अहिल्यानगर: भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) जिल्ह्यात मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज, शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तनपुरे हे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे भाचे आहेत. जयंत पाटील यांच्या भूमिकेबद्दलच संदिग्धता व्यक्त होत असताना त्यांचा भाच्याने प्रवेश केला. या घडामोडीने जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना आणि भाजपलाही बळ मिळेल. त्याचा परिणाम आगामी जिल्हा सहकारी बँक व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसेल. दरम्यान तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने अगोदरच अशक्त झालेल्या महाविकास आघाडीची अवस्था आणखी केवीलवाणी झाली आहे.
तनपुरे कुटुंब जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या मातब्बर समजले जाते. प्राजक्त यांचे आजोबा डॉ. बाबुराव तनपुरे, वडील प्रसाद तनपुरे यांनी मोठी राजकीय कारकिर्द निर्माण केली. आई डॉ. उषा तनपुरे राहुरीच्या नगराध्यक्ष होत्या. अनेक सहकारी संस्था या कुटुंबाच्या वर्चस्वाखाली आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाने केवळ राहुरीच नाहीतर लगतच्या श्रीरामपूर, पाथर्डी व अहिल्यानगर मतदारसंघात राजकीय परिणाम जाणवणारे आहेत.
जिल्ह्यात तनपुरे कुटुंब आणि विखे कुटुंब यांचे काँग्रेसमध्ये एकत्र असताना आणि नंतरही राजकीय सख्य कधी जुळले नाही. तनपुरे यांच्या विरोधात राहुरीमध्ये विखे यांनी वेळोवेळी विरोधकांना मदत केली. त्याचे पडसाद सहकारी साखर कारखान्यासह विविध संस्थांच्या निवडणुकीत वेळोवेळी उमटले. परंतु आता प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विखे यांच्यावर जबाबदारी टाकल्याने विखे-तनपुरे यांच्यात सख्य निर्माण होऊ शकते.
प्राजक्त तनपुरे सन २०१९ मध्ये भाजपचे शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत प्रथम निवडून आले. निवडून येताच ते मामा राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून लगेच महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्रीही झाले. मात्र सन २०२४ च्या निवडणुकीत तनपुरे यांचा कर्डिले यांनी पराभव केला. तनपुरे यांच्या संस्थांमागे चौकशीचा ससेमिराही लागला. त्यांनी भाजपकडे वाटचाल सुरू करताच हा ससेमिरा थांबलाही.
परिस्थितीमुळे प्राजक्त तनपुरे यांच्यापुढे भाजप प्रवेशाशिवाय पर्याय राहिला नव्हता. शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक झाली. भाजपच्या संपर्कात गेलेले तनपुरे भगवी टोपी, भगवे उपरणं परिधान करू लागले. त्याचवेळी त्यांची भाजपकडे वाटचाल सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री विखे यांच्या संपर्कातून अखेर त्यांनी पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजय सहजसाध्य झाला. त्याचवेळी तनपुरे यांना विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीचा शब्द मिळाल्याची चर्चा सुरू झाली. ती आता प्रवेशानंतर प्रत्यक्षात येईल.
दरम्यान तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. अगोदरच अशक्त झालेल्या महाविकास आघाडीची अवस्था तर केवीलवाणी झाली आहे. यापुढे जिल्ह्यात भाजपच्या या वाढत्या शक्तीला आघाडी कशी तोंड देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक छोटे-मोठे नेते गळाला लावण्यास सुरुवात केली. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात आणि निवडून आणण्यात त्यांना यश आले. त्यातून विखे यांचे आता जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे. विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्यात फारसे सक्रिय नाहीत. त्याचा उपयोग विखे करून घेत आहेत. विखे यांच्या वर्चस्वाला रोखणारा प्रबळ नेता जिल्ह्यात विरोधकांकडे राहिलेला नाही. खासदार नीलेश लंके यांचे त्यादृष्टीने प्रयत्न मर्यादितच आहेत.
जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढताना मूळचे व बाहेरून आलेले अशी मोठी दरी निर्माण झाली आहे. ती अधिक रुंदावत चालली आहे. पूर्वी जिल्ह्यावर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व असताना विविध निवडणुकांमधून काँग्रेस नेत्यांमध्येच साठमारी रंगायची. आता त्याच परिस्थितीकडे भाजपची वाटचाल सुरू झाल्याचे मानले जाते.
सुजय विखे-प्राजक्त तनपुरे गळाभेट
पालकमंत्री राधाकृष्ण विखे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यात व्यस्त असल्याने ते पक्षप्रवेश कार्यक्रमास अनुपस्थित होते. मात्र त्यांचे चिरंजीव माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी उपस्थित राहून उणीव भरून काढली. पक्षप्रवेशानंतर उपस्थित कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार त्यांनी परस्परांची गळाभेट घेतली. राहुरीमध्ये तनपुरे-विखे परस्परांचे पूर्वपार विरोधक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांमधील गळाभेटीने कार्यकर्त्यांनी जल्लोश केला.
