शहराचे नामांतर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानण्यासाठी ‘मोदी – मोदी’ अशी झालेली घोषणाबाजी, सोबतीला ‘लव्ह जिहाद’, मुस्लिमांवर आर्थिक बहिकाराचे आवाहन, ‘जय श्रीराम’ चा उंचावत नारा अशा वातावरणात वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आमदार टी. राजासिंग ठाकूर यांचे प्रक्षोभक भाषण यातून ‘उत्तर प्रदेश निवडणुकांच्या प्रारुपाची पेरणी सकल हिंदू गर्जना मोर्चातून करण्यात आल्याचे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२७ मार्चपर्यंत हरकती आणि आक्षेप घेण्यासाठी मुदत असताना केंद्र सरकाने आधीच घेतलेला नामांतराचा निर्णय, त्याला एमआयएमसारख्या पक्षाकडून होणारा विरोध, यामुळे हिंदू- मुस्लीम ध्रुवीकरणाची वाट अधिक सरळ व सोपी करण्याच्या प्रक्रियेला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण असल्याचे दिसून येत आहे. परिणामी मोर्चानंतर ‘ हुल्लडबाजी’ करत ‘औरंगाबाद’ या नावावर काळे फासणे, नाव पुसण्यासाठी दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी आता सात गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये टी. राजासिंग ठाकूर व सुदर्शन वाहिनीचे मालक सुरेश चव्हाण के. यांच्यावरील प्रक्षोभक भाषणाच्या गुन्ह्याचाही समावेश आहे.

हेही वाचा – जतमध्ये आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले

उत्तर प्रदेशातील ‘बुलडोझर’ मोहीम महाराष्ट्रातही सुरू करा, असे आवाहन सकल हिंदू गर्जना मोर्चातून आमदार राजासिंग ठाकूर यांनी केले. अवैध जागेवर असणाऱ्या मशीदी व दर्गांवर बुलडोझर चालवा. ही कारवाई कशी करायची याची माहिती घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर बैठक करावी, अशी सूचना या वेळी करण्यात आली. आपल्या प्रक्षोभक भाषणातून मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाका, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

हिंदूंच्या या मोर्चापूर्वी औरंगाबाद येथून ‘मशिदीवरील’ भोंगे हटविण्यासाठी आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हाती घेण्यात आले होते. या मोर्चाला मनसेचाही पाठिंबा होता. या दाेन घटनांच्या मधल्या काळात केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘सेल्फी वीथ लाभार्थी’ हा कार्यक्रम घेतला. कर्ज वाटप मेळावेही घेण्यात आले. या साऱ्या उपक्रमांमधून छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची बांधणी ‘उत्तर प्रदेश निवडणूक प्रारुपाच्या’ धर्तीवर केली जात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांची कोकणातील ‘उत्तर सभा’ विस्कळित भाषणामुळे निष्प्रभ

वादग्रस्त राजासिंग हे प्रमुख वक्ते

राज्यातील बहुतांश हिंदू एकता मोर्चामध्ये प्रमुख वक्ते म्हणून तेलंगणातील आमदार टी. राजासिंग हे प्रमुख वक्ते म्हणून निवडण्यात आले. खरे तर राजासिंग यांच्यावर या पूर्वीही प्रक्षोभक भाषणे केल्याचे गुन्हे नोंदिवण्यात आले आहेत. औरंगाबादच्या सभेनंतर त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. राजा सिंग यांच्या वक्तव्यामुळे वाद वाढतो हे माहीत असूनही त्यांना राज्यात आवर्जून भाषणास बोलविण्यात येत असून गेल्या दीड महिन्यात त्यांनी राज्यात ५० हून अधिक ठिकाणी भाषणे केली असल्याचा दावा केला जात आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे गुणवर्णन करण्यासाठी राज्यातील इतिहास अभ्यासक, राजकीय नेत्यांपेक्षाही तेलंगणातील व्यक्तीचे भाषण अधिक महत्त्वाचे कसे असू शकते, या प्रश्नाच्या उत्तरातही उत्तर प्रदेश निवडणुकीचे प्रारूप लपले असल्याचे मानले जात आहे.

मोर्चानंतर सात गुन्ह्यांची नोंद

सकल हिंदू गर्जनानंतर पाट्या काढून टाकणारे, बसवर दगडफेक करणारे तसेच ‘आय लव्ह औरंगाबाद’ असा मजकूर असणारे फलक फोडणाऱ्या तरुणांवर सात गुन्हे नोंदण्यात आली असून प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल टी. राजा सिंग यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोर्चामध्ये २० ते ३५ वयाेगटांतील तरुणांची गर्दी असावी यासाठी आयोजकांनी बरीच मेहनत घेतल्याचेही दिसून येत होते.

हेही वाचा – केरळमध्ये संघाचा ख्रिश्चनांशी संवाद, तर मुस्लिमांशीही चर्चा करण्यास तयार

दोन्ही बाजूने ध्रुवीकरण

नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामुळे ‘एमआयएम’ मधील अंतर्गत नाराजीचे विषय बाजूला पडून आपोआप ध्रुवीकरण झाले. मेणबत्ती मोर्चा आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील निदर्शनांमुळे झालेले ध्रुवीकरण अधिक मजबूत करणाऱ्या उपक्रमांची सध्या जंत्री सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आक्रमक भाषणांचा जोर वाढला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emphasis on polarization of votes from both sides over aurangabad city name change ssb
First published on: 20-03-2023 at 16:15 IST