Gaurav Gogoi Interview On CJP Student Protest Parliament Monsoon Session : अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) राजधानी दिल्लीत काढलेल्या मोर्चाचे पडसाद सोमवारी संसदेतही उमटले. शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा विरोधी पक्षातील नेत्यांनी तीव्र निषेध केला. तसेच, नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची आग्रही मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. त्याचवेळी संसदेच्या परिसरात मोबाइल फोन नेटवर्क जॅमरचा वापर करण्यात आल्यानेही वादंग निर्माण झाला. या निर्णयाची पूर्वकल्पना खासदारांना का देण्यात आली नव्हती, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना संसदेतील घडामोडी आणि सीजेपीच्या आंदोलनाबाबत पक्षाच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले.
प्रश्न : सोमवारी घडलेल्या घडामोडीनंतर काँग्रेस पक्ष ‘कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे कसा पाहतो?
गौरव गोगोई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याआधीच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा व्हाव्यात, यांनाही त्यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील रस्त्यांवर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच तत्परता दाखवत प्रधान यांना पदावरून हटवले असते तर ही परिस्थिती टाळता आली असती. मात्र, त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवून हट्टी भूमिका घेतली, असा आमचा आरोप आहे.
प्रश्न : सोमवारी ज्या प्रकारचे मोठे आंदोलन पाहायला मिळाले, तसे आंदोलन काँग्रेस किंवा ‘इंडिया’ आघाडीसारख्या राजकीय मंचावरून का होऊ शकले नाही?
गौरव गोगोई : हा तुलना करण्याचा विषय नाही. अनेक तरुण राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला तसेच आमच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी आयोजित केलेल्या आंदोलनांनाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर, कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संलग्न नसलेल्या व्यासपीठावरून आवाज उठवण्यात अधिक सहज वाटणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि तरुणांची संख्याही वाढत आहे. सोमवारी त्याचे मोठे उदाहरण पाहायला मिळाले. महत्त्वाचे म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मुद्द्यावर समाज, तरुण आणि विरोधी पक्ष एकाच भूमिकेत आहेत. या संपूर्ण प्रकरणात जर कोणी जनभावना समजून घेण्यात अपयशी ठरत असेल, तर ते भाजपा सरकार आहे.
प्रश्न : काही खासदारांनी संसद परिसरात त्यांना मर्यादित ठेवण्यात आल्याची आणि मोबाइल नेटवर्क जॅम करण्यात आल्याची तक्रार केली. नेमके काय घडले?
गौरव गोगोई : सोमवारी संसद परिसरात मोबाइल नेटवर्क जॅम करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्याबाबत खासदारांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. आम्हा सर्वांना समाजमाध्यमांवर बातम्या पाहता येत नव्हत्या. मोबाइल नेटवर्क बंद करण्याचे नेमके कारण काय होते, याचे स्पष्टीकरण अद्याप कोणीही दिलेले नाही. आम्ही संसदेत येण्याआधी दिल्ली पोलीस विद्यार्थ्यांवर किती मोठ्या प्रमाणात अत्याचार करत होते, हे आम्हाला दिसून आले. त्याचवेळी संसद परिसरात सुरक्षा कर्मचारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत असल्याचेही आम्ही पाहिले. मात्र, नेमके काय सुरू आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती. त्यानंतर आम्ही संसदेत या विषयावर चर्चेची मागणी केली. मात्र, सरकारची प्रतिक्रिया अत्यंत उदासीन होती. मोदी सरकारमधील मंत्री या गंभीर विषयावरही हसत-खेळत असल्याचे दिसत होते, असा आरोप गोगोई यांनी केला.
प्रश्न : आज मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांमध्ये कोणतेही मतभेद होते का?
गौरव गोगोई : सकाळच्या बैठकीत गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर चर्चा झाली. विशेषतः बिझनेस अॅडव्हायझरी कमिटी आणि सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या चर्चेचा आढावा घेण्यात आला. महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर सर्व विरोधी पक्ष एकजूट होते. आज संसदेबाहेर मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण एकत्र येणार असल्याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच राम मंदिर देणगी वाद हादेखील महत्त्वाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचा आमचा प्रयत्न होता.
प्रश्न : सोमवारी झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर मंगळवारपासून संसदेत काय घडू शकते?
गौरव गोगोई : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारला परखड प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांवर लाठीमार का करण्यात आला, या विषयावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास तयार का नाहीत, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. निवडणुकांच्या तोंडावर भाजपाकडून अनेक राज्यांमध्ये तीन-चार वेळा मुख्यमंत्री बदलले जातात. मग धर्मेंद्र प्रधान यांच्याविषयीच पंतप्रधानांचा इतका विश्वास आणि ठाम पाठिंबा का आहे, हा आमचा प्रश्न आहे. सरकार जितके अधिक या मुद्द्यांपासून दूर राहील आणि अहंकारी भूमिका घेईल, तितकेच भविष्यात त्यांना त्याचे राजकीय नुकसान सहन करावे लागेल, असा दावा गौरव गोगोई यांनी केला.
