कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होत असलेल्या भेटीबद्दल आमदार अमल महाडिक यांचे सकारात्मक भाष्य, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पाटील – महाडिक यांच्या मैत्रीचा पदर उलगडताना केलेले विधान या दोन्ही ताज्या वक्तव्यांमुळे काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील आणि भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांच्यातील मैत्रीबंध पुन्हा जुळणार की काय असे वाटू लागले असताना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोघातील मतभेद तीव्रपणे पुन्हा पुढे आले आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच रंगणार हे स्पष्टपणे दिसत आहे. त्याला सतेज पाटील – धनंजय महाडिक यांच्यातील संघर्षाची एक वेगळी टोकदार किनार असणार आहे.
गोकुळ दूध संघात मागील निवडणुकीपूर्वी धनंजय महाडिक यांचे चुलते महादेवराव महाडिक यांचे २५ वर्ष निर्विवाद वर्चस्व होते. ते गेल्यावेळी सतेज पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, विनय कोरे, चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नांमुळे बाजूला केले गेले. गेल्या पाच वर्षातील कारभार आधीच्याच कारभारासारखा वादग्रस्त ठरला. बेबंदशाही, अनागोंदी, भ्रष्टाचाराचे आरोप होत राहिले. परिणामी गोकुळवर प्रशासक नियुक्त करण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली. आता प्रशासक नियुक्ती आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा निवडणूक प्रचाराच्या पटावर येण्याचा गाजत आहे.
गोकुळच्या वादात मुख्यमंत्री
सहा दशकाच्या वाटचालीत गोकुळवर प्रथमच प्रशासक नियुक्तीची नामुष्की ओढवली आहे. हा मुद्दा अधोरेखित करत सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांनी २२ वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोकुळवर प्रशासक नको म्हणून सांगितले. तरीही प्रशासक नियुक्त करण्यात आले. यावरून जिल्ह्यातील महायुतीचे नेतृत्व कमकुवत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप करून विरोधकांच्या नेभळट वृत्तीवर टीकास्त्र डागले आहे. तर, हाच संदर्भ घेऊन धनंजय महाडिक यांनी मागील निवडणुकीवेळी राज्यात पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असल्याने सतेज पाटील यांना निवडणूक जिंकणे सोपे झाले याची जाणीव करून देऊन मुख्यमंत्र्यांचा अदृश्य हात कसा सक्रिय होता याचा भांडाफोड केला आहे. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नेते कमकुवत असतील तर त्यांनी विधानसभेच्या सर्व जागा दहा जागांवर काँग्रेससह विरोधकांचा धुव्वा कसा उडवला हे पाहावे, असे विधान करून सतेज पाटील यांना चिमटा काढला आहे. यामुळे गोकुळ मधील सतेज पाटील – धनंजय महाडिक यांच्या वादात आजी – माजी मुख्यमंत्रीही गोवले गेले आहेत.
भ्रष्टाचारावर बोट
धनंजय महाडिक यांनी मौन सोडत गोकुळच्या निवडणुकीसाठी सक्रिय भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षात गोकुळमध्ये पहिले दोन अध्यक्ष असताना सतेज पाटील यांच्या नेतृत्वकाळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे. असे करताना त्यांनी नेमके हसन मुश्रीफ यांचे अध्यक्षपुत्राला वगळण्याची खेळी केली आहे. याचवेळी खासदार महाडिक यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. आमदार शिवाजी पाटील यांना चंदगड तालुक्यात हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी त्रास दिल्याने त्यांनी गोकुळ विरोधात मोहीम उघडली याची जाणीवही महाडिक यांनी करून दिली आहे.
ताकद आणि खिल्ली
सतेज पाटील यांनी गोकुळची निवडणूक समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहे. सभासदांचा निश्चितपणे पाठिंबा मिळेल असे सांगून एकाकी असलो तरी ताकद दिसणार असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यासाठी संपूर्ण २५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. हा संदर्भ घेऊन खासदार महाडिक यांनी राजाराम व भीमा साखर कारखान्यामध्ये विरोधकांना नेस्तनाबूत करीत सर्व जागा जिंकल्या होत्या. त्याप्रमाणे गोकुळच्या सर्व २५ जागा जिंकल्या जातील असे म्हणत प्रमुख विरोधक असलेल्या सतेज पाटील यांच्या आव्हानाची खिल्ली उडवली आहे. महाडिक यांच्याकडून कडवे आव्हान मिळाले असल्याने सतेज पाटील यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.
