पुणे जिल्ह्यातील प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले व त्यांनी भोर आणि आळंदी या दोन नगर परिषदांच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठीसभा घेतसल्या. मात्र, बारामतीत जाणे त्यांनी टाळले. बारामतीत भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाशी युती करून अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’समोर आव्हान उभे केले आहे. बारामतीत न जाता फडणवीस यांनी मित्रत्वाला प्राधान्य दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस हे बारामतीत सभा घेणार का, याबाबत उत्सुकता आहे
नगर परिषद आणि नगर पंचयतीच्या निवडणुकांमध्ये प्रचाराच्या काळात महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या तीन मित्रपक्षांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेऊन प्रचाराचा धुराळा उडविला. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) या पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरविल्याने एकही जाहीर सभा झाली नाही. त्यामुळे खरी लढत ही महायुतीतील तीन मित्रपक्षांमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी दहा नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. २६ नोव्हेंबरला उमेदवार अंतिम झाल्याने प्रचाराचा धडाका सुरू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यावर त्यांचे प्राबल्य राहिले आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच भाजपने त्यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे मागील १२ दिवसांत अजित पवार यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन जिल्हा पिंजून काढला. बारामतीतील माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीपासून त्यांनी सुरुवात केली. त्याच दिवशी बारामतीत सभा घेऊन प्रचाराचा आरंभ केला. त्यानंतर त्यांनी सभांचा धडाका लावला. अजित पवारांच्या विविध वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले.
भाजपचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उमेदवार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील प्रचारात मागे राहिले नाहीत. त्यांनी भोर आणि आळंदी या ठिकाणी सभा घेतल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील पुण्याकडे लक्ष दिले. त्यांनी जुन्नर, मंचर येथे सभा घेऊन पक्षाचे अस्तित्त्व दाखवून दिले.
महायुतीतील हे तिन्ही नेते जाहीर सभा घेऊन पुणे जिल्ह्यात प्रचाराची राळ उठवत असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र प्रचाराबाबत निरुत्साह दिसून आला. महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवर सभा घेण्यात आल्या. मात्र, महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवरील एकाही नेत्याची जाहीर सभा झाली नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जेजुरी, सासवड आणि फुरसुंगी-उरुळी देवाची येथे सभा घेतल्या. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे किंवा अन्य कोणत्याही नेत्याने जाहीर सभा घेतली नाही. याशिवाय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांपैकीही कोणी फिरकले नाहीत.
अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात १२ दिवसांत १४ सभा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर २१ नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरुवात केली. माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या प्रचारासाठी श्री भैरवनाथ महादेव मंदिर येथे, तर त्याच दिवशी बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर येथे जाहीर सभा घेऊन प्रचाराचा आरंभ केला. त्यानंतर १२ दिवस त्यांनी जिल्ह्यात १४ ठिकाणी सभा घेतल्या. भोर, दौंड, इंदापूर, राजगुरुनगर, चाकण जुन्नर, शिरुर, मंचर, जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची या ठिकाणी सभा घेतली. आळंदी येथे सभा घेऊन पुणे जिल्ह्यातील प्रचाराची सांगता केली. पुणे जिल्ह्याशिवाय बीड, माजलगाव, जिंतूर, धारुर आणि म्हसवड येथेही त्यांनी सभा घेतल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोर आणि आळंदी येथे जाहीर सभा घेतल्या. भोरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फडणवीस यांनी सभा घेतली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ऐन निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पक्षात प्रवेश देवून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. या ठिकाणी अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे आमदार शंंकर मांडेकर हे आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या पक्षात लढत आहे. या नगर परिषदेवर भाजपची सत्ता आहे.
