कोल्हापुरमधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत सत्ताधारी महायुतीचा धुव्वा उडवला. दोन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदारांची ताकद पणाला लागली असतानाही पाटील यांच्या पॅनेलने महायुतीला कडवे आव्हान दिले. हा पराभव महायुतीच्या जिव्हारी लागला असून गोकुळवरील नियंत्रण मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नवा डाव टाकल्याचे दिसून येत आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या निर्णयामुळे गोकुळमध्ये नेतृत्व संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारने गोकुळसारख्या शिखर संस्थांवर शासनाच्या माध्यमातून पाच संचालकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे, या पाचपैकी चौघांना मतदानाचा अधिकार असणार आहे.

गोकुळच्या निवडणुकीत पाटील यांच्या पॅनेलला पराभूत करण्यात अपयश आल्यानंतर आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील बदलांच्या माध्यमातून आपले स्थान कायम ठेवण्याचा महायुतीचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली दूध संघांपैकी एक असलेल्या गोकुळमधील सत्तासंघर्ष आता निवडणुकीपुरता मर्यादित राहिलेला नाही.

मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार, गोकुळसारख्या शिखर सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर सरकारला चार तज्ज्ञ संचालक आणि उपनिबंधक दर्जाचा एक अधिकारी नियुक्त करता येणार आहे. यापैकी चार तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार असणार आहे; मात्र त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही. जिल्हा सहकारी बँकांना या तरतुदीतून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षांच्या निवडणुकीचा तिढा अद्याप कायम आहे. सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला, तर महायुतीसमर्थित पॅनेलला १२ जागा मिळाल्या. अध्यक्ष निवडण्यासाठी आवश्यक असलेले १४ संचालकांचे संख्याबळ पाटील यांच्या पॅनेलकडे नसल्याने निवडणूक होऊ शकलेली नाही. महायुतीचे १२ संचालक अध्यक्ष निवडीसाठी होणाऱ्या बैठकींना अनुपस्थित राहिल्याने गणपूर्तीचा (कोरम) अभाव निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत सरकारला संचालक नियुक्तीचे अधिकार देणारा हा प्रस्ताव गोकुळमधील सत्तासंघर्षाला आणखी गुंतागुंतीचे वळण देऊ शकतो.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे निवडणुकीत पराभव होऊनही महायुतीला गोकुळच्या संचालक मंडळाच्या रचनेवर प्रभाव टाकण्याची संधी मिळू शकते. मात्र, या निर्णयाला सतेज पाटील यांनी विरोध केला आहे. तसेच १२ संचालक बैठकीत उपस्थित न राहिल्याने या आडमुठेपणाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबरला पुन्हा संचालक मंडळाची बैठक बोलावण्याचे आदेश दिले आहेत.

गोकुळचे ग्रामीण भागातील महत्व

गोकुळचं महत्त्व केवळ तो महाराष्ट्रातील मोठ्या सहकार क्षेत्रापुरते मर्यादित नाही. कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत या संस्थेचं जाळं पोहोचलं आहे. १६ मार्च १९६३ रोजी स्थापन झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला ‘गोकुळ’ म्हणून ओळखले जाते. २०२४-२५ मध्ये संघाची वार्षिक उलाढाल जवळपास ४ हजार कोटी रुपये होती. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, १,८१० गावांमधील ८,००९ प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या माध्यमातून गोकुळ सुमारे ४.४१ लाख दूध उत्पादकांशी जोडलेला आहे.

राजकीय विश्लेषक वसंत भोसले यांच्या मते, अल्पभूधारक शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांशी असलेल्या गोकुळचा थेट संबंध येतो, त्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर या संघाचा प्रभाव आहे. दूध विक्रीचे पैसे महिला दूध उत्पादकांच्या बँक खात्यांत जमा होतात. त्यामुळे अनेक महिलांसाठी हा घरखर्चाला हातभार लावणारा महत्त्वाचा उत्पन्नस्रोत आहे. म्हणूनच गोकुळवर एकदा नियंत्रण मिळवले की कोल्हापूर आणि आसपासच्या भागांतील ग्रामीण मतदारांवर या माध्यमातून प्रभाव पाडण्याची संधी असते.

