कोल्हापूर : राज्यातील सहकार तत्वावरील सर्वांत मोठ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक ही यावेळी केवळ दूध उत्पादकांच्या संस्थेची निवडणूक राहिलेली नसून, ती कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचे प्रभुत्व अधोरेखित करणारी बनली आहे. या निवडणुकीचे ध्रुवीकरण पहिल्याच टप्प्यात अत्यंत स्पष्ट आहे. एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी, असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. महायुतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन सर्व २५ जागा जिंकण्याचा दावा केला आहे. हा दावा जितका वरकरणी भक्कम वाटतो तितकाच आतून पोकळ, मतभेदांनी पोखरलेला आहे. अर्थात सत्ताकारण कोणाच्याही हाती गेले तरी आर्थिक उलाढालीमुळे बदनाम झालेल्या गोकुळचा उत्कर्ष होण्यापेक्षा नेते – संचालकांचेच उखळ पांढरे होऊन ५ लाखांवर दूध उत्पादकांना संचालकांनी देऊ केलेल्या दरावर समाधान मानून गोठ्यात राहण्यापेक्षा फार काही हाती लागण्याची चिन्हे नाहीत.
महायुतीसाठी ही निवडणूक एकत्र येऊन लढण्याचे आव्हान असले तरी त्यांच्या गोटात सर्व काही आलबेल नाही. या निवडणुकीतील खरी मेख महायुतीच्या अंतर्गत वादात आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध भाजप असा सुप्त संघर्ष. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व जागांवर विजयाचा विश्वास व्यक्त केला असला तरी त्यांच्याच आघाडीतील भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांना सोबत घ्यायचे की नाही, यावरूनच महायुतीत ठिणगी पडली आहे. मुश्रीफ आणि शिवाजी पाटील यांच्यातील हा वाद केवळ गोकुळ पुरता मर्यादित नाही, त्याचे पडसाद थेट कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीतही उमटणार आहेत. त्यामुळे गोकुळकडे केवळ एक संस्था म्हणून नाही तर जिल्हा बँकेच्या वर्चस्वाची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. मुश्रीफ आणि महाडिक कुटुंबात एकवाक्यतेचा अभाव आहे. अशा स्थितीत महायुतीत एकमेकांचे पाय ओढण्याची आणि आतून जिरवाजिरवीची स्पर्धा लागण्याची दाट शक्यता आहे. वरून कीर्तन आतून तमाशा, असे चित्र दिसत आहे. महायुतीपुढे खरे आव्हान एकजुटीचा देखावा आणि आतून काटा काढण्याच्या राजकारणाचे आहे.
दुसरीकडे सतेज पाटील यांची समविचारी आघाडी ही सध्या तरी एकखांबी तंबूसारखी दिसते. ठरावधारकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याचा आणि सत्ता येणारच, असा दावा सतेज पाटील करत असले तरी त्यांच्यासोबत नेमके कोणते दिग्गज उभे राहणार, हे अजूनही गुलदस्त्यात आहे, त्यांच्या आघाडीचे भवितव्य हे त्यांना कोणाची साथ मिळते, यावरच अवलंबून आहे. त्यांच्याकडे असलेली मतांची नेमकी बेरीज अजूनही स्पष्ट नाही, त्यामुळे ते सध्या एकाकी लढा देत असल्याचे चित्र आहे. महायुतीतील नाराजांची काही कुमक त्यांच्याकडे वळणार का, हे पाहावे लागेल.
मात्र, या दोन्ही आघाड्यांच्या पलीकडे या निवडणुकीला निर्णायक वळण देणारा तिसरा आणि सर्वांत शक्तिशाली घटक म्हणजे पैशाचा महापूर. निवडणुकीतील सर्वांत चिंतेची आणि चर्चेची बाब म्हणजे यातला आर्थिक सत्तेचा वारेमाप वापर. काही ठिकाणी एका ठरावाचा दर थेट पाच लाख रुपयांपर्यंत गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यावरून ही निवडणूक विचारांवर किंवा नेतृत्वावर नव्हे तर अर्थकारणावरच जिंकली जाणार का, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. ठराव खरेदी, पैशांचा वापर आणि आमिषांचे राजकारण यामुळे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याचा आवाज कोठेही ऐकू येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गोकुळची ही निवडणूक अत्यंत उत्कंठापूर्ण, पैशांच्या धुरळ्यात हरवलेली आणि कोल्हापूरच्या पुढील सहकार राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.
