांनी केला होता. भाजपाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या काही साथीदारांनी आपल्याला धमकावल्याचे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा : “संस्कृत ही तर मृत भाषा”, उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावरून भाजपाची आगपाखड; तामिळनाडूत नेमकं घडतंय काय?

राजन पाटील यांनी मात्र हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला होता. या सुरक्षा बंदोबस्तात उज्वला थिटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, छाननीदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज नामंजूर केला. थिटे यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. या आठवड्यात त्यावर सत्र न्यायालयाचा निर्णय येईल अशी अपेक्षा थिटे यांच्या वकिलांनी व्यक्त केली आहे.

राजन पाटील यांचे पक्षांतर आणि वाद

सोलापूरचे प्रभावशाली नेते राजन पाटील यापूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, पण त्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उज्वला थिटे यांचा नामांकन अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आणि त्यांना थेट आव्हान दिले होते. त्यानंतर राजन पाटील यांनी अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबाची माफी मागितली होती. या निवडणुकीत नेमके कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.