अमरावती : मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी प्रहार जनशक्ती पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्यांचा अजूनही शिवसेना शिंदे गटात अधिकृतपणे प्रवेश झालेला नाही. त्यातच मेळघाटच्या जागेवर भाजपने दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे राजकुमार पटेल यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.
प्रहारचे जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी मेळघाटात पटेल यांच्याविरोधात उमेदवार देऊ असे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाकडून पटेल यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपला त्यांची परंपरागत जागा गमवावी लागणार आहे. भाजपने त्यांच्या वाट्याच्या जिल्ह्यातील दोन मतदारसंघात पहिल्या यादीत उमेदवार निश्चित केले आहेत. त्याचवेळी महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच असलेल्या मेळघाट, दर्यापूर, मोर्शी, तिवसा, अमरावती, बडनेरा या सहाही मतदारसंघासाठी अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही.
मेळघाटात २ लाख ९६ हजार १९६ मतदार आहेत. स्वातंत्र्यानंतर बराच काळ हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिला. त्यानंतर भाजपने या मतदारसंघात मुसंडी मारली. पटल्या गुरुजी, प्रभूदास भिलावेकर प्रत्येकी एकदा येथून निवडून आले. त्यानंतर राजकुमार पटेल कमळ चिन्हावर निवडून येत येथील आमदार बनले. भाजपने या आधारावर आपली दावेदारी प्रबळ असल्याचे म्हटले आहे.
राजकुमार पटेल हे मेळघाटातून आधी भाजपच्या व नंतर प्रहारच्या उमेदवारीवर निवडून आले. ते शिंदे सेनेकडून यावेळी निवडणूक लढल्यास येथील राजकीय समीकरण बदलू शकते. त्यामुळेच महायुती येथून कोणाला उमेदवारी देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, प्रहार व महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाने ‘थांबा आणि वाट पहा’ची भूमिका घेतली आहे.
मेळघाटातील जागा सहकारी पक्ष शिंदेसेनेसाठी भाजप सोडणार काय असा सवाल केला जात आहे. कारण, भाजप नेते सातत्याने मेळघाटातून स्थानिक उमेदवार देण्याचा दावा करून वातावरण तापवत आहेत.
हेही वाचा >>>शिंदे-फडणवीस यांची राज ठाकरेंबरोबर खलबते
यामुळे येथे भाजपविरोधात बंडखोरी होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. भाजप जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी भाजप जिल्ह्यातील ८ पैकी जास्तीत जास्त मतदार संघात उमेदवार देणार असे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीतून मेळघाट मतदारसंघातील उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राजकुमार पटेल यांनी प्रहार पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर धारणी येथे एका मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील, असा दावा त्यांनी केला होता, पण मुख्यमंत्री या मेळाव्याला येण्याचे टाळले. यावेळी राजकुमार पटेल यांचा शिंदे सेनेत प्रवेश होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यातही त्यांचा शिंदे सेनेतील प्रवेश टळला, त्यामुळे पटेल समर्थक अस्वस्थ आहेत.