Gen Z Voters Impact on 2026 Elections: पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम आणि केरळ या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वैशिष्ट्यपूर्ण निकाल समोर आले. या निकालांतून एक संदेश स्पष्टपणे मिळतोय तो म्हणजे आजचा तरूण मतदार हा अस्वस्थ तसेच बंधन झुगारण्यासाठी उत्सुक आहे. त्याला वर्तमानाची काळजी असून एक चांगले भविष्य हवे आहे. त्यासाठी तो राजकीय बदल घडवून आणतोय. त्याला भूतकाळाचे ओझे स्वत:बरोबर वाहायचे नसून तो बेफिकीर आहे. उदासीन आहे.

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूतील बदल

ममता बॅनर्जी यांनी २०११ मध्ये माकप (सीपीआय – एम) ची सत्ता संपुष्टात आणत पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली. तसेच त्याचवर्षी तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर ब्रिगेड परेड ग्राउंडवर मोठी रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी आजच्या बहुतेक तरूण मतदारांचा जन्म झाला असावा. तमिळनाडूत तिशीत असलेल्या मतदारांनी डीएमके व एआयएडीएमके या पक्षांना एकमेकांशी लढताना पाहिले. पण, बदल घडवून आणण्यासाठी त्यांना तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे नेते विजय यांच्यात आशेचा किरण दिसला. दक्षिण भारतात पक्ष स्थापनेनंतर काही महिन्यांतच सत्ता मिळवल्याचे फक्त एकच उदाहरण होते. ते म्हणजे आंध्र प्रदेशातील एनटी रामाराव यांचे. एनटी रामा राव हे देखील सिनेक्षेत्रातून राजकारणात आले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री टी. अंजय्या यांच्याबद्दल अवमानकारक शब्द उच्चारले होते. त्याचा फायदा एनटी रामाराव यांना सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी झाला होता.

जेन झीचा प्रभाव

२०२६ च्या या निवडणुकांचा विचार केल्यास, त्यावर जेन-झी (१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेले) मतदारांचा प्रभाव असल्याचे दिसून येते. प्रगतीची आशा बाळगणाऱ्या, महत्वाकांक्षी तरूण-तरूणींना रोजगार तसेच आर्थिक उन्नतीच्या संधी हव्या आहेत. “दिल मांगे मोर”, अशी भावना त्यांच्यात आहे. पश्चिम बंगालमध्ये महिलांना दर महिन्याला १५०० रूपये देणारी लक्ष्मीर भंडार योजना किंवा कन्याश्री उपक्रम सुरू होता. परंतु, महिलांना त्यापेक्षा अधिक हवे आहे. पश्चिम बंगालमधील एका झोपडीत राहणाऱ्या महिलेने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते, “माझ्या मुलीने आता पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने आता २० हजार रूपये तरी कमवायला हवेत. पण तिला नोकरीच मिळत नाहीये.” आज देशातील महिला व तरूणी अधिक महत्वाकांक्षी झाल्या आहेत. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या “महिला” मतदारांकडे लक्ष केंद्रीत केले होते. तरूणाईसह महिलांनी बदल घडवून आणण्यासाठीच तमिळनाडूत विजय यांच्या टीव्हीके पक्षाला कौल दिला.

२० ते ३४ वर्षांपूर्वी झालेली जनगणना तसेच १८ ते १९ वर्षांपूर्वीची मतदारांची माहिती तपासली असता, २०२६ मध्ये मतदान करणाऱ्या १८ – ३४ वयोगटातील मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. ते प्रमाण एकूण मतदारांच्या २५ टक्के आहे. त्यात या वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना सामाविष्ट केल्यास तो आकडा निर्णायक ठरतो.

भाजपाची रणनीती काय होती?

पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विजयासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. एसआयआर सर्वेक्षण, १५ वर्षांपासून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असल्याने सत्ताविरोधी लाट, “टीएमसी गुंडा”विरोधात असलेला रोष, बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक घोटाळ्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता, सुरक्षा दलाचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त, “जय श्री राम”सह “जय माँ काली” आणि “माँ दुर्गा”च्या घोषणा, बंगाल विरोधी प्रतिमा मोडण्यासाठी भाजपा नेत्यांनी खाल्लेले मासे आणि भाजपाची कठोर मेहनत तसेच संघटनात्मक काम यांचा भाजपाला फायदा झाला.

ममता बॅनर्जींच्या प्रचाराचे मुद्दे

ममता बॅनर्जी यांनी प्रचारा दरम्यान गरीब, महिला व बंगाल या मुद्द्यांवर सर्वाधिक भर दिला होता. या मुद्द्यांवर भर देणे ममतांसाठी पुरेसे नव्हते. भविष्यात महत्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर ममता बॅनर्जी यांनी जोर द्यायला हवा होता. ममता यांनी भाजपाचा प्रतिकार बचावात्मक स्वरूपात केला. कुशल कामगारांचे स्थलांतर आणि आर्थिक संधी हे मुद्दे ममता बॅनर्जी यांच्या प्रचारातून समोर आले नाहीत. ममता यांनी गरीबांसाठी अनेक योजना सुरू केल्या होत्या. परंतु, गरीबांसाठी प्रत्येकच पक्ष योजना राबवतो, असा समज आता मतदारांमध्ये सामान्य होत चालल्याचे दिसते. जे कोणी सत्तेत येतील ते योजना पुढे सुरू ठेवतील हे मतदारांना आता कळले आहे.

भाजपाचा पश्चिम बंगाल व आसाममध्ये विजय मिळाल्याने ईशान्य भारतावर नियंत्रण ठेवता येणार आहे. गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “अंग (बिहार), बंग (बंगाल), कलिंग (ओडिशा).” आता या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाचे सरकार असेल. आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांना बहुमत मिळाले आहे. त्यामुळे दक्षिण भारताचा अपवाद वगळता भाजपा आता पॅन इंडिया पक्ष झाला आहे.

भाजपासाठी विजयाचे महत्व काय?

पश्चिम बंगालमधील विजय भाजपासाठी विशेष आहे. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या प्रभावी नेतृत्वाला भाजपाने पराभूत केले आहे. त्यामुळे भाजपाचा एक विरोधक दुबळा होणार आहे. त्यामुळे भाजपासाठी या विजयाचे महत्व अधिक आहे. सध्या जागतिक पातळीवर अनेक बदल होत आहेत. युद्धामुळे पेट्रोल व इतर वस्तुंच्या किंमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे विरोधकांकडून जोरदार विरोध होऊ शकतो. अशा परिस्थितीत राजकीय स्थिरता साधणे भाजपाला साध्य होऊ शकते. २०२६ च्या निकालाने विरोधकांना पुन्हा एकदा भाजपाचा सामना करण्यासाठी रणनीती आखण्याची आवश्यकता आहे. २०२९ मध्ये भाजपा विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र यावे का? यावर विचार होऊ शकतो.

केरळमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. पिनराई विजयन, स्टॅलिन व ममता बॅनर्जी यांसारख्या प्रादेशिक नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारून इंडिया आघाडीत सामील होण्यास प्रादेशिक नेते तयार होऊ शकतात. परंतु, भाजपा त्यांना काँग्रेसबरोबर जाण्यापासून रोखू शकते. टीएमसी व डीएमके नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे चालवली जाऊ शकतात.
नीरजा चौधरी, (कंट्रीब्युटिंग एडिटर, ‘द इंडियन एक्स्प्रेस’, यांनी गेल्या ११ लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन केले आहे. त्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाईड’ (How Prime Ministers Decide) या पुस्तकाच्या लेखिका आहेत.)