नितीन पखाले

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू, विधान परिषदेचे माजी आमदार ख्वाजा बेग हे अलिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याच कार्यक्रमात दिसत नाही. उलट भाजपच्या विविध नेत्यांना सातत्याने भेटत असल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. रविवारी सायंकाळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आर्णी येथे खास ख्वाजा बेग यांच्या भेटीसाठी शासकीय दौरा करून पाहुणचार घेतल्याने ख्वाजा बेग लवकरच भाजपवासी होणार, असे तर्क लढविले जात आहेत.

Ranajagjitsinha Patil ajit pawar malhar patil
“२०१९ मध्ये अजित पवारांनीच आम्हाला भाजपात पाठवलं अन्…”, राणाजगजीतसिंह पाटलांच्या मुलाचा मोठा गौप्यस्फोट
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी
satish chavan marathi news
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा ?

दिग्रस विधानसभा मतदारसंघात १९९९ मध्ये अवघ्या १२६ मतांनी ख्वाजा बेग यांचा पराभव झाला होता. २००४ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची युती असताना, एकमेव दिग्रस विधानसभा मतदारसंघात हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. तेव्हाही बेग यांचा पराभव झाला. मात्र अल्पसंख्याक समाजातील असुनही सर्व समाजांवर असलेली त्यांची पकड आणि अभ्यास यामुळे ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या ‘गुडबुक’मध्ये गेले. अवघ्या काही मतांनी विधानसभेची संधी हुकल्याने पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवून आमदार केले. गेल्या वर्षी त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपला. याच काळात ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही होते. मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अन्य एका गटाने बेग यांना सातत्याने कोंडीत पकडून त्यांना काम करण्यास मज्जाव केला. तेव्हा पक्षाने त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे टाळतात.

हेही वाचा: राजकारण असतं कसं ? रावसाहेब दानवे सांगतात तेव्हा…..

गेल्या तीन, चार महिन्यांत ख्वाजा बेग सातत्याने भाजप नेत्यांच्या भेटी घेत असल्याने ते राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ, धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण गेल्या महिन्यात यवतमाळ येथे आले असताना त्यांच्याही कार्यक्रमात ख्वाजा बेग उपस्थित नव्हते. तर दुसरीकडे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या स्वागतासाठी ते यवतमाळात आवर्जून आले होते. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर हंसराज अहीर यांनी आर्णी येथे ख्वाजा बेग यांच्या निवासस्थानी भेट देवून चर्चा केली होती. आता विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी रविवारी खास शासकीय दौरा काढून आर्णी येथे ख्वाजा बेग यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्नेहभोजन केले.

नार्वेकर तब्बल तीन तास ख्वाजा बेग यांच्याकडे रमले. भाजपचे नार्वेकर राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांच्याकडे आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला. मात्र बेग आणि नार्वेकर यांचा जुना स्नेह असून, हे जिव्हाळ्याचे मैत्र जपण्यासाठी नार्वेकर आर्णी येथे बेग यांच्या घरी आल्याची प्रतिक्रिया बेग यांच्या निकटस्थ कार्यकर्त्याने दिली. बेग हे राष्ट्रवादीत नाराज असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू असली तरी या भेटीचा राजकीय संबंध नसल्याचे, या कार्यकर्त्याने सांगितले.

हेही वाचा: अब्दुल सत्तार नेहमीच वादग्रस्त तरीही नेत्यांच्या गळ्यातील ताईत का ?

कुठलाही राजकीय हेतू नाही- ख्वाजा बेग

विधासभाध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आपल्या निवासस्थानी दिलेली भेट ही पूर्णत: अराजकीय होती. आम्ही दोघे जवळचे मित्र आहोत, त्यामुळे कोणताही राजकीय विषय नव्हता. भाजपच्या चित्रा वाघ या पूर्वी राष्ट्रवादीत होत्या त्यामुळे त्यांची भेट झाली होती. भाजपच्या इतरही नेत्यांच्या भेटी या केवळ मैत्री स्वरूपाच्या होत्या. राष्ट्रवादीतील नेत्यांच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हतो, त्याला वेगळी कारणे आहेत. मात्र भाजपात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही, असे ख्वाजा बेग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मित्रास रिकामा बसू देणार नाही !

आर्णी येथील कार्यक्रमात ‘मैत्री म्हणजे न संपणारा जिव्हाळा…’ असे खास फलक विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले होते. यावेळी ख्वाजा बेग यांच्यावतीने नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना, नार्वेकर यांनी भविष्यात ख्वाजा बेग पुन्हा आमदार होतील, असे संकेत दिले. शिवाय ‘मी, माझ्या मित्राला रिकामा बसू देणार नाही,’ असे सूचक वक्तव्य केले. मात्र ते भाजपात प्रवेश करणार की नाही, याबद्दल नार्वेकर काही बोलले नाही. तरीही ख्वाजा बेग यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढल्याने ते भविष्यात भाजपात दाखल होतील, अशी चर्चा रंगली आहे.