नगरः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे व त्यांचे पुत्र निवडणुकीतील अपक्ष उमेदवार, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून जिल्हा काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. डॉ. सुधीर तांबे यांच्यावर प्रदेश काँग्रेसने केलेल्या कारवाईला आव्हान देत पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष साळुंखे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक समजले जातात.

सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणाऱ्या जिल्हाध्यक्षांना प्रदेश काँग्रेसने आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यातूनच तांबे यांच्या उमेदवारीने जिल्हा काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे उघड होत आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीसंदर्भात त्यांचे मामा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे जिल्हा काँग्रेस संभ्रमावस्थेत असतानाच दुसरीकडे त्यांचेच कट्टर समर्थक असलेल्या जिल्हाध्यक्षांनी तांबे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.

DCM Devendra Fadnavis On Congress
“मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…

हेही वाचा – “लोकसभा निवडणुकीसाठी ४०० दिवस बाकी, त्यामुळे मुस्लीम समाजापर्यंत…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यकर्त्यांना आवाहन

ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना जिल्हा काँग्रेसमध्ये, पक्षांतर्गत विरोधक राहिलेला नाही. थोरात यांचा एकछत्री अंमल जिल्हा काँग्रेसवर निर्माण झालेला आहे. एखाद दुसरा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी त्यांचे समर्थक आहेत. पक्ष संघटनेवरही थोरात यांचेच पूर्णतः वर्चस्व आहे.

नातेसंबंधामुळे डॉ. सुधीर तांबे व सत्यजित तांबे यांचे राजकारण थोरात यांच्यावरच बहुतांशी अवलंबून राहिलेले आहे. त्यातून डॉ. तांबे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या रस्त्याने वाटचाल सुरू करून आपले अस्तित्व निर्माण केले. आता थोरात यांची कन्या जयश्री त्यांची वारसदार म्हणून पुढे येत आहे. यापूर्वी विखे गटाने थोरात गटाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळू नये यासाठी सत्यजित तांबे यांना हे पद मिळू दिले नव्हते. मात्र, त्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळवण्यासाठी सत्यजित तांबे यांना, तसेच सुजय विखे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळवताना दोन्ही गटाने परस्परांना मदत केल्याची उदाहरणेही आहेत. परंतु, विखे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जिल्हा काँग्रेसवर थोरात यांचे एकछत्री वर्चस्व निर्माण झालेले आहे.

हेही वाचा – सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीवर अशोक चव्हाणांचं वक्तव्य; म्हणाले, “माणसं फोडून…”

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करूनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने व सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोघांवरही प्रदेश काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नेते थोरात यांनी या सर्व घडामोडींपासून स्वतःला दूर ठेवत कोणतीही भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. असे असताना त्यांचेच कट्टर समर्थक जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी मात्र डॉ. सुधीर तांबे यांच्यावरील कारवाई चुकीची ठरवत सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

साळुंखे यांची ही भूमिका म्हणजे खरे तर प्रदेश काँग्रेसला दिलेले सरळसरळ आव्हानच समजले जाते. जिल्हाध्यक्षांनीच पाठिंबा जाहीर केल्याने अप्रत्यक्षपणे ती थोरात यांचीच भूमिका नाही ना याबद्दल जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसने याबद्दल जिल्हाध्यक्ष साळुंखे यांना खुलासा मागवणारी नोटीस पाठवली आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस (प्रशासन व संघटन) प्रमोद मोरे यांनी ही नोटीस पाठवली आहे. आपण नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून आपण ही माहिती दिली का? याचा खुलासा दोन दिवसांत प्रदेश कार्यालयाकडे लेखी स्वरुपात पाठवावा, असे नोटीसीत म्हटले आहे.

हेही वाचा – Bharat Jodo Yatra : ‘लाल चौक हा तर संघाचा अजेंडा, आम्ही काँग्रेसच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवणार;’ काँग्रेसची माहिती

थोरात यांच्या संमतीशिवाय जिल्हाध्यक्ष प्रदेश काँग्रेसच्या कारवाईला आव्हान देऊ शकत नाही. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसने तातडीने जिल्हाध्यक्षांना नोटीस बजावत एकप्रकारे सत्यजित तांबे यांची कोंडीच करण्याचा प्रयत्न केला आहे. नगर जिल्ह्यातून तांबे यांना समर्थन मिळू नये, अशी भूमिका त्यामागे दिसते. थोरात यांच्या वर्चस्वाखालील जिल्हाध्यक्ष प्रदेश काँग्रेसला आव्हान देत तांबे यांना पाठिंबा देतो, यातच थोरात यांची भूमिका स्पष्ट होते, असा दावा काहीजण करत आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्हाध्यक्ष साळुंखे यांच्यावर प्रदेश काँग्रेसकडून कोणती कारवाई केली जाते व त्यातून थोरात यांचीही कोंडी केले जाते काय, याकडे लक्ष राहणार आहे.