भाजपाला गोकुळवर का नियंत्रण हवंय?

कोल्हापूरच्या राजकारणातील जुन्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसून येतो. जवळपास तीन दशकं माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांच्याशी संबंधित पॅनेलचे गोकुळवर वर्चस्व होते. मात्र, मे २०२१ मध्ये सतेज पाटील, संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने त्यांची सत्ता उलथवून लावली.

त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राजकीय समीकरणे बदलली. मुश्रीफ महायुतीत सहभागी झाले, तरी सुरुवातीला सहकार क्षेत्रात ते सतेज पाटील यांच्यासोबत होते. मात्र, ही आघाडी फार काळ टिकली नाही आणि दोघेही गोकुळच्या राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले. भाजपासाठी गोकुळवरील नियंत्रण मिळवणे हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रभाव वाढवण्याच्या रणनीतिचा भाग आहे. या भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक वर्षे आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवले.

जून महिन्यात दी इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांना एकत्र आणण्यासाठी हस्तक्षेप केला होता. त्यानंतर मंत्र्यांसह आमदार आणि खासदारांचा पाठिंबा असलेले एक संयुक्त पॅनेल महायुतीने मैदानात उतरवले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या पॅनेलच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.

महायुतीला विजयाचा विश्वास होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मुश्रीफ यांचे पुत्र नावीद आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या पत्नी व गोकुळच्या विद्यमान अध्यक्ष शौमिका महाडिक यांना पराभव सहन करावा लागला.

सतेज पाटील या विजयामुळे कोल्हापूरच्या राजकारणातील त्यांचे स्थान आणखी मजबूत झाले. माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य असलेल्या पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपला राजकीय प्रभाव वाढवला आहे. या काळात त्यांनी कोल्हापुरातील प्रभावशाली राजकीय आणि व्यावसायिक कुटुंबांपैकी एक असलेल्या महाडिक कुटुंबाला वारंवार आव्हान दिले आहे.

गोकुळच्या विजयामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. अशा परिस्थितीत गोकुळ निवडणूकीतील विजय हा कोल्हापुरात काँग्रेससाठी राजकीय दिलासा ठरला आहे.

बैठकीवरील बहिष्कार ते कायदेशीर हस्तक्षेप

निवडणूक पार पडली असली तरी गोकुळवरील वर्चस्वाची लढाई अद्याप सुरु आहे. २९ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अनुपस्थित राहून महायुतीच्या संचालकांनी अध्यक्षपदाची निवडणूक रखडवण्याचा प्रयत्न केला. महायुतीसमर्थित १२ संचालक या बैठकीला अनुपस्थित राहिले. गोकुळच्या नियमांनुसार बैठक घेण्यासाठी किमान १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असते. सतेज पाटील यांच्या पॅनेलचे १३ संचालकच उपस्थित असल्याने गणपूर्तीअभावी पीठासीन अधिकाऱ्यांना बैठक तहकूब करावी लागली.

यानंतर पाटील यांच्या पॅनेलच्या १३ संचालकांनी स्वतंत्र बैठक घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. मात्र, गोकुळच्या प्रशासनाने या निवडीला मान्यता दिली नाही. त्यामुळे पाटील यांच्या पॅनेलने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली. २ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने १० नोव्हेंबरला अध्यक्ष निवडीसाठी नव्याने बैठक घेण्याचे आदेश दिले. या बैठकीसाठी सर्व २५ संचालकांना नोटीस बजावण्याचेही निर्देश देण्यात आले.

महायुतीने मात्र संचालकांच्या कृतीचे समर्थन केले आहे. गणपूर्तीची अट ही गोकुळच्या आधीपासूनच्या उपविधींमध्येच आहे, असा दावा महायुतीने केला. निवडणुकीनंतर ही अट नव्याने लागू करण्यात आलेली नाही, असेही महायुतीने म्हटले. ३ नोव्हेंबर रोजी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रक काढून आपली भूमिका मांडली. ‘सतेज पाटील यांनी निवडणुकीत निसटता विजय मिळाल्याने त्यांच्या राजकारणाला पाठिंबा मिळाला आहे, असा अर्थ लावू नये,’ असे या नेत्यांनी म्हटले आहे.