राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, राजकीय पुढाऱ्यांनी निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विवीध कुप्त्या लढवल्या जाऊ लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या आडून मतांची बेगमी करण्याची रणनिती राजकीय पक्षांनी आखली आहे. आरती संग्रहाच्या माध्यमातून घरोघरी निवडणूकीचा छुपा प्रचार सुरू झाला आहे. याचाच प्रत्यय सध्या रायगडकरांना येत आहे. उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने आणि जोशात साजरा केला जात असतो. या सणाच्या निमित्ताने कामानिमित्ताने मुंबईत असलेलेले कोकणवासीय हमखास गावागावात दाखल होत असतात. त्यामुळे एरवी निर्जन आणि शांत असलेली गावे गजबजून गेलेली असतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे राजकीय पक्षांना आणि त्यांच्या इच्छूक उमेदवारांना सहज शक्य होऊ शकणार आहे. हीबाब लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गणेशोत्सवाचा वापर सुरू केल्याचे सध्या दिसून येत आहे. हे ही वाचा. विश्वजित कदमांचे शक्तिप्रदर्शन यशस्वी हे ही वाचा. कारण राजकारण: वसमत मतदारसंघात गुरुशिष्यात चुरशीची लढाई? अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेकापकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या चित्रलेखा पाटील यांनी घरोघरी आरतीसंग्रहाचे वाटप सुरू केले आहे. या आरती संग्रहात गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या विवीध कार्यांचा अहवाल सचित्र छापण्यात आला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणूकीची तयारी करत असलेल्या भाजपच्या दिलीप भोईर यांनीही एक आरती संग्रह प्रकाशित केला आहे. या आरती संग्रहाचे वितरणही सध्या घरोघरी सुरू झाले आहे. २०२४ च्या निवडणूकीचे व्हिजन या माध्यमातून मतदारांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रोजगार निर्मितीची क्षमता असूनही पुरेपुर वापर करुन युवकांना रोजगार मिळण्यासाठी धोरणे आखली गेली नाहीत. त्या दृष्टीने आगामी काळात पाऊले उचलण्याची ग्वाही या आरती संग्रहाच्या माध्यमातून दिलीप भोईर यांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्यसाधऊन महिलांसाठी खेळ पैठणीचा तर तरुणांसाठी गणेशोत्सव रिल्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या आडून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीचा छुपा प्रचार सुरू केला असल्याचे सध्या पहायला मिळत आहे.