संतोष प्रधान

विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्याचा अधिकार हा राज्यपालांचा असतो. पण मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राज्यपाल अधिवेशन बोलावू शकतात. राज्यपाल स्वत:हून अधिवेशन बोलावू शकत नाहीत. अरुणाचल प्रदेशात स्वत:हून अधिवेशन बोलाविल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांवर ताशेरे ओढले होते. फक्त अपवाद हा राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यास बहुमत सिद्ध करण्याकरिता राज्यपाल घटनेच्या १७४ व १७५ (२) अन्वये विशेष अधिवेशन बोलावू शकतात.

विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी किती कालावधी असावा याची नियमात काहीच तरतूद नाही. विशेष अधिवेशनाकरिता राज्यपालांनी २४ तासांची मुदत दिल्याची उदाहरणे आहेत. यानुसारच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विशेष अधिवेशन बोलाविले आहे.
अधिवेशन बोलाविण्याकरिता २४ तासांची मुदत कमी असल्याचा आरोप शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला आहे. पण अन्य काही राज्यांमध्ये २४ तासांची मुदत दिल्याची उदाहरणे आहेत.

दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी विशेष अधिवेशन पाचारण केले असता, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा हा अधिकार ग्राह्य धरला होता.