अखिल भारतीय काँग्रेसमध्ये होणाऱ्या पुनर्रचनेनंतर राज्यातील कोणत्या नेत्याला पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळते याकडे नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दिल्लीत काम करण्याची इच्छा असली तरी पक्ष नेतृत्व कोणता निर्णय घेते यावर सारे अवलंबून असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड होणार हे निश्चित. त्यानंतर पक्षाची कार्यकारी समिती, सरचिटणीस, राज्य प्रभारी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या होण्याची चिन्हे आहेत. यात महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाते याची पक्षाच्या कार्यकर्त्यांना आतापासूनच उत्सुकता आहे. 

हेही वाचा- Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद

पक्ष संघटनेत राज्यातील मुकुल वासनिक हे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. खासदारकी, केंद्रात मंत्रिपद, सरचिटणीस अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. पण तळागाळात काहीच जनाधार नाही, अशी त्यांची अवस्था. रामटेक मतदारसंघातून निवडून येणे त्यांना कठीण. कायम दिल्लीत दरबारी राजकारण करण्यावरच त्यांचा भर राहिला. काँग्रेस अध्यक्षपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत आले होते. दलित समाजातील नेता म्हणून अ. भा. काँग्रेसमध्ये त्यांना महत्त्व मिळत गेले. काँग्रेस अध्यक्षपदी निवड होणारे हे खरगे हे दलित समाजातील नेते आहेत. यामुळे वासनिक यांचे महत्त्व आपसूकच कमी होईल, असे मानले जाते.  राज्यातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास इच्छुक आहेत. यापूर्वी त्यांनी २० वर्षे दिल्लीत काम केले आहे.  पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री तसेच पक्षात सरचिटणीसपद ही दोन महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. पण पक्षातील बदलत्या रचनेत त्यांचे  महत्त्व कमी होत गेले. राज्यातील अन्य नेत्यांचे त्यांना पूर्ण समर्थन नाही. ही बाब त्यांच्यासाठी प्रतिकूल ठरू शकते. 

हेही वाचा- सोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, रजनी पाटील आदी संघटनेतील नेते आहेत. रजनी पाटील या राज्यसभा खासदार आणि राज्याच्या प्रभारी आहेत. अशोक चव्हाण वा बाळासाहेब थोरात यांची पसंती दिल्लीपेक्षा राज्यात काम करण्यात अधिक आहे. नागपूरचे अविनाश पांडे हे माजी सरचिटणीस आणि झारखंडचे प्रभारी आहेत. पण राज्याच्या राजकारणाशी त्यांचा फार काही संबंध आलेला नाही. संजय दत्त हे हिमाचलचे सहप्रभारी आहेत. त्यांचीही राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या पदावर काम करण्याची इच्छा आहे. राजीव सातव यांनी दिल्लीत अल्प कालावधीत जम बसविला होता पण करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला. राज्यातून त्यांची जागा घेईल, असे तरुण  नेतृत्व अद्याप तरी पुढे आलेले नाही.

हेही वाचा- राजस्थान : काँग्रेसच्या अंतर्गत वादामध्ये भाजपाची उडी; ९० आमदारांचे राजीनामे प्रलंबित ठेवल्याचं म्हणत कोर्टात मागणार दाद?

 अमित देशमुख, मिलिंद देवरा, प्रतिक पाटील, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सकपाळ, पृथ्वीराज साठ्ये, सचिन नाईक, बाजीराव खाडे आदी  तरुण पिढीतील नेत्यांना पक्षाने राष्ट्रीय पातळीवर सचिव किंवा अन्य जबाबदारी सोपविली होती. पण स्वतःची छाप पाडण्यात हे तरुण किंवा दुसऱ्या पिढीतील नेते तेवढे अजून तरी यशस्वी झालेले नाहीत. पक्ष संघटनेत काम करीत असले तरी स्थानिक पातळीवर किंवा राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कार्याची छाप अजून तरी पडलेली दिसत नाही. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former chief minister prithviraj chavan is willing to work at the national level dpj
First published on: 02-10-2022 at 11:35 IST