प्रबोध देशपांडे

अकोला : लोणार सरोवराच्या विकास आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिल्याने या परिसराचे भाग्य उजळणार आहे. लोणार सरोवराच्या भेटीप्रसंगी गेल्यावर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निधी देण्याची घोषणा केली होती. मविआ सरकार कोसळल्यानंतर नव्या शिंदे सरकारने लोणारसाठी निधीला मंत्रीमंडळात मंजुरी दिली. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी हा निर्णय झाल्याने त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या घोषणेला एकनाथ शिंदेंनी बळ दिल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात हा निर्णय बुलढाणा जिल्ह्यातील बंडखाेर आमदार, खासदारांना बक्षीस स्वरूपात घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या निर्णयामुळे शिंदे समर्थक आमदार, खासदारांचे वजन वाढणार आहे.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
water Buldhana district, water shortage Buldhana
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता
Dhule Constituency
धुळ्यात मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे जागतिक दर्जाचे प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर व पर्यटन स्थळ आहे. सरोवरालगतच्या जंगलाला आता संरक्षित व धोकादायक वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. या भागात देश-विदेशातील पर्यटक, संशोधक भेटी देत असतात. लोणार येथील विकास कार्य दुर्लक्षित असून गेल्या अनेक वर्षांपासून विकास आराखडा रखडला आहे. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार सरोवराला भेट दिली होती. उद्धव ठाकरेंना निसर्ग पर्यटन व छायाचित्रणाची आवड आहे. त्यामुळे त्यांच्यातील छायाचित्रकार जागा होत त्यांनी सरोवराचे नयनरम्य छायाचित्र टिपत आपली हाैस भागवली होती. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी लोणार सरोवराच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र, सव्वावर्ष उलटल्यानंतरही लोणारसाठी कुठलाही विकास निधी मिळाला नाही. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात आता शिंदे गटात असलेले खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमूलकर, आ. संजय गायकवाड हे सहभागी झाले होते. चार महिन्याआधी राज्यपालांनीदेखील लोणार सरोवराचा दौरा करून विकास कामे करण्याचे निर्देश दिले होते. लोणार सरोवराच्या विकासाला मात्र काही चालना मिळू शकली नाही.

हेही वाचा… आरक्षणामुळे प्रस्थापितांची कोंडी, जिल्हा परिषद निवडणुकीचे रायगडकरांना वेध

लोणारचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी ३६९ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी हा निर्णय झाला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणेनुसार त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होती. वास्तव मात्र वेगळेच असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते. लोणार सरोवर मेहकर विधानसभा मतदारसंघात येते. मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले आहेत. मविआ सरकार असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही डॉ. रायमूलकर यांनी कामे होत नसल्याच्या कारणावरून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे सुद्धा शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मेहकर हा त्यांचा गड म्हणून देखील ओळखला जातो. आपल्यासोबत आलेल्या आमदार, खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणारच्या निधीला मंजुरी दिली. या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी समर्थन देणाऱ्या आमदार, खासदारांना एकप्रकारे बक्षीसच दिल्याची चर्चा आहे.

हेही वाचा… साखर कारखाना, सूत गिरणी आणि निधीवाटपातून मुख्यमंत्री शिंदे यांची मराठवाड्यात नवी बांधणी

आमदार, खासदारांच्या बंडामुळे मतदारांमध्ये काही प्रमाणात रोष आहे. निष्ठावान शिवसैनिक देखील दुखावले आहेत. त्यामुळे आमदार, खासदारांची बंडांची भूमिका योग्यच, अशी सकारात्मक बाजू मतदारांमध्ये जाण्यासाठी देखील लोणार विकास आराखड्यासाठी निधी देण्यात आल्याची चर्चा आहे़ काही महिन्यांपूर्वी सत्तेत असूनही आमदारांना विकास कामांसाठी आंदोलने करावी लागत होती. सत्तानाट्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या बाजूने उभे राहिल्यामुळे मतदारसंघात विकास कामांसाठी भरीव निधी मिळतो, असा संदेश देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. दरम्यान, या निर्णयानंतर आमदार संजय रायमूलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार देखील मानले आहेत.