कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द या जिल्हा परिषद मतदार संघातील अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचा निकाल हा जिल्ह्यातील मोठे नाव असलेल्या गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे पानिपत करणारा असला तरी त्याला गोकुळ दूध संघ आणि करवीर विधानसभा निवडणूक निकालाचा संदर्भ जोडला गेला आहे. या दोन्ही निवडणुकीत दुखावले गेलेले माजी आमदार महादेवराव महाडिक आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचे संदर्भ जोडले गेले आहेत. सोयीसाठी गट बदलाचा कसा फटका बसतो हे या निकालाने दाखवून दिले असल्याने त्याची जिल्ह्याच्या राजकारणात भलतीच चर्चा होत आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक अटीतटने लढली गेली. काँग्रेसने सत्ता टिकवण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. पण महायुतीने येथे आपला झेंडा रोवला. काही मतदारसंघातील निकाल जितके लक्षवेधी ठरले तितके त्याची चर्चाही होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधून गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी काँग्रेसला रामराम करीत शिंदे सेनेत प्रवेश करून पुत्र सचिन यांना पाडळी खुर्द मतदारसंघात उतरवले. काँग्रेसचे दिवंगत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या पश्चात करवीर मतदार संघात त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी निवडणूक लढवली होती. राहुल पाटील यांचा पराभव करीत शिंदेसेनेचे चंद्रदीप नरके यांनी मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयाची नोंद केली. अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाल्याचे शल्य राहुल पाटील यांना होते.

पराभवास कारणीभूत ठरलेल्या घटकात विश्वास पाटील यांचे नाव त्यांच्या यादीत अग्रक्रमावर होते. त्यामुळे पाटील यांच्या घरातील कोणीही निवडणूक उतरवला तरी त्याच पराभूत करायचे हे ध्येय ठेवून राहुल पाटील यांनी यंत्रणा राबवायला सुरुवात केली होती. अलीकडेच पी. एन .पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत राजेंद्र सूर्यवंशी हे हरहुन्नरी, मोठा जनसपर्क असलेले कार्यकर्तेही त्यांच्यासोबत गेले. उमद्या स्वभावाच्या सूर्यवंशी यांना राष्ट्रवादीने पाडळी खुर्द मतदारसंघात उमेदवारी दिली. तर, येथे भाजपमधून घर वापसी केलेले डॉ. के. एन .पाटील यांना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मैदानात उतरवले होते. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष वेधले होते.

निवडणुकीच्या प्रचारात सचिन पाटील यांनी चांगलीच आघाडी घेतली होती. अखेरच्या टप्प्यात गोकुळचे ३० वर्षे नेतृत्व करणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा प्रवेश झाला. महाडिक यांनी विश्वास पाटील यांना मोठी संधी दिली होती. गोकुळच्या मागील निवडणुकी आधी मुंबईतील गाजलेल्या भूखंड खरेदीच्या प्रकरणावरून जोरदार वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर विश्वास पाटील यांनी सतेज पाटील यांना सोबत गेले होते. याचा राग महाडिक यांना होता. तो त्यांनी जिल्हा परिषदेत निवडणुकीत भरून काढला.

महाडिक यांचा निवडणूक काळात काही लोकांशी मोबाईलवर झालेला संवाद समाज माध्यमात अग्रेषित झाला. त्यातून त्यांनी राजेंद्र सूर्यवंशी यांना पाठबळ द्यावे. त्यांच्या विरोधात राहिलेले विश्वास पाटील यांच्या मुलाला पराभूत करावे. राजुला मत म्हणजे बीडच्या महादेवाला मत. विश्वास पाटीलला मत देऊन काही फायदा होणार नाही. तुमचे काही काम असेल तर राजाराम कारखान्यावरून हवी ती मदत घ्यावी. मदत करण्यास तयार आहे, असा थेट बोलका संदेश त्यांनी दिला होता.

पाठोपाठ येथे महाडिक यांनी आपली कुमक उभी केली होती. पाटील यांच्या प्रचारात गोकुळची यंत्रणा अहोरात्र राबत होती. यातील काहींनी भरती होताना लाखमोलाची किंमत नाईलाजाने मोजली होती. संधी येताच अशा दुखावलेल्यांनी नेतृत्वालाच हिसका दाखवणारा प्रचार केल्याची चर्चाही ऐकायला मिळते. एकूणच येथे पाटलांचे पानिपत होण्यास विधानसभा निवडणुकीचे राजकारण, महाडिक यांना अंगावर घेणे आणि नोकर भरती या तिन्ही घटकाचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.