Premium

कळवा-मुंब्य्रात गणेशोत्सवात मंडळांची ‘दिवाळी’

नेत्यांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमुळे देणगीच्या रक्कमेत वाढ झाल्याने या मंडळांची गणेशोत्सवाच्या काळातच दिवाळी झाल्याचे बोलले जात आहे.

kalwa, mumbra, ganesh festival, jitendra avhad, najib mulla, anand parajpe, NCP
कळवा-मुंब्य्रात गणेशोत्सवात मंडळांची ‘दिवाळी’ ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

जयेश सामंत / नीलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कळवा-मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात शह-काटशहाचे राजकारण सुरू असतानाच, त्यात आता आव्हाडांचे एकेकाळचे शिष्य आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी उडी घेतली आहे. आपल्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असून त्याचा फायदा येथील गणेशोत्सव मंडळांना झाला आहे. नेत्यांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमुळे देणगीच्या रक्कमेत वाढ झाल्याने या मंडळांची गणेशोत्सवाच्या काळातच दिवाळी झाल्याचे बोलले जात आहे.

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. असे असले तरी जिल्ह्यातील क‌ळवा-मुंब्रा मतदार संघात मात्र राष्ट्रवादीची ताकद आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे निवडून येतात. तर, कल्याण लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे निवडुन येतात. कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये कळवा-मुंब्रा हा परिसर येतो. या पट्ट्यातील राष्ट्रवादीच्या गडाला सुरूंग लावून शिवसेनेची ताकद वाढविण्याचे प्रयत्न खासदार शिंदे यांच्याकडून सुरू आहेत. यातूनच जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असून या दोन्ही नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते आहे.

हेही वाचा… पिंपरी- चिंचवडमध्ये पार्थ पवार यांना रोहित पवार यांचे आ‌व्हान ?

मध्यंतरी खासदार शिंदे आणि जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी मिशन कळवा मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत क‌ळव्यातील माजी नगरसेवक जितेंद्र पाटील या गळाला लावत पक्ष प्रवेश देऊन त्यांनी आव्हाड यांना धक्का दिला होता. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे आणि त्यांचे समर्थक नगरसेवकांनी आव्हाड यांची साथ सोडली असून त्यांना प्रभागातील कामे करण्यासाठी खासदार शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून निधीही उपलब्ध करून दिला आहे. मतदार संघातील विकास कामांचे श्रेय घेण्यावरूनही दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगल्याचे चित्र यापुर्वी दिसून आले होते.

हेही वाचा… कांद्याच्या दरावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली

एकूणच या दोन्ही नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी कळवा-मुंब्रा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करून आव्हाड यांना शह देण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. आव्हाड यांचे जवळचे समर्थक म्हणून मुल्ला आणि परांजपे हे ओ‌ळखले जात होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोघांनी आव्हाड यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिले. तेव्हापासून मुल्ला आणि परांजपे हे दोघे आव्हाड यांच्यावर टिका करीत आहेत. आव्हाड यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून मुल्ला यांची सुरूवातीपासूनच चर्चा असून त्यावर मुल्ला यांनी भाष्य केले नव्हते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुल्ला हे आव्हाड यांच्याविरोधात निवडणुक लढतील, अशी चर्चा पुन्हा सुरू असतानाच, मुल्ला यांनी कळवा-मुंब्रा मतदार संघात पहिल्यांदाच गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे फलक लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भागातील मंडळांकडून लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये मुल्ला यांचे बॅनर दिसून येत आहेत.

हेही वाचा… महिला आरक्षण विधेयकावरील मतदानाला सुनील तटकरेंची दांडी

एकूणच या भागात आपल्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असून त्याचा फायदा येथील गणेशोत्सव मंडळांना झाला आहे. नेत्यांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमुळे देणगीच्या रक्कमेत वाढ झाल्याने या मंडळांची गणेशोत्सवाच्या काळातच दिवाळी झाल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh mandal have happy days uring ganesh festival in mumbra kalwa area due to politics and compition among jitendra awahd najib mulla and anand paranjpe print politics news asj

First published on: 22-09-2023 at 11:18 IST
Next Story
महिला आरक्षण विधेयक : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संसदेत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, जेपी नड्डाचे जशास तसे उत्तर!