कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी आणि त्यावरून होणारे वाक् प्रहार यामुळे निवडणुकीचे रंग वाढत चालली असली तरी त्यामुळे ठरावधारक मतदार, नागरिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांची रणनीती ही मुश्रीफ विरोधकांना एकत्र करून महायुतीत फूट पाडण्याची दिसत आहे. तर मुश्रीफ यांचे डावपेच पाटील-महाडिक एकत्र येणार असल्याची चर्चा पसरवून महायुतीत संभ्रम निर्माण करण्याची दिसतात. तर खासदार धनंजय महाडिक हे महायुतीची एकजूट टिकवून गोकुळवर भगवा फडकवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. या भेटीगाठी आणि प्रतिविधानांमुळे गोकुळची निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मलईदार राजकारणाचा अड्डा असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक ही नेहमीच चुरशीने होत असते. आगामी सत्तेच्या समीकरणांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या निवडणुकीत सत्ताबदल घडवून आणणारे सतेज पाटील यांनी यावेळी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून सर्व २५ जागांवर स्वबळावर लढून एकहाती सत्ता आणण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आमदार पाटील यांच्या या रणनीतीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांच्या घेतलेल्या गाठीभेटी. आमदार शिवाजी पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची त्यांनी भेट घेतली. मुश्रीफ यांना शह देण्याबरोबरच महायुतीतील काही घटकांशी जवळीक असल्याचे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
सतेज पाटील यांच्या या राजकीय हालचालींवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सावध तितकीच खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सतेज पाटील यांचा गोकुळमध्ये निभाव लागणार नाही, असा दावा करतानाच मुश्रीफ यांनी सतेज पाटील आणि त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक खासदार धनंजय महाडिक एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा ऐरणीवर आणली. या विधानामुळे कोल्हापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. वर्षानुवर्षे राजकीय वैमनस्य असलेले दोन मोठे शिलेदार खरोखरच एकत्र येणार का, याबद्दल तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले. गेल्या वेळी मुश्रीफ आणि पाटील एकत्र होते, तर महाडिक विरोधात होते. आता समीकरण फिरले तर मुश्रीफ एकटे पडतील, हा संदेश देत सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न असू शकतो.
मात्र, या चर्चेला खासदार धनंजय महाडिक यांनीच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सतेज पाटील यांच्यावर थेट टीका करत म्हटले आहे की, सतेज पाटील यांच्याकडे ठराव नाहीत, म्हणून त्यांना भेटीगाठी घ्याव्या लागत आहेत. गोकुळ निवडणुकीत प्राथमिक दूध संस्थांचे ठराव हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. महायुतीकडे सुमारे ४ हजार संस्थांचे ठराव असल्याचा दावा केला जात असताना आमदार पाटील यांनी १८५१ ठरावांचा दावा केला आहे. ठरावांच्या आघाडीवर पिछाडीवर असल्याने पाटील वैयक्तिक भेटीगाठींवर भर देणे भाग पडत असल्याचे सांगत महाडिक यांनी सतेज पाटील हे मतांच्या पातळीवर मागे असल्याचे दाखवून देत आहेत. त्याचबरोबर महाडिक यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, आम्ही सतेज पाटील यांच्यासोबत निवडणूक लढवणार नाही, महायुतीच गोकुळची दहीहंडी फोडणार.
चाणाक्ष हसन मुश्रीफ यांनी एक टोपी भिरकावून सतेज पाटील – धनंजय महाडिक यांचे जमत नाही याची खात्री केली. आता ते महायुती अंतर्गत दुसरी खेळी करायला रिकामे झाले आहेत. सर्वांच्याच पुढच्या चाली कशा असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
