धुळे – काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी आमदार कुणाल पाटील यांची भाजप प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मजबूत स्तंभ यानिमित्ताने ढासळविण्यात भाजप यशस्वी झाले आहे. यामुळे धुळे जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व टिकविण्याचे राज्यस्तरीय नेत्यांपुढे आव्हान राहणार आहे.
विशाल खान्देशचे नेते अशी ओळख निर्माण केलेले माजी मंत्री रोहिदास पाटील हे काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांचे वडील. पाटील घराणे हे कायमच काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे. कुणाल यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक माजी खासदार चुडामण आनंदा पाटील यांचाही राजकारणात दबदबा होता. रोहिदास पाटील यांनीही वडिलांचा राजकीय वारसा जपला. जिल्हा परिषद सदस्यपासून राजकीय कारकिर्द सुरु करणारे रोहिदास पाटील पुढे कायमच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहिले. सलग सात वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी कृषी व फलोत्पादन, कामगार,रोजगार, ग्रामविकास, पाटबंधारे, गृहनिर्माण पुनर्बांधणी, संसदीय कार्य,कृषी व पशुसंवर्धन अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून पदभार सांभाळला. तब्बल २२ वर्ष ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.
रोहिदास पाटलांचा राजकीय वारसा कुणाल पाटील यांच्याकडे आल्यावर त्यांनीही काँग्रेसशी असलेली पाटील परिवाराची नाळ कायम ठेवली. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील हे विजयी झाले. २०१९ मध्ये धुळे जिल्ह्यातून काँग्रेसचे विजयी झालेले ते एकमेव आमदार होते. प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने त्यांची खासदार राहुल गांधी यांच्याशी जवळीक झाली. २०२४ च्या निवडणुकीत मात्र कुणाल पाटील यांचा राघवेंद्र (राम) भदाणे या भाजपच्या नवख्या उमेदवाराकडून पराभव झाला.
२०१९ च्या लोकसभा मिवडणुकीवेळी कुणाल पाटील हे भाजपच्या तंबुत जातील, अशी चर्चा रंगली होती. परंतु, काँग्रेसनिष्ठ घराणे ही पार्श्वभूमी त्यांच्यासाठी अडचणीची ठरत होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या विजयात पाटील यांनी केलेल्या प्रचाराचा मोठा वाटा होता.
भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे आता कुणाल पाटील यांनी काँगेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्षाविना राहिलेल्या काँग्रेसमधून पाटील हे बाहेर पडल्यावर जिल्ह्यात भाजपची ताकद अधिकच वाढणार आहे. पाटील यांच्या प्रवेशाने भाजपमधील काही प्रस्थापितही अस्वस्थ झाले आहेत. कुणाल पाटील हे जिल्ह्यातील एक प्रभावी नेतृत्व मानले जात असल्याने भाजपकडून त्यांना भविष्यात मोठी जबाबदारी सोपविली जाऊ शकते. तूर्तास, धुळे जिल्ह्यातील पूर्वापार काँग्रेसशी निष्ठावान राहिलेले घराणे ही ओळख आता यामुळे पुसली जाणार आहे.