अतिक अहमद, उत्तर प्रदेशमधील कुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. चार दशकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ६० वर्षीय अतिक अहमदला स्वतःच्याच राज्यातून पळ काढावा लागला आहे. ज्याने राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रात एकाचवेळी हुकूमत गाजवली. गुन्हेगारीचा शिक्का आणि १०० च्या आसपास खटले आणि १४४ गुंडांची टोळी चालवत असतानादेखील त्याने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत निवडणूक जिंकण्याचा प्रताप करून दाखविला. योगी आदित्यनाथ सरकार आपला एनकाऊंटर करेल, या भीतीपोटी अतिक अहमदने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपल्याला गुजरातच्या तुरुंगातच ठेवावे, अशी विनंती केली आहे.

माहितीसाठी, अतिक अहमद सध्या गुजरातमधील तुरुंगात आहे. कृषी संस्थेच्या एका प्राध्यापकावर हल्ला केल्याप्रकरणी २०१६ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याला २०१९ मध्ये गुजरातमधील तुरुंगात हलविण्यात आले. अतिक अहमदचे गुन्हेगारी किस्से एखाद्या चित्रपटापेक्षा कमी थरारक नाहीत. डिसेंबर २०१८ रोजी अतिक युपीमधील देवरियाच्या तुरुंगात कैद होता. तिथे त्याने मोहित जयस्वाल नावाच्या व्यावसायिकाला भेटायला बोलावले. नंतर कळले की, जयस्वालला बळजबरीने उचलून तुरुंगात आणले होते. तिथे त्याला मारहाण करून त्याची ४८ कोटी रुपयांची जमीन अहमदच्या सहकाऱ्यांच्या नावावर करण्यासाठी कागदपत्रावर स्वाक्षरी घेण्यात आली.

NARENDRA MODI
‘पंतप्रधान मोदींनी निवडणूक लढविण्यावर ६ वर्षांची बंदी घाला’, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल; कारण काय?
chief justice dy chandrachud
सरन्यायाधीश कोर्टात आले आणि आपली खुर्ची सोडून चक्क समोरच्या स्टूलवर जाऊन बसले; ‘या’ कृतीचं होतंय सर्वत्र कौतुक!
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

नुकतेच २४ फेब्रुवारी रोजी, बसपाचे माजी आमदार रमेश पाल हत्याकांड प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याची अतिक अहमदच्या गुंडांकडून दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार रमेश पाल हत्याकांड प्रकरणात अतिक अहमद हा मुख्य आरोपी आहे. ज्याप्रकारे रमेश पाल यांची हत्या झाली. त्याच प्रकारे आणि त्याच ठिकाणी उमेश पालची हत्या करण्यात आली. अतिक अहमदसोबत या गुन्ह्यामध्ये त्याची पत्नी शाईस्ता परवीन, त्याचा छोटा मुलगा देखील सह गुन्हेगार आहेत. सध्या दोघेही फरार आहेत. तसेच त्याची इतर दोन मुले वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगात आहेत.

अतिक अहमदचा उदय

६० वर्षीय अतिक अहमदवर प्रयागराज येथे खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल १९८४ रोजी पहिला गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे. पाच वर्षांनंतर १९८९ रोजी अहमदने पहिल्यांदा तेव्हाच्या अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयदेखील मिळवला. पुढच्या दोन विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून अहमदने ही जागा कायम ठेवली. त्यानंतर समाजवादी पार्टीने अहमदसाठी आपले दरवाजे खुले केले.

मायावतींवर गोळीबार

१९९५ मध्ये गेस्ट हाऊसकांडमुळे अहमद चर्चेत आला. युपीच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती त्यांच्या आमदारांसोबत गेस्ट हाऊसवर थांबल्या होत्या. अहमद आणि सपाच्या कार्यकर्त्यांनी या गेस्ट हाऊसला वेढा टाकून गोळीबार केला. यानंतर संतापलेल्या मायावतींनी सपासोबतची युती तोडून टाकली आणि सत्तास्थापनेसाठी भाजपाची मदत घेतली. गेस्ट हाऊसवर हल्ला झाला असताना मायावती यांना एका खोलीत बंद करण्यात आले होते. दरम्यान बसपाचे काही आमदार सपाने पकडले.

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मतदारसंघातून खासदार

१९९६ मध्ये अतिक अहमद सपाकडून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आला. तीन वर्षांनंतर त्याने अपना दल पक्षात प्रवेश केला आणि २००२ साली पुन्हा निवडणुकीत विजय मिळवला. २००४ साली पुन्हा सपामध्ये प्रवेश करून अहमदने फुलपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. (या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व जवाहरलाल नेहरू यांनी केले होते) २००४ साली घडलेल्या एका प्रकरणामुळे अहमदचा गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्रात असलेला दबदबा उतरायला सुरुवात झाली. अलाहाबाद पश्चिम या विधानसभेच्या मतदारसंघात अहमद लोकसभेवर गेल्यामुळे पोटनिवडणूक लागली होती. बहुजन समाज पक्षाकडून राजू पाल हे निवडणूक लढवत होते, तर सपाकडून अहमद याचा भाऊ खालिद ऊर्फ अश्रफ निवडणुकीला उभा होता. विशेष म्हणजे चमत्कारीकरित्या राजू पाल निवडून आले. त्याचा राग डोक्यात ठेवून राजू पाल यांची २००५ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यावर हत्येचा आरोप करण्यात आला.

समाजवादी पक्ष राज्यात सत्तेत असल्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. २०१९ साली दहा जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली. त्यामध्ये २०१८ साली व्यावसायिक मोहित जयस्वाल यांच्या अपहरणाचा गुन्हा देखील समाविष्ट आहे. जयस्वालने त्याची ४८ कोटी रुपयांची मालमत्ता अहमदच्या सहकाऱ्यांनी बळजबरीने त्यांच्या नावावर करून देण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. अहमदचा मोठा मुलगा मोहम्मद उमर, जो सध्या लखनऊच्या जिल्हा तुरुंगात आहे, तोदेखील या प्रकरणात सहआरोपी आहे.

उत्तर प्रदेश सरकारची कारवाई

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियाचे समूळ उच्चाटन करण्याचा शब्द जनतेला दिला आहे. त्यानुसार अहमदशी निगडीत ३५० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच प्रयागराज जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले आहेत की, अहमद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जबरदस्तीने ताब्यात घेतलेली ७५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात यावी. याशिवाय ईडीकडूनही अतिक अहमदविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.