scorecardresearch

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला गडचिरोलीत ‘मेडीगड्डा’चा अडथळा !

सिरोंचा तालुक्याला दरवर्षी पुराच्या गर्तेत ढकलणारे मेडीगड्डा धरण भारत राष्ट्र समिती या पक्षाला मोठा अडथळा ठरणार आहे.

Gadchiroli , Medigadda , K. Chandrashekar Rao, Bharat Rashtra Samiti
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला गडचिरोलीत 'मेडीगड्डा'चा अडथळा ! ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

सुमित पाकलवार

गडचिरोली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समितीच्या विस्ताराकरिता प्रथम महाराष्ट्राची निवड करून त्यातही सीमेवरील तेलुगू भाषकांवर लक्ष केंद्रित केले असले तरी गडचिरोली या सीमावर्ती भागात मात्र मेडीगड्डा धरणाचा नवीन पक्षाला अडथळा ठरू लागला आहे. कारण या धरणामुळे आपण विस्थापित होऊ अशी नागरिकांमध्ये भीती असून, यातूनच तेलंगणा सरकारच्या विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे.

५ फेब्रुवारीला नांदेड येथील सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपल्या नव्या राष्ट्रीय पक्षाचा (भारत राष्ट्र समिती) महाराष्ट्रातील अधिकृत प्रवेश जाहीर केला. यावेळी काही नेत्यांचा पक्षप्रवेश देखील झाला. मात्र, यातील बहुतांश जनाधार गमावलेले नेते आहेत. अशी चर्चा होती. या नेत्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेचे माजी आमदार व आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते दीपक आत्राम यांच्या ‘बीआरएस’ प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. दीपक आत्राम यांनी २०१९ ला काँग्रेसकडून विधानसभा लढविली. यात त्यांनी लक्षणीय मते घेतली होती. त्यामुळे ‘केसीआर’ यांचे या विधानसभेवर विशेष लक्ष आहे.

हेही वाचा… माजी मुख्यमंत्रीच असुरक्षित पोलिसात तक्रार

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला सुरुवात; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

अहेरी विधानसभेची बहुतांश सीमा तेलंगणाला लागून आहे. त्यामुळे येथील नागरिकांची पूर्वीपासूनच तेलंगणाशी नाळ जुळलेली आहे. या भागात तेलुगू भाषा बोलली जाते. त्यामुळे चंद्रशेखर राव यांना त्यांच्या पक्षासाठी गडचिरोली जिल्हा विधानसभा प्रवेशाचा मार्ग ठरू शकतो हे चांगलेच ठाऊक आहे. परंतु सिरोंचा तालुक्याला दरवर्षी पुराच्या गर्तेत ढकलणारे मेडीगड्डा धरण या पक्षाला मोठा अडथळा ठरणार आहे. दीपक आत्राम यांच्या ‘बीआरएस’ प्रवेशानंतर या भागातील धरणग्रस्तांमध्ये उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया विचार करायला लावणाऱ्या आहे. आत्राम यांनी भूतकाळात मेडीगड्डा धरणाला विरोध केला होता. त्यावेळेस ते ‘केसीआर’बद्दल जे बोलले त्याची चित्रफीत समाज माध्यमा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याबद्दल दीपक आत्राम यांचे कार्यकर्ते, याविषयी के चंद्रशेखर राव यांच्याशी बोलणे झाले असून लवकरच मेडीगड्डा धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे ठामपणे बोलताना दिसून येतात. त्यामुळे हा प्रश्न वेळीच न सोडवल्यास सीमाभागात ‘बीआरएस’ला निवडणुकीत मोठ्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. तर दुसरीकडे दीपक आत्रामांच्या ‘बीआरएस’ प्रवेशाने आदिवासी विद्यार्थी संघात उभी फूट पडली आहे. आवीसचे त्याभागातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे आत्राम यांनी विश्वासात न घेतल्याची खंत बोलून दाखवीत आहे. त्यामुळे पुढे होणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची दिशा ठरविणारी राहील. तर नव्या राजकीय पक्षाच्या प्रवेशाने प्रस्थापित राजकारणी देखील यावर लक्ष ठेऊन आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 11:30 IST