वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील बंडू इंगोले यांची मुळातच दोन एकर शेती. या दोन एकरातील सोयाबीन पूर्णत: पावसात धुवून गेले. अतिवृष्टीमध्ये जलेश्वर नदीला पूर आला. त्यात एक म्हैस-वासरू वाहून गेले. आता त्यांच्यासमोरचे प्रश्न अधिक किचकट झाले आहेत. कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव येथील शेतकरी पुंडलिक वाघमारे यांचे जगणेही आता मुश्किल झाले आहे. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील सात लाख ४ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होऊन मदतीची मागणी केल्यानंतर निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने  जाहीर केलेला असला, तरी ती मदत मिळणार कधी, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड, हिंगोली या दोन जिल्ह्यांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची शेती खरवडून गेली आहे. पिकेही हातची गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिवसेनेकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आल्यानंतर अंबादास दानवे यांनी नुकताच या भागाचा दौरा केला. तत्पूर्वी अजित पवार यांनीही शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. पण नदीकाठच्या काही शेतकऱ्यांचे सारेच वाहून गेल्याने त्यांच्या अडचणी खूप अधिक आहे. मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील ३२९ हेक्टर जमीन वाहून गेली आहे. जवळपास चार लाख ४८ हजार ७५४ हेक्टर जमिनीवरची पिके बाधित झाली आहेत.

नांदेड जिल्ह्यात रस्ते व पूल वाहून जाण्याच्याही घटना अधिक असल्याने त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या निकषापेक्षा दुप्पट मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पण ही मदत कधी मिळेल, कशी मिळेल हे प्रश्नच आहेत कारण अद्याप मदती संदर्भातील आदेश प्रसृत झाले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवे सरकार शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असा संदेश देत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी कशी होते, यावर बरेच काही अवलंबून आहे.

मदत देताना ‘ऑनलाइन’चे घोळ नेहमी घातले जातात. अद्याप आदेश आलेले नसल्याने शेतकरी मदतीची वाट पाहत आहे. अनेक शेतकऱ्यांचे जगणे आता मुश्किल झाले आहे. बंडु इंगोले म्हणतात, दोन एकरावरील सारे सोयाबीन वाया गेले. नदीकाठची जमीन असल्याने नुकसान दरवेळी होते. पण या वेळी रब्बीमध्येही काही हाती लागणार नाही. कारण जमीनच खरवडून गेली. अतिवृष्टीमधील नुकसान भरपाई देण्याचा कालावधी कमी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था निर्माण करायला हवी, अशी मागणी आता केली जात आहे. सत्ताधारी भाजप व शिंदे गटाच्या वतीने पाहणीचे फारसे दौरे झाले नाहीत. मात्र घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

असे आहे मराठवाड्यातील नुकसान

– मराठवाड्यातील ४५० महसूल मंडळापैकी २०७ महसूल मंडळांत अतिवृष्टी

– सर्वाधिक नुकसान नांदेड व हिंगोली जिल्ह्यात

– या पावसाळ्यात पुरात वाहून गेलेले व वीज पडून मृत्यू झालेल्या ५२ व्यक्ती

– मृत जनावरांची संख्या ७४६

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers from marathwada are totally disturb due to heavy rain print politics news pkd
First published on: 14-08-2022 at 20:52 IST