कोल्हापूर : महायुतीच्या नेत्यांमध्ये ‘गोकुळ’वरून रंगलेला वाद आता आधिकाऱ्यांच्या नियुक्ती -हटवण्यापर्यंत पोहोचल्याने निवडणुकीपूर्वीच संघातील राजकारण चांगलेच टोकदार झाले आहे. या संघर्षातून कोल्हापुरातील सहाय्यक निबंधक (दुग्ध) अधिकाऱ्याची नुकतीच तातडीने बदली करण्यात आली.
भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नाने याच पदावर नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी पात्र संस्था निश्चितीबाबत नव्या दुग्ध अधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तथापि, गोकुळच्या राजकीय घुसळणीत शासकीय अधिकाऱ्यांची सोयीसाठी प्यादी हलवली जात असल्याने या राजकारणाचा फटका अधिकाऱ्यांनाही बसू लागल्याचे दिसत आहे.
गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध संघ) दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अचानक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यास रोज नवनवीन वळणे मिळू लागले आहेत. आता हा संघर्ष महायुती अंतर्गतच सुरू झाला आहे. विशेषतः वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भाजपचे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आव्हान दिले आहे.
आमदार पाटील यांना गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांची सोबत मिळत आहे. शिवाय अदृश्य शक्ती नावाखाली कोल्हापुरातील भाजपचे यंत्रणाही त्यांच्या पाठीशी आहे. यातून शह – काटशहाचे राजकारण रंगात आले आहे. मात्र, त्याची झळ आता शासकीय अधिकाऱ्यांनाही बसू लागली असून कोल्हापूर, पुणे येथील या विभागातील अधिकारी अत्यंतिक तणावातून जात असल्याचे दिसून येत आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी ११०८ संस्था बेकायदेशीर पद्धतीने वाढवण्यात आल्या आहेत, अशी तक्रार वडकशिवाले (तालुका आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे अध्यक्षप्रकाश बेलवाडे यांनी केली होती. त्यास मंत्री, प्रशासन पातळीवरून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली. येथे एका सुनावणी प्रकरणात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वकिलांनी तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांचे आदेश रद्द करण्यास संमती असल्याचा अर्ज न्यायालयाकडे दाखल केला.
यानंतर न्यायालयाकडून तत्कालीन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सहनिबधकांचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने या संस्थांची पात्रता शासनाच्या दुग्ध विभागाने करावी असे आदेश दिले होते. याप्रकरणी बेलवाडे यांनी आपल्या बाजूने निकाल झाल्याचा दावा केला होता.
नियुक्तीचा खो खो
दरम्यान, कोल्हापूर सहाय्यक निबंधक दुग्ध या पदावर प्रदीप मालगावे यांची पंधरा दिवसांपूर्वीच मध्यरात्री बदली करण्यात आली होती. त्या जागेवर सुजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, विरोधकांनी कदम यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू ठेवली. आमदार शिवाजीराव पाटील व प्रकाश बेलवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
तेव्हा कदम हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांचे भाचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार विभागात सहाय्यक निबंधक म्हणून काम केलेल्या आणि मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असलेले कदम हे गोकुळच्या ऐन निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या अशा सहाय्यक निबंधक दुग्ध पदावर म्हणून काम करू शकत नाहीत, असाही मुद्दा पटवून दिल्याचे सांगण्यात येते.
यातूनच कदम यांची बदलीचा आदेश वायूवेगाने काढण्यात आला. याशिवाय, गोकुळ दूध संघाला मतदान करण्यास पात्र ठरणाऱ्या प्राथमिक दूध संघाच्या पात्रतेबाबत दुग्ध निबंधक डॉ. महेश कदम ( पुणे) यांच्या कामकाज पद्धती बाबतही मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या असून हे अधिकाऱ्याबाबतचे आणखी एक वळण ठरले आहे.
अधिकाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेची कसोटी
या जागी आता शाहुवाडीचे उपनिबंधक कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी पहिल्याच दिवशी ठाकरे रुजू होण्याच्या दिवशी कोल्हापुरातील दुग्ध कार्यालयात तणावाचे वातावरण होते. येथे काहींनी आमदार शिवाजीराव पाटील, प्रकाश बेलवाडे, भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. येथे पोलिसांना धाव घ्यावी लागली होती. दिवस मावळता मावळता ठाकरे यांनी पदभार स्वीकारला.
एकूणच गोकुळ दूध संघाचे निवडणुकीचे तापलेले राजकारण पाहता ठाकरे यांची वाटचाल सोपी असल्याचे मुळीच दिसत नाही. पुढील कालावधीत त्यांना पोलीस बंदोबस्तात काम करावे लागेल की काय अशी बिकट परिस्थिती असल्याचे बोलले जात होते. गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग ठाकरे यांना हाताळावा लागणार आहे. साहजिकच त्यांच्या कार्यक्षमतेची आणि प्रामाणिकपणाची कसोटी लागणार आहे.
शिवाय, याच वेळी गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली गतीने सुरू आहेत. त्यामुळे नव्याने येणारे प्रशासक सुद्धा कितपत कर्तव्यकठोर असणार हे गोकुळ निवडणूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
