छत्रपती संभाजीनगर – गेवराईत महायुतीतील भाजप विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थेट लढत असून, दोन्ही पक्षांचे उमेदवार पंडित-पवार समर्थक आहेत. त्या अर्थाने गेवराई शहरावर आणि नगर परिषदेतही सत्ता स्थापित करण्यासाठी पंडित-पवार या परस्परांशी नाते संबंध असलेल्या घराण्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो.
गेवराई नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या गीताताई बाळराजे पवार तर राष्ट्रवादीच्या शीतल महेश दाभाडे यांच्यामध्ये थेट लढत आहे. गीताताई या माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजयी आहेत. तर शीतल दाभाडे माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी आहेत. दाभाडे हे अमरसिंह पंडित यांचे समर्थक मानले जातात. लक्ष्मण पवार हे मूळ गेवराईचे रहिवासी असून, स्थानिक नगरपालिका त्यांच्या १८ वर्षे ताब्यात राहिलेली आहे. लक्ष्मण पवार यांचे वडील माधवराव पवार हे एकेकाळी गेवराईचे आमदार राहिलेले आहेत.
माधवराव पवार व त्यांचे समकालीन माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित यांच्यामध्ये गेवराई तालुक्याचे राजकारण गुरफटलेले असायचे. परंतु परस्पर विरोधक नातेसंबंधात बांधले गेले. शिवाजीरावांनी त्यांचे एक चिरंजीव जयसिंह यांची सहचारिणी म्हणून माधवरावांच्या लेकीला सून म्हणून पंडित घराण्यात आणले. नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या विद्यमान उमेदवार गीताताई यांची नणंद व बाळराजे व माजी आमदार लक्ष्मण पवार यांची सख्खी बहीण राष्ट्रवादीचे गेवराईचे विजयसिंह पंडित यांची भावजय. विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण पवार यांचा २०२४ च्या नुकत्याच झालेल्या विधानसभेत पराभव केला होता. लक्ष्मण पवार मागीलवेळचे भाजपचे आमदार असतानाही त्यांनी युतीमध्ये गेवराईची जागा राष्ट्रवादीला सुटल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यामध्ये पवार यांचा दारूण पराभव झाला होता.
आता शिवाजीराव यांचे चुलत बंधू आणि पंडित घराण्याचे विरोधक राहिलेले माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी अलिकडेच परळीत मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असून बदामराव व माजी आमदार लक्ष्मण पवार हे एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवार शीतल दाभाडे यांच्यासमोर आणि पर्यायाने अमरसिंह, आमदार विजयसिंह पंडित यांच्यापुढे आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे. पंडित नात्यांमधील लढत रंजकदार असून, बाळराजे हे एका प्रकरणात शिक्षा भोगून आलेले असून पवार व पंडित घराण्यामध्ये २०१४ पासून नातेसंबंधातील दरी वाढत गेलेली आहे. दोन विरोधकांमधील कोणाचा उमेदवार निवडून येतो, याकडे लक्ष लागले. गेवराईत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ६ तर ११ प्रभागातील २२ जागांसाठी ६५ उमेदवार उभे आहेत.
