सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची उमेदवारीच मैदानापूर्वी अवैध ठरविण्याचे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने मोडीत काढून आ. पडळकर यांचे रणांगणातील अस्तित्व कायम राखले आहे. यामुळे पै-पाहुण्यांना घेवून बँकेवर आपले वर्चस्व कायम राखण्याचा आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना आता खीळ बसण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत. उच्च न्यायालयाने आ. पडळकर यांची उमेदवारी अवैध ठरविल्यानंतर ईश्वरपूरमध्ये झालेला आनंदोत्सव आणि आ. पडळकर यांची उमेदवारी कायम झाल्यानंतर झालेला आनंदोत्सव पाहता ही निवडणूक आ. पडळकर व आ. पाटील यांच्यातील संघर्ष जिल्ह्याच्या अर्थकारणाला नवा आयाम देणारा ठरू शकतो.
भाजपचा पर्यायाने महायुतीचा मुख्य चेहरा म्हणून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी उच्च न्यायालयाने अवैध ठरविल्याने जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीची समिकरणेच बदलली होती. भाजपमध्ये असलेल्यांचे लागेबांधे आ. पाटील यांच्याशीही असल्याचे आतापर्यंतच्या राजकीय खेळीवरून दिसत होते. यावरून आ. पडळकर यांनी उच्च न्यायालयाने उमेदवारी अवैध ठरविल्यानंतर विरोधकाबरोबरच काही स्वकीयांनाही आनंदाच्या उकळ्या फुटल्याचे सांगितले होते.
आ. पडळकर यांच्या उमेदवारीमुळे भाजपमधील काही मंडळींनाच अडचणी निर्माण होणार आहेत. कारण जर संचालक मंडळाची निवडणूक अविरोध करण्यासाठी चर्चा सुरू झाली तर सत्ताधारी गटाकडून प्रामुख्याने आ. पडळकर यांच्या नावालाच विरोध होण्याची शक्यता आहे. आणि भाजप त्यांना वगळून अविरोध निवडणुकीचा पर्याय स्वीकारू शकेल काय, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आ. पडळकर यांचे बँकेतील आगमनच धोक्याची घंटा ठरू शकते.
बँकेचे संचालक नसताना आ. पडळकर आणि आ. सदाभाऊ खोत या जोडीने बँकेच्या कारभाराबद्दल तक्रारी केल्या होत्या. संचालक मंडळ बरखास्तीची मागणीही केली होती. शीतपेटीत बंद असलेली चौकशीची फाईल पुन्हा उघडण्यास भाग पाडले. मात्र, चौकशीत फारसे काही हाती लागले नसले तरी त्यात काहीच तथ्य नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. थकीत कर्जदार संस्थांची यादी देण्यास प्रशासनाकडून केली जाणारी टाळाटाळ, ओटीएसखाली दिली जात असलेली सवलत आणि साखर कारखान्यांना दिली जाणारी मोठी कर्जे या बाबी उघड होणे गरजेचे आहे. यासाठी आ. पडळकर यांच्यासारख्या प्रतिनिधींची गरज आहेच, हे मान्यच करावे लागेल.
बँकेत संचालक म्हणून येण्यासाठी जिल्ह्यातील अनेक दिग्गज प्रयत्नशील असताना आ. पडळकर यांना होत असलेल्या बहुपक्षिय विरोध कोणत्या कारणाने, याचे उत्तर ते आत आल्याविना मिळणार नाही. म्हणूनच त्यांची उमेदवारी रणांगण सुरू होण्यापूर्वीच रोखण्याचे प्रयत्न सुरू होते. आता विकास सोसायटी गटातून त्यांना निवडून येण्यास रोखण्याचे प्रयत्न अधिक जोरदार होतील हे उघड आहे. यासाठी मतांचा दरही वधारेल, हा चक्रव्यूह ते कसा भेदतात हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जतमध्ये त्यांच्या विरोधात सत्ताधारी गटाकडून मैदानात कोण येते, हे पाहावे लागेल. भाजपचा मुख्य चेहरा म्हणून आ. पडळकर जरी असले तरी त्यांच्या पॅनेलला एकहाती सत्ता मिळेल, अशी स्थिती मात्र सध्या तरी दिसत नाही. मात्र, आ. पडळकर म्हणतात त्याप्रमाणे डर ही अच्छा है, अशीच अवस्था सत्ताधारी गटाची राहील, असे दिसते.
