नाशिक : भाजपमध्ये कोणत्याही वादग्रस्त, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला थारा दिला जाणार नाही, अशी डरकाळी वेळोवेळी फोडणारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिवसेनेतून (उद्धव ठाकरे) हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या बाबतीत मात्र स्थानिकांचा विरोध असतानाही भाजप प्रवेशासाठी पायघड्या घालू पाहत आहेत. बडगुजर यांच्यावर विविध प्रकारचे १७ गुन्हे दाखल असून कारवाई टाळण्यासाठी ते भाजपमध्ये येण्याची धडपड करीत असल्याकडे पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले असतानाही साधनशुचितेचा वारंवार डांगोरा पिटणाऱ्या भाजपची अशी कोणती अपरिहार्यता निर्माण झाली आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप मागील वर्षी भाजपचे नितेश राणे यांनी विधानसभेत छायाचित्र दाखवून केला होता. तेव्हा सरकारने विशेष पथकामार्फत चौकशी करून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी भाजपचे स्थानिक आमदार तसेच पदाधिकारी बडगुजर यांच्यावर तुटून पडले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून बडगुजर यांच्याविरोधातील प्रचारात हाच मुद्दा गाजला होता. वादग्रस्त बडगुजर विरुध्द सौम्य सीमा हिरे या लढतीत मतदारांनी हिरे यांच्या बाजूने कौल दिला. आणि बडगुजर यांना सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. आता त्याच बडगुजर यांचे असे कोणते गुण भाजप प्रदेशाध्यक्षांना भावले की, स्वपक्षीय आमदार सीमा हिरे यांनी केलेल्या विरोधाकडे दुर्लक्ष करण्याची गरज त्यांना वाटू लागली आहे.

हिरे यांनी बडगुजर यांच्याविरोधात निवडणूक लढवली असल्याने समज-गैरसमज दूर होण्यास वेळ लागतो. त्याला फार महत्व देण्याची गरज नाही, अशी मल्लीनाथी करुन बावनकुळे यांनी एकप्रकारे हिरे यांनाच फटकारले. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात. न्यायालयात आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत संबंधित व्यक्ती गुन्हेगार नसतो. याचा विचार करून कुणाचेही मूल्यमापन व्हायला हवे, असे सूचक विधानही बावनकुळे यांनी केले असल्याने बडगुजर यांना स्थानिक पातळीवर कोणाचाही आणि कितीही विरोध असला तरी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्यापुढे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय राहतो.

कुठे ?

बडगुजर यांना प्रवेश देण्यासाठी उतावीळ होण्याची काही कारणे आहेत. त्यात आगामी कुंभमेळा हे त्यापैकी एक आहे. कुंभमेळ्यासाठी महापालिकेवर एकहाती सत्ता असणे भाजपसाठी महत्वाचे आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत एकेक जागा जिंकण्यासाठी आतापासूनच त्यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. बडगुजर हे आपल्याबरोबर काही माजी नगरसेवकही घेऊन येतील, असा भाजपचा होरा आहे. त्यातच महापालिकेतील म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष असलेले बडगुजर बडे ठेकेदार असल्याने कुंभमेळ्याच्या दृष्टीने पालिकेतील ठेकेदारीचे गणित सोडविण्याचा प्रयत्नही भाजपकडून निश्चितच होणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, बडगुजर हे अनेक गुन्ह्यांमध्ये अडकले असल्याने तसेच त्यांच्या मुलावरही माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरील हल्ल्याप्रकरणात गुन्हा दाखल असल्याने या सर्व गुंत्यातून सुटण्यासाठी भाजप प्रवेशाशिवाय पर्यायच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्या अगदी जवळचे असूनही त्यांनी जाहीरपणे पक्षाविरुध्द नाराजी व्यक्त करणे आणि पक्षाचा रोष ओढवून घेणे, ही जाणीवपूर्वक केलेली कृती मानली जात आहे.