कोल्हापूर : चार हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचे सत्तेचे लोणी मटकावण्यासाठी आतापासूनच सत्ताकारण सुरू झाले आहे. गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी एकाकी लढतीची तयारी सुरू ठेवली आहे. त्यामुळे गोकुळची निवडणूक नेमक्या कशाप्रकारे होणार, कोण कोणासोबत राहणार याला विलक्षण महत्व प्राप्त झाले आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आपले उत्पादन गोकुळ या नावाने विकतो. या संघाची ओळख गोकुळ अशीच झाली आहे. गोकुळ दूध संघाचे संचालक होण्यासाठी वाटेल त्या तडजोडी केल्या जातात. प्रसंगी ठरावावर प्रभुत्व असणाऱ्या संचालकांच्या इकडून तिकडे मर्कटउड्या पडल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यातून सत्तांतर घडल्याचे गेल्या निवडणुकीत दिसले होते.
सत्तांतरानंतरच्या कुरघोड्या
पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत गोकुळचे तत्कालीन नेते महादेवराव महाडिक, जिल्हा काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष पी. एन. पाटील, अरुण नरके यांचे वर्चस्व मोडून काढून सतेज पाटील – हसन मुश्रीफ या दुकलीने प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, विनय कोरे यांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. सत्तेसाठी कारणीभूत ठरलेल्या दोघा संचालकांना अध्यक्षपद दिले. पुढील अध्यक्ष पद गोकुळचा उत्कर्ष करणारे दिवंगत अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर यांच्या घराण्यात देण्याचे ठरले. मात्र महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे अशा पालुपदाचा रातोरात शोध लावला गेला. आणि अचानक सत्ताचक्रे फिरून मंत्रीपुत्र नविद मुश्रीफ यांच्याकडे अध्यक्षपद अत्यंत नियोजनबद्धरित्या सोपवण्यात आले.
महायुतीच्या पंखाखाली
आता गोकुळच्या निवडणुकीला गती आली आहे. ती महायुतीच्या पंखाखाली लढवण्याचे संकेत आहेत. भाजपचे राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक यांनी गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणार असल्याचे उघडपणे सांगितलेले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सुरुवातीचा पवित्रा सावध दिसत आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तथापि पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर या शिंदे शिवसेनेकडून ही निवडणूक कशाप्रकारे लढवायची याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. तथापि भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्तेला पाठिंबा देणारे जन सुराज्यचे आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत.
सतेज पाटील पुन्हा एकाकी
एकंदरीत हालचाली लक्षात घेऊन गोकुळ वर प्रभाव असलेले आमदार सतेज पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी पावले उचलली आहेत. मध्यंतरी एका मेळाव्यात त्यांनी मी आता एकटा उरलो आहे; मला पाठबळ द्यावे, अशी भावनिक साद घातली होती. कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुकात सतेज पाटील यांनी एकाकी लढत दिली होती. तेथे त्यांना सत्ता स्थापन करता आली नसली तरी त्यांची एकाकी लढत उल्लेखनीय ठरली होती. राजकीय निवडणुका आणि सहकार क्षेत्रातील निवडणुका यामध्ये फरक असतो. गोकुळ सारख्या संस्थेत तर फरक अधिकच असतो. गोकुळच्या निवडणुकीत प्रत्येक मत लाखमोलाचे असते. ही निवडणूक महायुती एकत्रित लढणार असेल तर सतेज पाटील यांनी एकाकी वाटचाल करावी लागणार असून ती त्यांना आव्हानास्पद ठरणार आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटप कसे राहणार, रंकाला राव करणारे सत्तेचे नवनीत असलेले अध्यक्षपद कोणाकडे जाणार यालाही राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्व असणार आहे.

