कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे वातावरण तापत चालले आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रित आल्याने महायुतीचा सहजगत्या विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला जात असला तरी जागा वाटपावरून संघर्ष रंगला आहे. यातूनच आपल्याकडे ठरावधारकांची संख्या अधिक असल्याने आपणच ‘थोरला भाऊ’ अशी सांगण्याची चढाओढ सुरू झाली आहे. तर याच निवडणुकीत महायुती अंतर्गत आपणच ‘बाप’ असल्याचे सांगत आपले महत्त्व अधोरेखित करण्याचा खटाटोप काही संचालकांनी चालवला आहे. गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी हेच खरे बाप असे उत्तर देत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी अशांना सुनावले आहे.
गोकुळ निवडणुकीसाठी ठराव दाखल करताना महायुतीमध्ये अंतर्गत चुरस रंगली होती. सर्वाधिक ठराव दाखल करीत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आपण महायुतीतील थोरला भाऊ असल्याचे दाखवून दिले. मुश्रीफ यांचे महत्त्व मान्य करायचे नाही अशी भाजपची भूमिका दिसते. खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या निवडणुकीत भाजप हाच थोरला भाऊ असल्याचा दावा केला. जागा वाढवून घेण्यासाठी महायुतीमध्ये ही भाऊबंधकीचा वाद चर्चेत आहे.
दुसरीकडे गोकुळच्या जीवावर मोठे झालेल्या काही संचालकांना आपले महत्त्व वाढवून घेण्याचे डोहाळे लागले आहेत. शिवसेनेने (शिंदे गट) एकत्रित ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही गोकुळचे माजी संचालक विश्वास पाटील यांनी आपले पुढारपण दाखवण्यासाठी स्वतंत्ररीत्या ठराव दाखल केले. नेतेमंडळी नव्हे तर पाटील आणि आपण दोघे सत्तेचे खरे सूत्रधार आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने माजी संचालक अरुण डोंगळे यांनी केला. या ओघात डोंगळे यांनी गोकुळचा खरा बाप विश्वास पाटील आहेत, असे बेधडक विधान करून नव्या वादाला तोंड फोडले. विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांनी ३० वर्षाहून अधिक काळ संचालक म्हणून काम करताना अनेक प्राथमिक दूध संस्था आपल्या बाजूने वळवल्या. या हुकमी संस्थांच्या मताच्या आधारे या दोघांना गोकुळमध्ये नेते कोणी असोत खरे कारभारी आपणच आहोत, असे दाखवून देण्याचा उपद्व्याप केला आहे.
बापाचा पोरखेळ
गोकुळमध्ये सत्ता कोणाची येणार हे हेरून त्या दिशेने जाऊन सत्तेची पोळी कशी भाजायची याचे तंत्र या धोरणी दुकलीला चांगलेच अवगत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या छत्रछायेत अनेक वर्षे राहत या दोघांनी अनेकदा अध्यक्षपद मिळवत गोकुळच्या सत्तेचे लोणी मटकावले. गेल्यावेळी सतेज पाटील यांच्या बाजूने सत्ता जात असल्याचे हेरून पाठिंबा देताना महाडिक यांची साथ अलगद सोडून दिली. गेल्या पाच वर्षात या दोघांनी पुन्हा अध्यक्षपद सांभाळत सत्तेचे नवनीत चाखले. आता गोकुळच्या निवडणुकीच्या हालचालींना गती आली असताना सतेज पाटील यांचा हात सोडून पाटील यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. तर, डोंगळे यांनी सत्तेचे घड्याळ बांधत नवे ‘राजकीय टाइमिंग’ साधले आहे. महायुतीची सत्ता आल्यावर सुद्धा पाटील – डोंगळे यांचेच वर्चस्व राहील, अध्यक्षपदाचे दावेदार आपणच राहू असे दाखवून देण्याची ही प्राथमिक खेळी ‘बाप’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरत केल्याची चर्चा रंगली आहे.
बापाचे मौन
डोंगळे यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार होऊ लागला. गोकुळला ऊर्जितावस्था आणणारे दिवंगत अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर हे गोकुळचे खरे ‘बाप’ असताना अन्य कोणी लुंगेसंगे ‘बाप’ होऊ शकत नाही, अशा शब्दांत टीकाकारांनी डोंगळे यांना जाणीव करून दिली. अनेकांनी गोकुळचा ‘बाप’ हे दूध उत्पादक शेतकरी असल्याचे सांगत इतरांना बाप म्हणण्याचा हक्क नसल्याचे बेधडकपणे सुनावले. टीकेचा मारा वाढू लागल्यानंतर डोंगळे यांनी नरमाईची भूमिका घेत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. डोंगळे यांनी ‘बाप’ या शब्दाने ज्यांना संबोधित केले ते विश्वास पाटील हे मात्र वादाच्या ठिणग्या उडत असताना याबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत. गोकुळचे बाप म्हणवून घेण्याबाबत ते सहमत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विरोधकांनी झोडपले
डोंगळे यांनी ‘बाप’ उकरून काढल्यावर आमदार सतेज पाटील यांनी जाणीव करून दिली आहे. गोकुळच्या प्रगतीमध्ये दूध उत्पादक शेतकरी आणि माता-भगिनींचा मोठा वाटा आहे. त्यांच्या कष्टामुळेच गोकुळ नावारूपाला आला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे ‘बाप’ असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गोकुळ दूध संघाला प्रगतिपथावर नेले. गोकुळने साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला दर देऊन खऱ्या अर्थाने अर्थक्रांती घडवून आणली असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळच्या बदनामी विरोधात आंदोलन केलेले डॉ. युवराज येडुरे यांनीही गोकुळचा खरा बाप हा दूध उत्पादक शेतकरी असल्याचे विधान करून इतरांची तोंडे बंद केली आहेत. महायुतीमध्ये या बाप प्रकरणावरून नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची कशी दखल घेतली जाणार याची चर्चा होत आहे.
