औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीचे ढोल- ताशे ऐकू येऊ लागले आहेत. मतदारसंघाची बांधणी, जातीय गणिते यासह कोणते मुद्दे मतदारांपर्यंत न्यायचे याच्या आखणीला वेग आला आहे. याच काळात निवडणूक आयोगानेही राज्यात आवश्यतेनुसार नवीन मतदान यंत्रे पाठविण्याची तयारी सुरू केली असून राज्यात एक लाख ९२ हजार ७२० मतदान यंत्रे आणि एक लाख २२ हजार ३५० कंट्रोल युनिटसह १५ हजार ५७१ व्हिव्हिपॅट नवे यंत्र पाठविले जाणार आहेत. ही यंत्रे घेऊन जाण्यासाठी यंत्रणेतील अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे नियुक्त करा, अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
हेही वाचा >>> नामांतराला एमआयएम रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त करणार
ही यंत्रे बेंगळुरू येथील भारत इलेक्ट्रीकल्स लिमिटेड तयार केली असून कंपनीमधून मतदान यंत्रे घेऊन जाण्याचे वेळापत्रकही कळविण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार जुलै २़०२३ पर्यंत नवीन मतदान यंत्र व व्हिव्हिपॅट यंत्रे जिल्हास्तरावर पोहचतील. यंत्रे वाहतूक करताना जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, त्या अधिकाऱ्याचा नंबर ज्या जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे त्या जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना द्यावा, त्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था द्यावी, वाहतुकीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देखरेख करावी, सर्व यंत्रे सीलबंद वाहनानेच आणले जावेत, त्या वाहनास जीपीएस यंत्रणा बसविलेली असावी, वाहनावर निवडणूक साहित्य – तातडीचे असे शब्द असलेले फलक असावेत, त्याच्या नोंदी नीट घ्याव्यात, वाहतुकीचा खर्च कंपनीकडून करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगातील अवर सचिव आ. आ. कावळे यांनी कळविले आहे. राज्यात नव्या यंत्रांची आवश्यकता पूर्वीच कळविण्यात आल्या होत्या.
हेही वाचा >>> भाजपाचे ‘मिशन पंजाब’; व्यसनमुक्ती यात्रा आणि मोदी-शहांच्या दौऱ्यामुळे आप सरकार दबावाखाली
ती यंत्रे आता आणली जात असल्याने आता निवडणुकीसाठी यंत्रणाही कामाला लागल्याचे दिसून येत आहे. मतदान यंत्रे व व्हिव्हिपॅटची सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसमोरही तपासणी केली जाते. लोकसभा निवडणुकीचे राजकीय बिगुल वाजिवला जात आहेच आता यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.