मुंबई : बंगळूरुमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येतील आरोपी श्रीकांत पांगरकर याच्या शिवसेना प्रवेशावरून टीका होऊ लागताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरोपीची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचा आदेश दिला. गौरी लंकेश हत्येतील आरोपी पांगरकर हा अलीकडेच जामिनावर सुटला होता. मूळचा जालन्याचा असलेला पांगरकर याचे स्थानिक नेते अर्जुन खोतकर यांनी सन्मानपूर्वक पक्षात स्वागत करून त्याची जालना विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.

हेही वाचा >>> हिवाळी अधिवेशन आणि खुर्चीचे तप्त राजकारण!

गौरी लंकेश हत्या आणि नालासोपारा शस्त्रसाठा या दोन गुन्ह्यांमध्ये पांगरकर हा आरोपी होता. लंकेश हत्याप्रकरणी जवळपास सहा वर्षांनी त्याला जामीन मंजूर झाला होता. पांगरकर हा शिवसेनेचा जुना कार्यकर्ता असून, दोन वेळा तो जालना नगरपालिकेत निवडून आला होता. जामिनावर सुटून बाहेर येताच अर्जुन खोतकर यांनी त्याचे स्वागत करून त्याच्यावर प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. हत्येतील आरोपीला पक्षात मानाचे स्थान देण्यात आल्याने शिवसेना व मुखमंत्री शिंदे यांच्यावर टीका सुरू होताच शिंदे यांनी जालन्यातील सर्व नेमणुका रद्द करण्याचा आदेश रविवारी दिला.

Story img Loader