कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक की गोकुळ मधील भ्रष्टाचाराची तीव्रता बाहेर काढण्यासाठी प्रशासक नियुक्ती यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गोकुळचे नेतृत्व करीत असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना गोकुळची निवडणूक नजिकच्या काळामध्ये लागण्याची शक्यता वाटत आहे. तर भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे बाहेर काढण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांचे विधान सत्यात उतरणार की शिवाजी पाटील आग्रह ग्राह्य धरणार यावरून महायुती अंतर्गत राजकीय कुस्ती रंगली आहे.
राज्यातील सर्वात मोठा दूध संघ असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकुळ) निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे गोकुळची निवडणूक घेणे किंवा तेथे प्रशासक नियुक्त करणे या दोन पर्यायांपैकी एकाची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागणार आहे. त्यांच्याकडे आमदार शिवाजी पाटील यांनी या आधीच गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचाराच्या ‘सुरस कहाण्या ‘ पोहोचवलेल्या आहेत.
मुश्रीफ – भाजप मतभेद
गोकुळ मध्ये ११०८ संस्था नव्याने वाढवण्यात आलेल्या आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रारूप यादीत या संस्थांची नावे आहेत. मात्र या संस्था बेकादेशीररित्या वाढवण्यात आल्याची तक्रार गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये याचिकाही दाखल केली केली आहे. आमदार शिवाजी पाटील व प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळच्या गैरव्यवहाराबाबत आकडेवारीनिशी मोहीम उघडली आहे. या दोघांचा रोख गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. अर्थात, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक या भाजप नेत्यांची मदत असल्याचेही जिल्ह्यात उघडपणे बोलले जात आहे. हसन मुश्रीफ यांचा गोकुळ मधील प्रभाव कमी करण्याचा या दोघांचा प्रयत्न आहे. याचवेळी गोकुळमध्ये भाजपला अधिकाधिक सत्तेचा वाटा मेळावा यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे लपून राहिलेले नाही.
डोळा ११०८ संस्थावर
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आलेला वृत्तांत हा परस्पर विरोधी होता. त्यावरून जिल्ह्यातील महायुती अंतर्गत सारे काही आलबेल नसल्याचे आणि नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले आहे. गोकुळचे अध्यक्ष, मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांनी गोकुळची निवडणूक लवकरच होईल असे नमूद करताना प्रशासक नेमला जाण्याची शक्यता फेटाळली आहे. यातून त्यांनी आमदार शिवाजी पाटील यांची भूमिका स्वप्नरंजन ठरल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे आमदार शिवाजी पाटील यांनी अखेर, हा सत्याचा विजय असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने गोकुळवर लवकरच शासकीय प्रशासक नियुक्त होणार असल्याचे ठामपणे म्हटले आहे. प्रशासक नियुक्त झाल्यानंतर गोकुळ दूध संघातील गेल्या पाच वर्षातील संचालक मंडळाची भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे आणणार असेही ते म्हणाले. खेरीज, नव्याने वाढवण्यात आलेल्या ११०८ संस्था कशा बेकायदेशीररित्या मंजूर केल्या आहेत हे दाखवून देऊन त्यांचेही अस्तित्व खालसा करण्याच्या त्यांच्या हालचाली आहेत.
सरशी कोणाची?
या पार्श्वभूमीवर आता गोकुळची खरेच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार की तेथे प्रशासक येणार याकडे जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. यावरूनच गोकुळ दूध संघात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे म्हणणे खरे ठरणार, की मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार शिवाजी पाटील यांचा दावा खरा ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
