बिपीन देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी विधानसभा निवडणुकीत परतूर-मंठा मतदार संघातील लढतीविषयी राज्यात अलिकडे घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर उत्सुकता निर्माण झाली आहे. या मतदार संघात पारंपरिक लढत ही माजीमंत्री, भाजपचे आमदार बबनराव लोणीकर व माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्यात होणार असल्याचे निश्चित आहे. मात्र सुरेश जेथलिया हे काँग्रेसकडूनच लढणार की अन्य पर्याय शोधून राजकीय मार्गक्रमण करणार, अशी ती उत्सुकता स्थानिक नागरिकांमध्ये आहे.

भाजप नेते बबनराव लोणीकर यांना तुल्यबळ लढत देणारा नेता म्हणून माजी आमदार सुरेश जेथलिया यांची प्रतिमा मतदारसंघात आहे. शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून उमेदवारी मिळवून आमदार झालेले जेथलिया विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधामुळे अपक्ष लढूनही निवडून आलेले होते. दहा वर्षांपासून मात्र ते राजकीय घडी बसवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा: राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत अनवाणी… भारत जोडो यात्रेकरू दिनेश शर्मांची पायपीट…

आपले राजकीय आयुष्य घडवण्यात शिवसेनेचे मोठे योगदान असल्याचे जेथलिया अलिकडे सांगत असतात. परतूर नगर पालिकेवर कित्येक वर्षे एकहाती सत्ता ठेवून असलेल्या सुरेश जेथलिया यांनी ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जेथलिया यांनी नुकताच कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत-जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. आपण चार दिवस यात्रेत सहभागी झालो होतो. राहुल गांधींना मराठवाड्यात मिळालेला प्रतिसाद काँग्रेससाठी निर्णायक ठरणारा आहे, असे जेथलिया यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत किंवा पुढील काही दिवसात काय राजकीय परिस्थितीत बदल घडेल, यावर जेथलिया त्यांची भूमिका ठरवतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटते.

परतूर-मंठा मतदार संघातील संदर्भही राज्यात पडलेल्या शिवसेनेतील फुटीनंतर बदललेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारा शिवसैनिकांचा मोठा वर्ग मंठा – परतूरमध्ये आहे. मंठा – परतूर ही तालुके परभणी लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. या दोन्ही मतदार संघात शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेणारा टिकाव धरू शकत नाही, अशी परिस्थिती असते. शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेहमी दुरंगी होणारी विधानसभा येत्या काळात तिरंगी लढतीत होईल, अशी चिन्हे असून त्यात बबनराव लोणीकर, सुरेश जेथलिया व ए. जे. बोराडे हे तीन नेते रिंगणात समोरा समोर उभे राहिल्याचे चित्र दिसू शकते. जेथलिया मात्र महाविकास आघाडी झाली तरच कॉंग्रेसकडून निवडणूक लढवू शकतात. तसे घडण्याची शक्यता मावळली तरच अन्य पर्याय किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून राजकीय मार्गक्रमण करण्याची दिशा ठरवू शकतात.

हेही वाचा: विक्रांत गोजमगुंडे : ध्येयनिष्ठ, कार्यप्रवण

काँग्रेसकडून लढल्यानंतर मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून कितपत सहकार्य होईल, याविषयीही जेथलिया समर्थक साशंक आहेत. अलिकडे बबनराव लोणीकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार राजेश टोपे यांच्या कार्य पद्धती विरोधात घेतलेली टोकदार भूमिका निवडणुकीपर्यंत कायमच राहील, यावरही जेथलिया समर्थकांचा विश्वास नाही. काँग्रेसचे स्थानिक पण राज्य पातळीवर प्रतिनिधीत्व करणारे नेतेही विधानसभा निवडणुकीत कितपत काम करतील, या बाबत शाश्वती नसल्याची परिस्थिती पाहता जेथलिया यांनी नवा पर्याय शोधला तर आश्चर्य वाटणार नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla suresh jethalia v bjp mla babanrao lonikar partur mantha constituency print politics news tmb 01
First published on: 19-11-2022 at 11:44 IST