नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे नेते एकवटल्याचे चित्र सध्या दिसत असले तरी नवी मुंबईत मात्र भाजप नेते गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांमधील मनोमिलनाचे प्रयत्न नवोदित खासदार नरेश म्हस्के यांनीही सोडून दिल्याने चित्र सध्या दिसू लागले आहे. खासदार म्हणून निवडून येताच म्हस्के यांनी नवी मुंबईतील महायुतीच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी घेतल्या. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेत असताना शिंदे सेनेचे नेते म्हस्के यांच्यासोबत आवर्जून उपस्थित होते. मात्र गणेश नाईक यांच्या खैरणे एमआयडीसी येथील दरबारात जात असताना शिंदेसेनेतील महत्वाच्या नेत्यांनी आणि प्रभावी नगरसेवकांनी म्हस्के यांची संगत केली नाही. यामुळे म्हस्के याच्या प्रयत्नानंतरही नवी मुंबईत शिंदेसेना आणि नाईकांमधील दरी कायमच असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पक्षाच्या नेत्यांनी बराच जोर लावला होता. या जागेसाठी भाजपकडून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचे नाव जवळपास पक्के मानले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र तसे होऊ दिले नाही. हा मतदारसंघ शिंदेसेनेला आणि त्यातही मुख्यमंत्री समर्थक नरेश म्हस्के यांना सोडताच नवी मुंबईतील भाजपच्या एका मोठया वर्गात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे पहायला मिळाले. गणेश नाईक यांच्या कट्टर समर्थकांनी सुरुवातीला थेट बंडाची भाषा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर मात्र हे चित्र निवळले. कार्यकर्त्यांची नाराजी, आगरी-कोळी समाजातील अस्वस्थता, कडव्या नाईक समर्थकांकडून होणारी बंडाची भाषा यामुळे नवी मुंबईत म्हस्के यांचा टिकाव लागणार नाही असेच चित्र होते. मात्र संपूर्ण नाईक कुटुंब म्हस्के यांच्या प्रचारात उतरले आणि नरेंद्र मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागू लागले. स्वत: नरेश म्हस्के यांनी नाईक कुटुंबिय नाराज रहाणार नाहीत यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. निवडणुक निकालानंतर बेलापूर मतदारसंघात १२ हजार तर ऐरोलीत ९ हजार मतांचे मताधिक्य म्हस्के यांना मिळाले. मागील लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत महायुतीच्या उमेदवाराला मिळालेले हे मताधिक्य कमी असले तरी नाराजीचा हंगामातही नवी मुंबईतून राजन विचारे यांना मताधिक्य मिळाले नाही ही म्हस्के यांच्यासाठी उजवी बाजू ठरली.

आणखी वाचा-“मतं दिली नाहीत म्हणून मुस्लिमांची कामं करणार नाही”; हे वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार कोण आहेत?

विजयानंतरही नाराजी कायमच ?

खासदार म्हणून निवडून येताच काही दिवसातच म्हस्के यांनी नवी मुंबईचा दौरा केला. या दौऱ्यात स्वपक्षीय नेत्यांसह भाजपचे आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. पहिल्या दिवसाच्या दौऱ्यात म्हस्के यांच्यासोबत शिंदेसेनेचे प्रमुख नेते दिसले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेताना विजय नहाटा यांच्यासह पक्षाचे प्रमुख माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. मनसेच्या कार्यालयाला भेट देतानाही म्हस्के यांची सोबत पक्षाचे नेते होते. पहिल्या दिवसाचा दौरा आटोपल्यानंतर म्हस्के यांनी दुसऱ्या दिवशी खास गणेश नाईक यांची भेट घेण्यासाठी नवी मुंबईत येणे केले. नाईकांच्या खैरणे एमआयडीसी भागातील आलिशान कार्यालयात म्हस्के पोहचले खरे मात्र त्यांच्यासोबत नवी मुंबईतील शिंदेसेनेचा एकही बडा नेता फिरकला नाही. पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले, नेते विजय नहाटा याशिवाय बहुसंख्य प्रभावी माजी नगरसेवकांनी नाईकांच्या दरबारात हजेरी लावली नाही. नाईक कुटुंबियांनी त्यांच्या समर्थकांसह म्हस्के यांचे औचित्यपुर्ण स्वागत केले. मात्र शिंदेसेनेतील ठराविक नेत्यांची अनुपस्थिती सर्वांनीच गृहीत धरल्यासारखे चित्र यावेळी होते.

आणखी वाचा-उत्तर प्रदेशातल्या मतघसरणीची कारणं काय? भाजपा प्रत्यक्ष मैदानात उतरून घेणार आढावा

लोकसभेची निवडणुक औपचारिकता ?

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून म्हस्के यांच्यासाठी कार्यरत रहाणे ही केवळ पक्षीय औपचारिकता होती. नवी मुंबईत शिंदेसेनेच्या ठराविक नेत्यांसोबत संघर्ष कायम असेल अशी प्रतिक्रिया नाईक समर्थक एका नेत्याने लोकसत्ताशी बोलताना दिली. नवी मुंबईत कमी मताधिक्य मिळाले अशी चर्चा होत असली. तरी एकंदर वातावरण पहाता २२ हजारांचे मताधिक्य कमी आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही असेही या नेत्याने स्पष्ट केले. संपूर्ण नाईक कुटुंबिय म्हस्के यांच्या प्रचारात होते आणि ठराविक काळात घडलेल्या प्रकाराची नाराजी दूर करण्याचे आव्हानही आम्ही पेलले असा दावाही या नेत्याने केला. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही काम करु अशी प्रतिक्रिया पक्षाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even after the victory in thane ganesh naik and eknath shinde not coming together print politics news mrj
First published on: 20-06-2024 at 11:37 IST