पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पुणे जिल्ह्यात एक खासदार आणि एका अपक्षासह दोन आमदार अशी ताकद असतानाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये या शिवसेनेचा ‘आव्वाज’ क्षीण झाला. जिल्हा परिषदेत अवघ्या पाच आणि पंचायत समितीत १२ जागा अशा १७ जागा मिळवत शिवसेना तिसऱ्या स्थानी गेली. महायुतीतील भाजपमुळे अनेक ठिकाणी शिवसेना (शिंदे) पक्षाला फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यात शिवसेना (शिंदे) पक्षाचे मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले आणि शिवसेना (शिंदे) पक्षाला पाठिंबा दिलेले आमदार शरद सोनवणे असे दोन आमदार आहेत. त्यापैकी शरद सोनवणे यांनी जुन्नरमध्ये प्रतिष्ठा राखली. मात्र, पुरंदरमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडाला. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा घेतल्याने महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही मित्रपक्षांना फटका बसला.
पुरंदरमध्ये शिवतारे निष्प्रभ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू साथीदार पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे नगर परिषदेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये निष्प्रभ ठरले. शिवतारे यांच्या आग्रहास्तव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुरसुंगी आणि उरळीकांचनचा परिसर महापालिका हद्दीतून वगळून नगर परिषद तयार केली. या निवडणुकीच्या निमित्ताने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवतारे हे पुन्हा समोरासमोर आले होते. मात्र, ही नगर परिषद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात गेली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पंचायत समितीत अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आमदार शिवतारे यांच्यावर नामुष्कीची वेळ आली.
मावळमध्ये शिवसेना हतबल
मावळ लोकसभा मतदार संघात पनवेल, कर्जत आणि उरण हे तीन विधानसभा मतदार संघ कोकणातील असून, पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे तीन पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. त्यापैकी पिंपरी आणि चिंचवड हे दोन पिंपरी-चिंचवड महापालिकेत असून, मावळचा परिसर हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये येतो. मावळमध्ये शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे असले, तरी खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांमध्ये होती.
आमदार सुनील शेवळे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने भाजपचा धुव्वा उडवला. जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीमधील दहाही गणांमध्ये अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार विजयी झाले. भाजपची पंचायत समितीत २० वर्षांपासून सत्ता होती. लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव, देहूगाव नगरपंचायतीवर अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची सत्ता आणल्यानंतर आमदार शेळके यांनी ग्रामीण भागातही वर्चस्व निर्माण केले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या लढाईत शिवसेना (शिंदे) हतबल झाल्याचे दिसून आले.
जुन्नरने प्रतिष्ठा राखली
शिवसेना (शिंदे) पक्षाला जिल्हा परिषदेत जुन्नरमध्ये तीन, आंबेगाव आणि हवेलीत प्रत्येकी एक जागा मिळाली. पंचायत समितीच्या निवडणुकीत जुन्नरमध्ये आठ, पुरंदरमध्ये दोन, खेड आणि हवेलीत प्रत्येकी एक जागा मिळाली. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाची प्रतिष्ठा राखली गेल्याचे दिसून आले.
भाजपचा शिवसेना (शिंदे) पक्षाला फटका
भाजपमुळे प्रामुख्याने पुरंदर आणि भोर परिसरात शिवसेना (शिंदे) पक्षाला फटका बसला. पुरंदरमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संजय जगताप यांच्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपला दोन जागा मिळाल्या. भोरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपमध्ये गेल्याने भाजपला दोन जागा मिळू शकल्या. पुरंदर आणि भोरमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाला जिल्हा परिषदेची एकही जागा जिंकता आली नाही.

