कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या ६३ वर्षाच्या इतिहासात प्रथमच प्रशासक नियुक्त होण्याची वेळ आली आहे. मावळत्या संचालक मंडळांने गोकुळच्या प्रगतीचे कितीही दावे केले असले तरी त्याची त्याला भ्रष्टाचाराचा डाग लागला आहे. हाच मुद्दा घेऊन भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील व गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ मधील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणायला सुरुवात केली. गोकुळची निवडणूक लवकरच जाहीर होणार असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दावा केला असताना तेथे अधिकाऱ्यांचे प्रशासन मंडळ आणून भाजपने शिवाजी पाटील, प्रकाश बेलवाडे यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांच्या सारख्या जिल्ह्यातील सर्वात प्रभावी नेत्याला शह दिला आहे.
गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत सोमवारी संपली. फेब्रुवारी महिन्यामध्ये गोकुळची निवडणूक प्रक्रिया अपेक्षित होती. तथापि, वडकशिवाले येथील महादेव दूध संघाचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली. या न्यायप्रविष्ट प्रक्रियेमुळे निवडणूक प्रक्रिया पुढे सरकू शकली नाही.
गोकुळ दूध संघाची निवडणूक घेतली जावी यासाठी गोकुळचे नेते हसन मुश्रीफ यांनी कंबर कसली होती. तर, प्रशासक नियुक्त करण्याचा चंग शिवाजी पाटील व प्रकाश बेलवाडे यांनी बांधला होता. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी माहिती माध्यमांना पुरवण्यात आली.
हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करून ती महायुती म्हणूनच लढवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असा दावा केला. तसेच अपुऱ्या माहितीवर आधारित बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करतानाच मुश्रीफ यांनी गोकुळवर प्रशासक येणार असा प्रतिदावा करणाऱ्या शिवाजी पाटील – प्रकाश बेलवाडे यांची एकप्रकारे खिल्ली उडवली होती.
दुसरीकडे शिवाजी पाटील, प्रकाश बेलवाडे यांनी मात्र लवकरच प्रशासक नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट सांगितले.
या साऱ्या पार्श्वभूमीवर आता गोकुळवर प्रथमच प्रशासक नियुक्त झाल्याने हसन मुश्रीफ, गोकुळचे संचालक, कारभारी यांच्यापेक्षा गेल्या तीन महिन्यात सक्रिय झालेल्या शिवाजी पाटील – प्रकाश बेलवाडे यांच्या राजकीय हालचाली ठोस असल्याचे पुढे आले आहे.
‘गोकुळ’ मधील भ्रष्टाचारा विरोधात शिवाजी पाटील यांनी मोहीम चालवली असताना त्याला गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांची साथ लाभली. पाटील – बेलवाडे या जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या जोडगोळीने गोकुळचे नेते हसन मुश्रीफ यांनाच थेट आव्हान दिले होते. तूर्तास तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ असलेल्या पाटील – बेलवाडे यांची सरशी झाली आहे. मात्र आता, खरेच गोकुळचा कारभार किती प्रमाणात भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतला आहे हे उघडकीस आणण्याची जबाबदारी देखील या जोडगोळीवर असणार आहे. अन्यथा हा केवळ भ्रष्टाचाराचा साप साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार घडून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागू शकते.
दुसरा धक्का
दरम्यान काल गोकुळच्या संचालक मंडळाचे मुदत संपल्यानंतर तातडीने पाच अधिकाऱ्यांचे प्राधिकृत अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आले. गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सत्ताधाऱ्यांना याचा थांगपत्ता लागेपर्यंत अधिकाऱ्यांच्या प्रशासक पथक गोकुळ मध्ये दाखल झाले. त्यांनी तातडीने पदभार स्वीकारला होता. तोपर्यंत इकडे संचालक मंडळाने सर्वोच्च न्यायालयामध्ये गोकुळची निवडणूक घेतली जावी या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने मागणीबाबत काहीही भाष्य केले नसल्याने संचालक मंडळाला आणखी एक धक्का बसला आहे.
