सांगली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने तासगावसह सांगलीच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचा खुलासा संजयकाका पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा >>> मराठवाड्यात शिंदे गटाला जागांचा तोटा? अनेक मतदारसंघांवर दावा सोडण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची उमेदवारी दोन महिन्यांपूर्वीच खा. पवार यांनी कवठेमहांकाळ येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार पाटील यांनीही एका पराभवाने आपण खचून जाणार नसून, विधानसभेची निवडणूक ताकतीने लढविण्याचे संकेत तासगावमधील दहीहंडी कार्यक्रमात दिले होते. तसेच भाजपचे मतदारसंघ प्रचारप्रमुख प्रभाकर पाटील यांना साथ द्यावी, असे आवाहन करीत चिरंजीवाच्या उमेदवारीचे अप्रत्यक्ष संकेतही दिले.

या पार्श्वभूमीवर बुधवारी पाटील यांनी खा. पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर सांगलीसह तासगाव तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, या भेटीत कोणती राजकीय खलबते पार पडली याबद्दल तर्क-वितर्क लढविले जात आहेत. या भेटीसंदर्भात माजी खासदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, ही भेट केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निमंत्रण देण्यासाठी होती. पुतळा उभारणी समितीचा मी स्वागताध्यक्ष आहे. या नात्याने ज्येष्ठ नेते खा. पवार यांची भेट घेतली, असे त्यांनी सांगितले.